आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य मंत्री जगत् प्रकाश नड्डा यांनी पदवीपूर्व राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET UG) समुपदेशन 2026 च्या तयारीचा घेतला आढावा


अडथळामुक्त, पारदर्शक आणि तंत्रज्ञानस्नेही समुपदेशन प्रक्रियेसाठी वैद्यकीय समुपदेशन समितीच्या सज्जतेचा जगत् प्रकाश नड्डा यांनी घेतला आढावा

विद्यार्थीस्नेही समुपदेशन सुधारणा लागू, याअंतर्गत एकदाच प्रत्यक्ष उपस्थित राहणे, ऑनलाइन दस्तऐवज पडताळणी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सुधारीत सुविधांसंबंधीच्या सुधारणांचा अंतर्भाव

प्रविष्टि तिथि: 29 JUL 2026 10:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,29 जुलै 2026

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत् प्रकाश नड्डा यांनी आज आगामी पदवीपूर्व राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा समुपदेशन 2026 (NEET UG Counselling 2026) च्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या आढाव्यादरम्यान नड्डा यांनी देशभरातील पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता, गुणवत्तेला प्राधान्य, तंत्रज्ञानाचा वापर आणि विद्यार्थीस्नेही वातावरण सुनिश्चित करण्याबद्दल सरकारची वचनबद्धताही पुन्हा एकदा व्यक्त केली. या बैठकीत आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या  वैद्यकीय समुपदेशन समितीच्या अखत्यारीतील अखिल भारतीय कोटा अर्थात अखिल भारतीय पातळीवरील प्रवेशाच्या जागा (AIQ - All India Quota) तसेच इतर जागांसंबंधीच्या समुपदेशनाच्या सज्जतेचा आढावाही घेतला गेला.

या आढावा बैठकीदरम्यान जगत् प्रकाश नड्डा यांनी समुपदेशनाचे वेळापत्रक, माहिती तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षेसंबंधीची सज्जता, तक्रार निवारण यंत्रणा, उमेदवारांसाठीच्या सुविधा आणि सहभागी संस्थांमधील समन्वयाचा आढावा घेतला.

समुपदेशन प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष आणि गुणवत्तेवर आधारित पद्धतीने पार पाडली पाहिजे, तसेच विद्यार्थ्यांना सुलभेचा अनुभव यायला हवा ही बाब जगत् प्रकाश नड्डा यांनी ठळकपणे मांडली. संपूर्ण प्रवेश प्रक्रियेदरम्यान तंत्रज्ञान विषयक भक्कम सहकार्य राखावे, तक्रारींचे तातडीने निवारण होईल याची सुनिश्चित करावी तसेच समुपदेशन पोर्टलचे कामकाज सुरळीत राहील याची खातरजमा करावी असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. उमेदवारांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकाराने सर्व उपाययोजना केल्या जातील, हे सुनिश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पारदर्शकता वाढावी, वावर सुलभतेत सुधारणा घडून यावी तसेच प्रवेश प्रक्रिया सोपी असावी या उद्देशाने पदवीपूर्व राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा समुपदेशन 2026 अंतर्गत, अनेक महत्वाच्या तंत्रज्ञानस्नेही आणि विद्यार्थीकेंद्री सुधारणा लागू केल्या असल्याची माहिती जगत् प्रकाश नड्डा यांना या बैठकीत दिली गेली.

या सुधारणांअंतर्गत एकदाच प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची (वन-टाईम फिजिकल रिपोर्टिंग) तरतूद असलेला आराखडा लागू करण्यात आला आहे. यामुळे उमेदवारांना संस्थांना वारंवार भेट देण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे अशी माहिती नड्डा यांना दिली गेली. जागा वाटपानंतर उमेदवारांना फ्रीझ (Freeze - दिलेला पर्याय अंतिम करणे) किंवा फ्लोट (Float - दिलेला पर्याय राखून ठेवून इतर पसंतीच्या पर्यायांसाठी प्रयत्न करणे) यांपैकी एका पर्यायाची निवड करून, आपला इच्छित पर्याय ऑनलाइन पद्धतीने मांडता येणार आहे. असेही अधिकाऱ्यांनी नड्डा यांना सांगितले.

फ्रीझ हा पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांना मूळ दस्तऐवजांची पडताळणी आणि प्रवेश शुल्क भरण्यासह प्रवेशाच्या इतर औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार त्यांना वाटप केलेल्या संस्थेत प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार आहे.

पुढील फेऱ्यांमध्ये प्रवेश श्रेणी उन्नतीसाठी 'फ्लोटिंग'चा पर्याय निवडणारे उमेदवार विहित कालावधीत कागदपत्र पडताळणीसह प्रवेशाशी संबंधित सर्व औपचारिक प्रक्रिया, ऑनलाइन माध्यमातून पूर्ण करू शकतील. या कालावधीत त्यांना मिळालेल्या संस्थेत प्रत्यक्ष हजर राहण्याची, मूळ कागदपत्रे सादर करण्याची किंवा प्रवेश शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. पुढील समुपदेशन फेऱ्यांमध्ये सहभागी होत असतानाही त्यांचा तात्पुरता प्रवेश वैध राहील.

या सुधारित चौकटीमुळे प्रत्यक्ष संस्थेत केवळ एकदाच हजेरी नोंदवून येणे, मूळ कागदपत्रांची एकदाच पडताळणी आणि प्रवेश शुल्कही एकदाच भरणे आवश्यक राहील. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अनावश्यक प्रवास टळेल आणि प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ व विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर होईल.

यावर्षी आणखी एक महत्त्वपूर्ण सुधारणा म्हणून ऑनलाइन राजीनाम्याचा (प्रवेश जागेवरचा दावा सोडणे) पर्याय उपलब्ध करून दिला आहे. समुपदेशन नियमांनुसार आणि विहित कालमर्यादेत, मिळालेल्या प्रवेश जागेचा राजीनामा द्यायचा आहे, असे उमेदवार आता एमसीसी समुपदेशन पोर्टलद्वारे ऑनलाइन राजीनामा सादर करू शकतील. यासाठी त्यांना जागा मिळालेल्या संस्थेत प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता राहणार नाही, मात्र माहिती पुस्तिका  किंवा एमसीसीकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये अशी आवश्यकता नमूद केलेली असेल तर त्यानुसार कार्यवाही करावी लागेल.

या आढाव्यात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढीसाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजना अधोरेखित करण्यात आल्या. यामध्ये राष्ट्रीय परीक्षा संस्थे- (एनटीए) -कडून उमेदवारांची आधीच भरून घेतलेली माहिती उपलब्ध होणे, ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगा- (एनएमसी) -कडून प्रवेश जागांच्या मॅट्रिक्सची खात्री करून घेणे, तसेच समुपदेशन प्रक्रियेत सहभागी संस्थांकडून पडताळणी करून घेणे यांचा समावेश आहे.

दिव्यांग उमेदवारांसाठी प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या उमेदवारांसाठी अधिक सहजता, पारदर्शकता आणि मूल्यांकनात समानता निश्चित करण्याच्या उद्देशाने, देशभरातील नियुक्त मूल्यमापन केंद्रांची संख्या 16 वरून 61 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) यांच्याशी समन्वयाने सायबर सुरक्षा सज्जतेचा सर्वसमावेशक आढावा घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री नड्डा यांना यावेळी देण्यात आली. तसेच, देशभरात समुपदेशन प्रक्रिया एकसमान पद्धतीने राबविण्यासाठी दिव्यांग मूल्यमापन मंडळे, महाविद्यालयांतील नोडल अधिकारी आणि कागदपत्रे पडताळणी अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

उमेदवारांना सहाय्य आणि मार्गदर्शन करण्यासाठी 24×7 कार्यरत टोल-फ्री कॉल सेंटर (1800-102-7637) सुरू केले आहे.

राष्ट्रीय परीक्षा संस्थेने 16 जुलै 2026 रोजी नीट (यूजी) 2026 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. एमबीबीएस, बीडीएस आणि बीएस्सी (ऑनर्स) नर्सिंग या अभ्यासक्रमांच्या अखिल भारतीय कोट्याअंतर्गत प्रवेशासाठीची समुपदेशन प्रक्रिया लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे.


राधिका अघोर/तुषार पवार/रेश्मा बेडेकर/प्रिती मालंडकर


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2291483) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , हिन्दी , Gujarati