नौवहन मंत्रालय
भारत सागरी कर्मचाऱ्यांचा जगातील दुसरा सर्वात मोठा पुरवठादार देश बनला आहे
वर्ष 2015 मधील पाचव्या स्थानावरून 2026 मध्ये सागरी कर्मचाऱ्यांचा पुरवठा करणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनण्यापर्यंतची भारताची ही प्रगती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम आहे: सर्बानंद सोनोवाल
प्रविष्टि तिथि:
28 JUL 2026 8:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2026
'BIMCO-ICS सीफेअरर वर्कफोर्स रिपोर्ट 2026' नुसार, जागतिक जहाजवाहतूक उद्योगाला 3,11,936 सागरी व्यावसायिक पुरवून भारत सागरी कर्मचाऱ्यांचा जगातील दुसरा सर्वात मोठा पुरवठादार देश म्हणून नावारूपाला आला आहे. या अहवालानुसार, जागतिक सागरी मनुष्यबळात भारताचा वाटा आता 12.16% इतका आहे; या बाबतीत भारत फिलिपिन्स वगळता चीन, रशियन फेडरेशन आणि इंडोनेशिया यांच्या पुढे आहे.
ही कामगिरी भारताच्या सागरी क्षेत्राच्या इतिहासातील सर्वात उल्लेखनीय बदलांपैकी एक आहे. 2015 मध्ये, जागतिक सागरी कर्मचाऱ्यांमध्ये भारताचा वाटा केवळ 5.2% होता आणि चीन, फिलिपिन्स, इंडोनेशिया व रशियन फेडरेशनच्या मागे भारत पाचव्या स्थानावर होता. सहा वर्षांनी, 2021 मध्ये, भारताचा वाटा काहिसा वाढून 6% झाला, तरीही भारत पाचव्या स्थानावर कायम राहिला होता. मात्र, 2026 च्या BIMCO-ICS अहवालात निर्णायक प्रगती दिसून आली आहे. गेल्या दशकात भारताचा जागतिक वाटा दुप्पट होऊन 12.16% वर पोहोचला आहे, ज्यामुळे देशाला जागतिक स्तरावर दुसरे स्थान मिळाले आहे आणि कुशल सागरी व्यावसायिकांचा पुरवठा करणाऱ्या जगातील प्रमुख देशांपैकी एक अशी भारताची ओळख निर्माण झाली आहे.
भारताची ताकद विशेषतः ऑफिसर केडरमध्ये दिसून येते. भारत सध्या 1,40,718 अधिकारी पुरवतो, जे जागतिक अधिकारी मनुष्यबळाच्या 13.41% आहेत; तर 1,71,218 रेटिंग्ज अर्थात जहाजावरील इतर कर्मचारी हे व्यापारी जहाजांवर कार्यरत असलेल्या जागतिक मानांकनाच्या 11.29% आहेत. एकंदरित, भारतीय खलाशी आज जागतिक व्यापाराला आधार देणाऱ्या सर्वात मोठ्या आणि कुशल सागरी मनुष्यबळापैकी एक आहेत.
"2015 मध्ये जागतिक मनुष्यबळाच्या केवळ 5.2% वाटा असलेल्या आणि खलाशी पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत पाचव्या स्थानावर असलेल्या भारताची, 2026 पर्यंत 12.16% वाटा मिळवून जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सागरी मनुष्यबळ पुरवणारा देश बनण्यापर्यंतची ही प्रगती म्हणजे दूरदृष्टी, दृढनिश्चय आणि परिवर्तनशील नेतृत्वाची यशोगाथा आहे असे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. ही उल्लेखनीय प्रगती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान नेतृत्वामुळे शक्य झाली आहे; गेल्या बारा वर्षांतील त्यांच्या अटळ कटिबद्धतेमुळे भारताच्या सागरी परिसंस्थेचे रूप आमूलाग्र बदलले आहे, असे ते म्हणाले. जागतिक दर्जाचे सागरी शिक्षण आणि आधुनिक प्रशिक्षण पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यापासून ते खलाशांच्या सेवांचे डिजिटलायझेशन करणे, सागरी कायद्यांमध्ये सुधारणा करणे आणि जागतिक दर्जाचे निकष प्रस्थापित करणे यापर्यंत केलेल्या उपाययोजनांद्वारे केंद्र सरकारने हजारो तरुण भारतीयांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास आणि उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम केले आहे. आजची ही कामगिरी केवळ आकडेवारीतील एक टप्पा नाही, तर ती नव्या भारताची वाढती जागतिक विश्वासार्हता, आंतरराष्ट्रीय जहाज कंपन्यांचा भारतीय गुणवत्तेवर असलेला विश्वास आणि भारताला आघाडीचा सागरी देश म्हणून प्रस्थापित करण्याचा सर्वांचा सामूहिक संकल्प यांचे प्रतिबिंब असल्याचे सर्बानंद यांनी सांगितले.
* * *
शैलेश पाटील/पर्णिका हेदवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2290798)
आगंतुक पटल : 16