संरक्षण मंत्रालय
आपत्कालीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी लष्कर आणि नागरी परस्परसंवाद ही चैतन्यशील संरक्षण परिसंस्थेची गुरुकिल्ली आहे: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सशस्त्र सेना मुख्यालय (AFHQ) नागरी सेवा दिन समारंभात केले प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
03 AUG 2026 8:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2026
संरक्षण दले नवचैतन्यासह अधिकाधिक एकत्रितपणे वाटचाल करत असताना संरक्षण परिसंस्थेत लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाच्या नागरी घटकांमध्ये खोलवर समन्वय असणे आवश्यक आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. यामुळे बदलत्या सुरक्षा आणि तांत्रिक आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाणे शक्य होईल, तसेच संरक्षण परिसंस्थेमध्ये समन्वय वाढेल आणि संस्थात्मक स्मृती, स्थिरता आणि नियम आणि कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित होईल, असे ते म्हणाले. 85व्या सशस्त्र सेना मुख्यालय (AFHQ) नागरी सेवा दिन समारंभाला संबोधित करताना ते आज नवी दिल्ली येथे बोलत होते. गणवेषधारी आणि नागरी सेवा या दोन्ही ‘राष्ट्र प्रथम’ या एकाच ध्येयाने प्रेरित आहेत आणि जेव्हा आपल्यासमोरचे ध्येय समान असते तेव्हा यंत्रणेतील प्रत्येक घटकाचे रुपांतर राष्ट्रीय सामर्थ्यात होते, असे सिंह यांनी सांगितले.
संरक्षण दल आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असेल तर ते कधीच एका ध्येयाकडे वाटचाल करु शकणार नाहीत असे सांगून संरक्षण मंत्री म्हणाले की संयुक्त आणि समन्वित आराखडा विकसित झाल्यानंतर धोरण, प्रशासन, मानव संसाधन व्यवस्थापन, आर्थिक प्रक्रिया, लॉजिस्टिक्स आणि संस्थात्मक ज्ञान अशा सर्व क्षेत्रांमध्ये सातत्य आणि उत्कृष्टता यांची नितांत आवश्यकता असते. सर्वसामान्य नागरिक आणि संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये नियोजनबद्ध परस्पर संवाद आणि संपर्क असणे आवश्यक असून त्यादृष्टीने एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण करत ज्ञान ग्रहण करण्यासाठी संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम आणि विभागीय उपक्रम आयोजित करता येतील, यावर त्यांनी भर दिला.
लष्करी अधिकाऱ्यांकडे कार्यान्वयन अनुभव, नेतृत्त्वाधारित दृष्टिकोन आणि युद्धजन्य परिस्थितीची जाण असते तर नागरी अधिकारी प्रशासकीय सातत्य, धोरण अनुभव, सरकारी प्रक्रियेचे ज्ञान आणि संस्थात्मक स्मृती यांनी समृद्ध असतात. ज्यावेळी ही सर्व बलस्थाने एकत्र येतात तेव्हा निर्णय घेणे अधिक माहितीपूर्ण, संतुलित आणि प्रभावी होते, असे राजनाथ सिंह म्हणाले.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 'सायबर युद्धा'चे उदाहरण देत सांगितले की, जर सशस्त्र सेना मुख्यालय नागरी सेवांतील अधिकारी आपल्या तज्ज्ञतेचा उपयोग करून संरक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त अशी सामायिक सायबर साधने विकसित करतील, तर त्याचा संरक्षण दलांना मोठा फायदा होऊ शकतो. तसेच, त्यांनी भारतीय लष्करी इतिहासाचा नागरी दृष्टिकोनातून अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र मंच विकसित करण्याची कल्पना मांडली. अशा उपक्रमामुळे नव्या कल्पना, अभिनव विचार आणि व्यापक दृष्टिकोनाला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

राजनाथ सिंह यांनी सशस्त्र सेना मुख्यालयातील नागरी सेवांनी भारताच्या संरक्षण व्यवस्थापन व्यवस्थापन रचनेचा ‘सामरिक मेंदू’ म्हणून विकसित होण्याचे आवाहन केले. यादृष्टीने संरक्षण क्षेत्राची व्यापक समज विकसित करून, संयुक्त वातावरणात प्रभावीपणे कार्य करून उदयोन्मुख आव्हानांना तोंड देण्यासाठी आपले कौशल्य सातत्याने वाढवले पाहिजे, असे ते म्हणाले.
या समारंभाचा एक भाग म्हणून राजनाथ सिंह यांच्या हस्ते सहसचिव आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी (जेएस आणि सीएओ) यांचे कार्यालय आणि त्याचे सुधारित दृष्टी आणि ध्येय विधान यांच्या विविध डिजिटल उपक्रमांचे उदघाटन झाले. या उपक्रमांमध्ये इंटरनेट-आधारित निवास व्यवस्था व्यवस्थापन प्रणाली, दावे प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी eHRMS प्रणालीचे TULIP 2.0 प्रणालीशी एकत्रीकरण, वेतन आणि भत्ते यांच्या प्रक्रियेसाठी मुख्य प्रशासकीय अधिकारी (CAO) कार्यालयाचे TULIP 2.0 प्रणालीशी एकत्रीकरण आणि स्मार्ट परफॉर्मन्स अॅप्रेझल रिपोर्ट रेकॉर्डिंग ऑनलाइन विंडो (SPARROW) या पोर्टलवर संबंधित अधिकाऱ्यांची नोंदणी आणि समावेश इत्यादी विविध उपक्रमांचा समावेश आहे.

याशिवाय संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते संवाद या मासिकाच्या 34 व्या आवृत्तीचे प्रकाशन देखील झाले. यामध्ये सेवा मुख्यालय आणि आंतर सेवा संघटनेत नियुक्ती झालेल्या विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी लिहिलेले प्रवासवर्णन, निबंध, लेख आणि कवितांचा समावेश असतो. याशिवाय त्यांच्या हस्ते सशस्त्र सेना मुख्यालयातील अधिकाऱ्यांचा क्रीडा आणि अशा विविध क्षेत्रांमधील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तसेच उत्तम शैक्षणिक यश संपादन केलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा देखील गौरव करण्यात आला
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2294037)
आगंतुक पटल : 13