पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026' मधील सहभागींशी साधला संवाद


या उपक्रमामुळे तरुणांमध्ये राष्ट्र उभारणीची अधिक तीव्र भावना निर्माण होत असल्याचे पाहून आनंद झाला: पंतप्रधान

विकसित गावे हाच विकसित भारताचा पाया आहे: पंतप्रधान

आपल्या सरकारने सीमावर्ती गावांना देशातील 'पहिले गाव' मानले आहे: पंतप्रधान

विकसित व्हायब्रंट व्हिलेजचा हा प्रवास... सर्वांना एकत्र जोडण्याचे आणि प्रत्येकाशी जोडले जाण्याचे एक माध्यम आहे: पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 26 JUL 2026 7:35PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम 2026' मधील सहभागींशी संवाद साधला. या उपक्रमाला देशभर मिळालेला प्रचंड प्रतिसाद अधोरेखित करत, त्यांनी देशभरातील सुमारे 250 जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उत्साही तरुण सहभागींचे मनापासून स्वागत केले.

काही वर्षांपूर्वी यशस्वीरित्या स्थापन झालेल्या 'मेरा युवा भारत – माय भारत' (MY Bharat) या मंचाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी, कोट्यवधी तरुणांना एकत्र जोडणाऱ्या या उपक्रमाचा झालेला व्यापक विस्तार कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

देशभरातील तरुणांच्या संघटित जाळे किंवा समूहाकडून केल्या जाणाऱ्या अत्यंत उल्लेखनीय कामाची प्रशंसा करताना, त्यांनी 'विकसित भारत संवाद' ते 'विकसित व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम'पर्यंत, राष्ट्रीय उपक्रमांमधील त्यांच्या सक्रिय सहभागाची आणि उत्कृष्ट कामगिरीची विशेष प्रशंसा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आज 'माय भारत'शी जोडलेले तरुण देशभरात उल्लेखनीय कार्य करत आहेत."

'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग'च्या वेळी या उपक्रमाची सुरुवात कशी झाली, याची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, तरुणांनी केवळ आभासी  संवादापुरते मर्यादित न राहता, तळागाळात जाऊन देशाचे वास्तव समजून घ्यावे, हा या उपक्रमामागील मूलभूत उद्देश होता. तरुणांना हिमाचल, उत्तराखंड आणि लडाखच्या सीमावर्ती गावांमध्ये पाठवण्याच्या उद्देशाविषयी सांगताना त्यांनी माहिती दिली की, तीन लाख सहभागींमधून 400 हून अधिक तरुणांची निवड करण्यात आली होती. तरुणांनी स्थानिक संस्कृतीशी एकरूप होत त्या भागातील देशभक्तीची भावना प्रत्यक्ष अनुभवावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.  "तुमच्या संस्कृतीचा आणि त्या भागातील संस्कृतीचा परिचय एकमेकांना करून देणे, हे 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चे सर्वोत्तम उदाहरण आहे”, असे मोदी यांनी  ठामपणे सांगितले. 

सरकारी पदभार स्वीकारण्यापूर्वी, मोठ्या प्रमाणात केलेल्या प्रवासादरम्यान, सीमावर्ती भागातल्या समुदायांशी निर्माण झालेल्या वरिष्ठ पातळीवरील घनिष्ठ वैयक्तिक संबधांना अधोरेखित करून पंतप्रधानांनी, सीमेवर तैनात सैनिकांसमवेत दिवाळी साजरी करण्याच्या त्यांच्या दीर्घकालीन परंपरेचा उल्लेख केला.

तरुणांना परतीच्या प्रवासात आलेले रोमांचक अनुभव आणि स्वतःचे अफाट अनुभव यांची सांगड घालत, स्थानिक लोकांकडून मिळालेले अफाट प्रेम आणि सशस्त्र दलांच्या अफाट शौर्याचा उल्लेख करत, त्यांनी कारगील विजय दिनानिमित्त सैनिकांनी केलेल्या मोठ्या त्यागाचे स्मरण केले. 'अत्यंत खडतर/आव्हानात्मक परिस्थितीत शूर जवानांनी विजयाचा ध्वज फडकवला आणि ‘विकसित व्हायब्रंट गावा'चा अनुभव खरोखरच अद्भुत असल्याचे निरीक्षण मोदींनी नोंदवले.

विकसित भारत घडवण्यासाठी विकसित गावे हा पाया असल्याचे सांगून, पंतप्रधानांनी गावांच्या परिवर्तनाच्या प्रवासाचे सातत्यपूर्ण आणि व्यापक स्वरूप अधोरेखित केले. तरुण पिढीच्या तळागाळातील सक्रिय सहभागावर भर देताना, सर्वसमावेशक राष्ट्रीय दृष्टीकोन केवळ विस्तारत नाहीये तर देशाच्या प्रगतीत अर्थपूर्ण योगदान देण्याचा त्यांचा वैयक्तिक संकल्पही दृढ होत आहे, यावर भर देतानाच पंतप्रधानांनी परस्पर संबंधांचे महत्त्वही अधोरेखित केले. "देशातली तरुणाई जेव्हा मातीशी नाळ जोडून रहाते, तेव्हा 'विकसित भारत' चा व्यापक दृष्टीकोन अधिक विस्तारतो यावर मोदींनी भर दिला.

सीमावर्ती भागात, आयुष्यात सामोरे जावे लागणाऱ्या कठीण परिस्थितीची दखल घेत, अशा परिस्थितीत जगणाऱ्या स्थानिकांची पंतप्रधांनांनी प्रशंसा केली आणि प्रतिकून परिस्थितीतही प्रत्येक क्षणी देशभक्ती जगत असल्याचे नमूद केले. रस्ते, वीज आणि रुग्णालये यांसारख्या मूलभूत सोयीसुविधांपासून उपेक्षित ठेवत, या भागांना अंतिम गावे म्हणत दुर्लक्षित ठेवणाऱ्या पूर्वीच्या प्रशासकीय उपेक्षेचा निषेध केला आणि स्थानिकांच्या अतूट राष्ट्रप्रेमाविषयी अभिमानाची भावना व्यक्त केली. 'गंभीर अभावग्रस्त परिस्थितीतही सीमावर्ती गावांमधील लोकांची देशभक्ती कधीच कमकुवत झाली नाही याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे', असे मोदी यावेळी म्हणाले.

सरकारच्या धोरणात्मक दृष्टिकोनातील मूलभूत बदल स्पष्ट करताना, पंतप्रधानांनी सीमावर्ती वसाहतींचे अधिकृतपणे भारताचे ‘शेवटचे’ गाव ऐवजी भारताचे ‘पहिले’गाव असे पुनर्नामकरण झाल्याबाबत आनंद व्यक्त केला. ज्या गावांवर सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणांचा आणि तिरंग्याचा सर्वप्रथम स्पर्श होतो, ती गावे आता देशाची ‘पहिली’ गावे म्हणून ओळखली जात आहेत, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच घडून आलेल्या अनेक ऐतिहासिक पायाभूत सुविधा विकास कामांचा उल्लेख करताना - वीज, रस्ते, नळाद्वारे पाणीपुरवठा, गॅस जोडण्या आणि उत्कृष्ट इंटरनेट सुविधा यांसह मूलभूत नागरी सुविधा पोहोचल्यामुळे सीमावर्ती भागातील रहिवाशांचे दैनंदिन जीवन आणि कृषी अर्थव्यवस्था आमूलाग्र बदलत आहेत, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. "ऐतिहासिक दृष्टिकोन बदलण्याच्या परिणामस्वरूपच आज आपला सीमावर्ती प्रदेश वेगाने बदलत आहे," असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.

नव्याने उभारलेल्या पायाभूत सुविधांमुळे मिळू लागलेल्या आर्थिक लाभांचा आढावा घेताना, पंतप्रधानांनी या प्रदेशातील पर्यटनाला मिळालेल्या मोठ्या चालनेवर प्रकाश टाकला. एकेकाळी ओस पडलेली गावे आज उत्साही आणि रंगीबेरंगी उपक्रमांनी फुलून गेल्याचे चित्र त्यांनी उभे केले. या बदलांमुळे मुलींच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण होत असून स्थानिक लोकांच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. हे सर्व परिवर्तन ‘व्हायब्रंट व्हिलेज’कार्यक्रमांतर्गत  नियोजनबद्ध पद्धतीने अधिक वेगाने घडून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. "सीमावर्ती गावांच्या सर्वांगीण विकासाला ‘व्हायब्रंट व्हिलेज’ कार्यक्रम सक्रिय आणि अभूतपूर्व नवी गती देत आहे," असे मोदी म्हणाले.

सीमावर्ती भागातील भेटी हे केवळ दौरे नसून, सहभागातून राष्ट्रीय ऐक्य अनुभवण्याचा एक अर्थपूर्ण प्रवास असल्याचे सांगताना, पंतप्रधानांनी परतलेल्या युवांना स्मरण करून दिले की, या प्रवासात त्यांना आदरातिथ्य तर लाभले आणि त्याबरोबरच भारतीय संस्कृतीविषयी सखोल माहिती, आत्मिक समाधान आणि अपार सन्मानही प्राप्त झाला.

सीमावर्ती भागांतील प्रत्यक्ष अनुभव वर्गखोल्यांमध्ये कधीही मिळू शकत नाही, सहभागी युवकांनी आपल्या सहकाऱ्यांना या सीमावर्ती गावांना भेट देण्यासाठी सक्रियपणे प्रेरित करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी  केले . या भागांमध्ये आधुनिक सुविधांचा विस्तार अधिक वेगाने होईल, असेही ते म्हणाले. भारतातील युवकांना सीमावर्ती गावांची जितकी सखोल ओळख होईल, तितका आपला देश अधिक सक्षम होईल , असे  मोदी यांनी नमूद केले. सीमावर्ती पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या विशेष प्राधान्याचा सक्रियपणे प्रसार करण्याचे आवाहन करताना, प्रत्येक सहभागीने आपले अनुभव किमान शंभर इतर युवकांपर्यंत पोहोचवावेत, असे पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितले.

स्थानिक संस्कृती आणि उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी स्थानिक आशय-निर्मात्यांशी सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. तसेच, इंटरनेटवर प्रामाणिक आणि वास्तवाधारित माहिती सामायिक करावी, भविष्यात कुटुंबासह या भागांना भेट देण्याचे नियोजन करावे आणि आपल्या शैक्षणिक संस्थांमार्फत शैक्षणिक सहलींचा आग्रह धरावा, असेही त्यांनी युवकांना आवाहन केले.

तुमच्यापैकी प्रत्येक युवा मित्राने आपले प्रत्यक्ष आणि प्रामाणिक अनुभव किमान शंभर इतर युवकांशी नक्कीच सामायिक करावेत, असा माझा ठाम आग्रह आहे, असेही,  मोदी म्हणाले. युवा पिढीवरील ठाम विश्वास व्यक्त करत आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी सांगितले की,

एकविसाव्या शतकातील वैश्विक चित्र घडविण्याचे खरे सामर्थ्य भारताच्या युवकांमध्ये आहे. विकसित भारताच्या उभारणीतील युवक हे एकाच वेळी प्रेरक शक्ती आणि त्याचे सर्वात मोठे लाभार्थी असल्याचे त्यांनी नमूद केले. देशासमोरील आव्हाने आणि त्यावरील उपाययोजनांशी युवकांचा थेट सहभाग वाढल्यास देशाचे भविष्य निश्चितच उज्ज्वल असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जेव्हा आपल्या युवकांची शक्ती देशाच्या आव्हानांशी आणि त्यांच्या उपाययोजनांशी थेट जोडली जाईल, तेव्हाच  देशाचे भविष्य निश्चितच उज्ज्वल असेल, असे मोदी यांनी सांगितले.

***

शैलेश पाटील/सुषमा काणे/आशुतोष सावे/विजयालक्ष्मी साळवी/रेश्मा बेडेकर/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2289703) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , Khasi , English , Urdu , हिन्दी , Assamese , Gujarati , Tamil , Malayalam