आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
‘डिजिटल आरोग्य आणि जबाबदार ‘एआय’ प्रणालीच्या माध्यमातून रुग्णांच्या देखभालीतील सातत्याला बळकटी’ या विषयावर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून (NHA) ब्रिक्स संवादाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
24 JUL 2026 3:00PM by PIB Mumbai
16 व्या ब्रिक्स आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीचा एक भाग म्हणून, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) आज "डिजिटल आरोग्य नोंदींपासून ‘एआय’-सक्षम आरोग्य सेवेपर्यंत: परस्परसंवादी डेटा पायाभूत सुविधा आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे देखभालीतील सातत्याला बळकटी देणे" या विषयावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात ब्रिक्स देशांतील धोरणकर्ते, तांत्रिक तज्ज्ञ आणि आरोग्य क्षेत्रातील नेते एकत्र आले आणि त्यांनी अखंड, रुग्ण-केंद्रित आरोग्य सेवा प्रदान करण्यात डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधा आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या परिवर्तनात्मक भूमिकेवर विचारमंथन केले.
हा संवाद ब्रिक्स हेल्थ ट्रॅक टेक्निकल वर्किंग ग्रुप 4 (TWG-4) च्या 'कंटिन्युम ऑफ केअर' वरील संकलनाच्या निष्कर्षांवर आधारित होता. हे संकलन आरोग्याच्या विविध पातळ्यांवर, आरोग्य सेवा पुरवठादारांमध्ये आणि ब्रिक्स सदस्य देशांमध्ये समन्वित आणि अखंड आरोग्य सेवा वितरणाच्या महत्त्वावर भर देते. रुग्णाच्या देखभालीच्या एकूण प्रक्रिये अंतर्गत आरोग्यविषयक माहितीची अखंड देवाणघेवाण करण्यास सक्षम असलेल्या आंतरपरिचालनक्षम डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधांच्या अभावामुळे, देखभालीतील सातत्य हे सामायिक धोरणात्मक उद्दिष्ट असूनही, त्याची प्रभावी अंमलबजावणी अनेकदा मर्यादित राहते, या मुद्द्यावर या संकलनात प्रकाश टाकण्यात आला आहे.

गेल्या 2 दिवसांत झालेल्या चर्चांमधून लवचिक, समतुल्य आणि भविष्यासाठी सज्ज अशा आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी ब्रिक्स देशांची सामूहिक कटिबद्धता दिसून आली आहे, असे आपल्या बीजभाषणात केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले. परस्पर शिक्षण, सामायिक नवोन्मेष आणि सार्वत्रिक आरोग्य संरक्षण (UHC) साध्य करण्याच्या सामायिक वचनबद्धतेवर आधारित आरोग्य सहकार्य हा ब्रिक्स भागीदारीच्या सर्वात मजबूत स्तंभांपैकी एक राहिला आहे, असे त्यांनी नमूद केले.
कोणताही देश ‘एआय’-सक्षम आरोग्यसेवेचे भविष्य एकट्याने तयार करू शकत नाही, परंतु ब्रिक्स देशांसमोर मोठी आणि वैविध्यपूर्ण लोकसंख्या, ग्रामीण-शहरी भागातील मोठी तफावत, जुनाट आणि असंसर्गजन्य आजारांचा वाढता भार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण यासारखी समान आव्हाने आहेत, असे केंद्रीय आरोग्य सचिवांनी नमूद केले. ही आव्हाने लक्षात घेता, एकात्मिक आणि लोक-केंद्रित आरोग्य सेवा वितरण मजबूत करण्यासाठी परस्परसंवादी डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधा आणि जबाबदार ‘एआय’ ही आवश्यक साधने ठरतात, असे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाच्या बरोबरीने, ब्रिक्स सदस्य देश आणि भागीदार राष्ट्रांचे प्रतिनिधी व तज्ज्ञांचा समावेश असलेली एक उच्चस्तरीय पॅनेल चर्चा देखील आयोजित करण्यात आली. यामध्ये आंतरपरिचालनक्षम डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधा आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे देखभालीतील सातत्य बळकट करण्याबाबतचे अनुभव आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्यात आली.

कृत्रिम बुद्धिमत्ता आरोग्य सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी अमाप संधी उपलब्ध करून देत असली, तरी तिचा सुरक्षित आणि प्रभावी वापर हा उच्च-दर्जाचा परस्परसंवादी आरोग्य डेटा आणि स्थानिक पातळीवर सत्यापित वैद्यकीय पुराव्यांवर अवलंबून असतो, यावर पॅनेलने भर दिला. ‘एआय’-सक्षम आरोग्य सेवा उपायांचा विस्तार करण्यापूर्वी ब्रिक्स देशांनी मजबूत गव्हर्नन्स फ्रेमवर्क, डेटा गुणवत्ता, आंतरपरिचालनक्षमतेची मानके, प्रमाणीकरण यंत्रणा, सायबर सुरक्षा, आरोग्य कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी आणि शाश्वत वित्तपुरवठा यामध्ये गुंतवणूक करण्याची गरज उपस्थितांनी व्यक्त केली.

***
सुषमा काणे/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2288937)
आगंतुक पटल : 13