युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडामंत्र्यांच्या बैठकीला केले संबोधित
मानवाधिकारांचा आदर करणाऱ्या आणि सर्वांसाठी संधी निर्माण करणाऱ्या सुरक्षित, सर्वसमावेशक आणि न्याय्य क्रीडा प्रणालींप्रति भारताची वचनबद्धता दृढ: डॉ. मांडविया
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2026 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2026
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडामंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमधील सहकार्यासाठी सदस्य राष्ट्रांच्या नेतृत्वाखालील अधिक मजबूत चौकटीचे आवाहन केले.
"एकत्र काम करण्याची पुनर्कल्पना: क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रकुल सहकार्य बळकट करणे" या विषयावर मुख्य भाषण करताना डॉ. मांडविया यांनी राष्ट्रकुलमधील क्रीडा प्रशासन, खेळाडूंचे कल्याण आणि संस्थात्मक क्षमता या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबतची भारताचा दृष्टिकोन मांडला.

राष्ट्रकुल खेळांप्रति भारताच्या दीर्घकालीन वचनबद्धतेवर प्रकाश टाकत मंत्री म्हणाले की देश अहमदाबाद येथे 2030 च्या शताब्दी राष्ट्रकुल खेळांचे आयोजन करण्याची तयारी करत आहे.
डॉ. मांडविया यांनी प्रशासकीय सुधारणा, बळकट केलेली उत्तेजक द्रव्यविरोधी यंत्रणा आणि खेलो इंडिया, फिट इंडिया व अस्मिता लीग यांसारख्या प्रमुख उपक्रमांची रूपरेषाही मांडली. हे उपक्रम तळागाळातील प्रतिभेला प्रोत्साहन देत आहेत, खेळांमध्ये महिलांचा सहभाग वाढवत आहेत आणि देशभरात एक चैतन्यमय क्रीडा संस्कृती जोपासत आहेत, असे ते म्हणाले.
मंत्र्यांचे निर्णय कृतीत उतरवण्यासाठी एक वार्षिक व्यासपीठ म्हणून राष्ट्रकुल क्रीडा समन्वय मंच स्थापन करण्यास तसेच ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता बांधणीला प्रोत्साहन देण्यासाठी सदस्य राष्ट्रांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रकुल उत्कृष्टता केंद्रांचे जाळे उभारण्यास भारताचा भक्कम पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

"2030 पर्यंतच्या कालावधीत बैठका, तांत्रिक कार्यशाळा आणि प्रादेशिक सल्लामसलत आयोजित करण्यास भारत आनंदाने तयार आहे," असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले की प्रस्तावित सदस्य-नेतृत्वाखालील दृष्टिकोन हा क्रीडा प्रशासनातील भारताच्या स्वतःच्या सुधारणांचे प्रतिबिंब आहे.
डॉ. मांडविया यांनी 2030 च्या शताब्दी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याच्या भारताच्या सज्जतेचा पुनरुच्चार केला आणि सांगितले की या खेळांची एक ऐतिहासिक, शाश्वत आणि संस्मरणीय आवृत्ती आयोजित करण्यासाठी अहमदाबाद पूर्णपणे तयार आहे.
ते म्हणाले की अहमदाबादची जागतिक दर्जाची क्रीडा पायाभूत सुविधा आणि उत्कृष्टतेप्रती असलेली वचनबद्धता ही एक जागतिक क्रीडा महासत्ता म्हणून भारताची वाढती प्रतिष्ठा आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय बहु-क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्याची क्षमता प्रतिबिंबित करते.

त्यांनी प्रस्तावित नेतृत्व प्रारूपालाही पाठिंबा दिला, ज्यानुसार आगामी यजमान राष्ट्र हे राष्ट्रकुल क्रीडामंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद सांभाळेल तर सह -अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अध्यक्षांकडे असेल.
आपल्या भाषणाचा समारोप करताना डॉ. मांडविया यांनी राष्ट्रकुल राष्ट्रांना भागीदारी अधिक दृढ करण्याचे तसेच सामाजिक विकासासाठी खेळाच्या सामर्थ्याचा उपयोग करणाऱ्या चिरस्थायी संस्था उभारण्याचे आवाहन केले.
“आपण चिरस्थायी संस्था उभारूया, फलदायी सहकार्य अधिक दृढ करूया आणि भावी पिढ्यांसाठी खेळाच्या परिवर्तनकारी शक्तीचा उपयोग करून घेऊया. मानवाधिकारांचा आदर करणाऱ्या आणि सर्वांसाठी संधी निर्माण करणाऱ्या सुरक्षित, सर्वसमावेशक आणि न्याय्य क्रीडा प्रणालींप्रति भारत आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करत आहे,” असेही ते म्हणाले.

* * *
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2288284)
आगंतुक पटल : 16