सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश

Posted On: 25 JUL 2026 6:04PM by PIB Mumbai

 

दक्षिण कोरियातील बुसान येथे सुरू असलेल्या 'जागतिक वारसा समिती'च्या 48 व्या बैठकीत, भारताने 2025-26 या वर्षाकरिता वारसा यादीत समावेशसाठी अधिकृतपणे नामांकन केलेल्या 'सारनाथ येथील प्राचीन बौद्ध स्थळाचा' युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून वारसास्थळ म्हणून मान्यता मिळालेले हे भारतातील 45 वे ठिकाण ठरले आहे. हा जागतिक सन्मान, भारताच्या चिरंतन सांस्कृतिक वारशाचा गौरव असून वास्तुशिल्पातील नैपुण्य, प्रादेशिक ओळख आणि ऐतिहासिक सातत्य यांसारख्या विविध परंपरा त्यातून अधोरेखित झाल्या आहेत.

 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या ऐतिहासिकदृष्ट्या उल्लेखनीय निर्णयाचे स्वागत केले असून या उपलब्धीबद्दल भारतीय जनतेचे अभिनंदन केले आहे.

सारनाथ येथील प्राचीन बौद्ध स्थळ

उत्तर प्रदेशातील वाराणसी परिसरात असलेल्या आणि जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेल्या या 'स्थळमालिके'त दोन मुख्य घटकांचा समावेश आहे: चौखंडी स्तूप आणि सारनाथचे पुरातत्वीय अवशेष (यामध्ये धमेख स्तूप, धर्मराजिका स्तूप, मूलगंधकुटी विहार, अशोक स्तंभ इत्यादींचा समावेश आहे). बौद्ध परंपरेत ऋषिपत्तन, इशिपत्तन, मृगदाव अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सारनाथ या स्थळी स्थापत्यकलाविषक आणि पुरातत्वीय अवशेष अशा दोन घटकांच्या रुपात प्राचीन अवशेषांचे जतन करण्यात आले आहे. या सर्व नावांवरून त्याचा पवित्र क्षेत्र म्हणून असलेला संदर्भ प्रस्थापित होतो, या स्थळाला भगवान बुद्धांनी इसवी सन पूर्व सहाव्या शतकात भेट दिली होती तसेच 'धम्मचक्र प्रवर्तन' म्हणून ओळखले जाणारे त्यांचे पहिले प्रवचनही त्यांनी याच ठिकाणी झाले होते. हीच घटना बौद्ध संघाचा आरंभ करणारी ठरून 'आर्य अष्टांगिक मार्गा'च्या तत्त्वांची स्थापना झाली होती.

स्वतः बुद्धांनी चार प्रमुख बौद्ध तीर्थस्थळांपैकी एक म्हणून सूचित केलेले सारनाथ हे ठिकाण राजघराणी, मठ आणि सामान्य अनुयायांच्या आश्रयाने अनेक शतके विकसित होत गेले. गौतम बुद्धांनी जिथे पहिले प्रवचन दिले आणि जिथे त्यांना त्यांचे पहिले काही शिष्य भेटले, ते स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाच्या आसपासच्या परिसरात अनेक स्तूप, मंदिरे आणि विहार बांधले गेले. 12 व्या शतकात सतत विनाश होत राहिल्याने हे स्थळ लयास गेले, त्यानंतर, 18 व्या शतकात पुन्हा शोध लागेपर्यंत हे ठिकाण विस्मृतीत गेले होते.

या ठिकाणी मौर्यपूर्व काळापासून (इ.स.पूर्व 5 वे-4 थे शतक ते इ.स.पूर्व 3 रे शतक) ते 12 व्या शतकात सारनाथचा विध्वंस होईपर्यंतच्या कालावधीत उभारलेल्या (यापैकी काही नंतरच्या काळात बांधलेल्या देखील) प्राचीन वास्तूंच्या समूहाचा समावेश आहे .

सारनाथ हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने सर्वाधिक व्यापक उत्खनन केलेल्या स्थळांपैकी एक आहे; या उत्खननामुळे 16 शतकांच्या (इसवी सन पूर्व 5 व्या-4 थ्या शतकापासून ते इसवी सन 12 वे शतक) कालखंडात तिथे वसलेल्या वस्तीबाबत माहिती देणारे विविध पदर उजेडात आले आहेत.

वारसास्थळ म्हणून मान्यता मिळाल्याने आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित करण्यातील एक दुवा म्हणून बौद्ध वारशाचा प्रसार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना अधिक हातभार लागण्यासोबतच भारताचे वारसा जतनातील कौशल्य आणि नामांकनाच्या प्रक्रियेतील सिद्धताही यातून दिसून येईल .

गेल्या वर्षी, पॅरिसयेथील युनेस्कोच्या मुख्यालयात झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47 व्या बैठकीत ‘भारतातील मराठा सैन्याच्या वारसा स्थळांचा (गड-किल्ले)’ जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला होता.

वारसास्थळांच्या यादीत 45 ठिकाणांच्या समावेशासह, सर्वाधिक 'जागतिक वारसा स्थळे' असलेल्या देशांमध्ये भारत जागतिक स्तरावर सहाव्या आणि आशिया-प्रशांत क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 196 देशांनी 'जागतिक वारसा करार, 1972' ला स्वीकृती दिली आहे.

***

राधिका अघोर/मंजिरी गानू/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2289432) अभ्यागत कक्ष : 136