भूविज्ञान मंत्रालय
संसदेतील प्रश्न : भारतीय मान्सूनवर एल निनोचा परिणाम
प्रविष्टि तिथि:
30 JUL 2026 3:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,30 जुलै 2026
जागतिक हवामान संघटना किंवा मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय हवामान विभागाद्वारे "सुपर एल निनो" अशी कोणतीही अधिकृतपणे परिभाषित श्रेणी नाही. तांत्रिकदृष्ट्या, विषुववृत्तीय मध्य प्रशांत महासागरातल्या समुद्राच्या पृष्ठभागीय तापमानातल्या फरकाच्या तीव्रतेनुसार एल निनो घटनांचे वर्गीकरण सामान्यतः सौम्य, मध्यम, तीव्र किंवा अत्यंत तीव्र असे केले जाते. भारतीय हवामान विभागाने 2026 च्या नैऋत्य मान्सून हंगामात एल निनो परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. जून 2026 दरम्यान एल निनो परिस्थिती सौम्य होती आणि जुलै 2026 मध्ये ती मध्यम स्तरापर्यंत तीव्र झाली.
ऑक्टोबर-डिसेंबर 2026 च्या कालावधीत एल निनो आणखी तीव्र होण्याची शक्यता असून तो अत्यंत तीव्र श्रेणीत पोहोचू शकतो. तथापि, भारतीय प्रदेशावर त्याची नेमकी तीव्रता आणि परिणाम हे महासागर तसेच वातावरणाच्या एकत्रित परिस्थितीवर अवलंबून असतात, त्यामध्ये एल निनो हा केवळ एक घटक आहे. भारतीय हवामान विभाग महासागर आणि वातावरणीय परिस्थितीतील बदलांवर सतत लक्ष ठेवतो आणि हवामानाचे नियमित हंगामी आणि मासिक अंदाज तसेच मार्गदर्शक सूचना जारी करतो.
भारतीय हवामान विभाग एल निनो आणि इतर हवामान घटकांच्या बदलांवर सतत लक्ष ठेवत असतो आणि केंद्र व राज्य सरकारे तसेच इतर संबंधितांना नियमित हंगामी/मासिक अंदाज, विस्तारित-कालावधीचे अंदाज आणि हवामानविषयक मार्गदर्शक सूचना जारी करतो. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे, राज्य सरकारे, जिल्हा प्रशासन आणि इतर भागधारकांना पूर्वतयारी व प्रतिसादात्मक उपायांसाठी मदत व्हावी म्हणून भारतीय हवामान विभाग विविध संप्रेषण माध्यमांद्वारे पुढील 7 दिवसांसाठी वैध असणारे परिणामावर आधारित अंदाज आणि जोखमीवर आधारित इशारे दररोज जारी करत असतो.
केंद्रीय भू-विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
सुषमा काणे/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2291689)
आगंतुक पटल : 14