नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अमृतसर येथून 'हब अँड स्पोक' आंतरराष्ट्रीय विमान सेवांचा शुभारंभ केला
भारताच्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक केंद्र धोरणांतर्गत अमृतसर हे देशाचे दुसरे 'स्पोक' विमानतळ बनले
प्रविष्टि तिथि:
28 JUL 2026 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2026
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आज अमृतसर येथून 'हब अँड स्पोक' (Hub & Spoke) आंतरराष्ट्रीय विमान सेवांचे उद्घाटन केले, यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीसाठीच्या भारताच्या या नाविन्यपूर्ण 'हब अँड स्पोक' आराखड्यात समाविष्ट होणारे हे देशातील दुसरे विमानतळ ठरले आहे. भारतीय हब विमानतळांच्या माध्यमातून देशभरातील प्रवाशांना अखंड आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी प्रदान करून भारताला जागतिक विमान वाहतूक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या सरकारच्या धोरणाचा हा पुढील टप्पा ठरला आहे.
25 जून 2026 रोजी वाराणसी येथून भारतातील पहिल्या’ हब आणि स्पोक’ सेवेच्या यशस्वी प्रारंभानंतर हे उद्घाटन करण्यात आले. गेला महिनाभर ही प्रणाली सुरळीतपणे कार्यरत आहे, यामुळे या मॉडेलची परिचालन व्यवहार्यता दिसून आली असून प्रवाशांकडूनही त्याला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला. या कालावधीत, वाराणसी येथील प्रवासी दिल्लीमार्गे अठरा आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांशी अखंडपणे जोडले गेले असून, यावरून आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करण्याच्या या उपक्रमाची परिणामकारकता सिद्ध होते.

अमृतसर विमानतळावर उपस्थित असलेल्या सर्व लाभधारकांचे व्हिडिओ संदेशाद्वारे अभिनंदन करताना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू म्हणाले, “हब अँड स्पोक हे केवळ हवाई वाहतुकीचे मॉडेल नसून, ते एक संधीचे मॉडेल आहे. दिल्ली हे प्रमुख हब (केंद्र) असेल, तर अमृतसर हे पंजाब, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशासाठी एक प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार म्हणून उदयाला येईल. परदेशातील भारतीय समुदायाशी असलेले मजबूत संबंध आणि विस्तृत प्रादेशिक कार्यक्षेत्र, यामुळे, अमृतसर हे अशा भारतीय शहरांपैकी एक आहे, ज्याला जागतिक कनेक्टिव्हिटीतील या परिवर्तनाचा सर्वाधिक लाभ मिळेल.”
तीर्थयात्री, परदेशस्थ भारतीय, व्यावसायिक प्रवासी, तसेच पंजाब आणि आसपासच्या प्रदेशातील पर्यटक यांच्यासाठी भारताचे प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार म्हणून अमृतसरचे स्थान अद्वितीय आहे.

व्यापक राष्ट्रीय दृष्टीकोनावर भर देताना केंद्रीय मंत्री म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर स्पर्धात्मक हवाई वाहतूक केंद्र म्हणून स्वतःचे स्थान निर्माण करण्याच्या दिशेने काम करत आहे."
प्रवाशांना प्रवासाचा अधिक चांगला अनुभव देण्याबरोबरच, हा उपक्रम पर्यटन, व्यापार, गुंतवणूक आणि प्रादेशिक विकासाला बळकटी देऊन व्यापक आर्थिक लाभ मिळवून देईल, अशी अपेक्षा आहे. मंत्रालयाने केलेल्या अभ्यासातून असे दिसून येते की, विमान वाहतूक केंद्राच्या विकासामुळे सुमारे 0.4 दशलक्ष प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होऊ शकते, तसेच 2030 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेत 30 अब्ज डॉलर्सची अतिरिक्त भर पडू शकते. याचा एकत्रित प्रभाव 2047 पर्यंत, अंदाजे 16 दशलक्ष प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगराला चालना देईल तर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सुमारे 1.4 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचे योगदान देईल असा अंदाज आहे.

अमृतसरहून विमानसेवा सुरू झाल्यामुळे, आंतरराष्ट्रीय प्रवासी आता प्रवासाला निघण्यापूर्वीच अमृतसरमध्ये चेक-इन, इमिग्रेशन आणि कस्टम्सशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करू शकतील.
अमृतसरमधील आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीवरील हब अँड स्पोक मॉडेलचा परिवर्तनकारी प्रभाव अधोरेखित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले: आतापर्यंत, अमृतसरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना केवळ सात ठिकाणांसाठी थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध होती. 'हब अँड स्पोक' मॉडेल सुरू झाल्यावर आता, दिल्ली विमानतळाची जागतिक संपर्क-सुविधा प्रवाशांना थेट अमृतसरपासूनच उपलब्ध होईल. प्रवासी एकाच चेक-इन आणि एकाच बॅगेज टॅगसह 20 हून अधिक आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांपर्यंत प्रवास करू शकतील.
केवळ अमृतसरमधून दररोज सुमारे 250 प्रवाशांना दिल्लीमार्गे 'हब अँड स्पोक' मॉडेलचा लाभ घेऊन आंतरराष्ट्रीय प्रवास करता येईल, असा विमान कंपन्यांचा अंदाज आहे.

अमृतसर येथून 'हब अँड स्पोक' ऑपरेशन्सची सुरुवात होणे, हा भारताच्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक केंद्र धोरणाच्या टप्प्याटप्प्याने होत असलेल्या अंमलबजावणीमधील आणखी एक महत्वाचा टप्पा आहे. हा उपक्रम, परस्परांशी अधिक जोडलेली, कार्यक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक विमान वाहतूक परिसंस्था उभारून विकसित भारत @2047 चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.
* * *
नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2290357)
आगंतुक पटल : 22