सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
'नमस्ते' ( NAMASTE) योजना प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याला सन्मानाने, सुरक्षिततेसह आणि सामाजिक सुरक्षेच्या कवचाखाली काम करता यावे, यासाठी केंद्र सरकारच्या अढळ वचनबद्धतेचे प्रतीक
ही योजना 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास' या संकल्पनेशी सुसंगत: केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार
प्रविष्टि तिथि:
19 JUL 2026 7:53PM by PIB Mumbai
भारत सरकार देशभरात यांत्रिकीकृत स्वच्छता व्यवस्थेला गती देतानाच स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, सन्मान आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय यांत्रिकीकृत स्वच्छता परिसंस्था अभियान (NAMASTE) हा प्रमुख उपक्रम राबवत आहे.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय तसेच गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा उद्देश गटारे आणि सेप्टिक टाक्यांची धोकादायक पद्धतीने हाताने साफसफाई करण्याची प्रथा पूर्णपणे बंद करून, यांत्रिकीकृत स्वच्छतेला प्रोत्साहन देणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौशल्यविकास करणे आणि त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी विविध उपाययोजना राबविणे हा आहे.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी सांगितले. 'नमस्ते' (NAMASTE) योजना ही प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याला सन्मानाने, सुरक्षिततेसह आणि सामाजिक सुरक्षेच्या कवचाखाली काम करता यावे, यासाठी केंद्र सरकारच्या अढळ वचनबद्धतेचे प्रतीक आहे, असे त्यांनी नमूद केले. यांत्रिकीकृत स्वच्छतेला प्रोत्साहन, कौशल्यविकास, आरोग्य सेवा आणि उपजीविकेसाठी आवश्यक पाठबळ यांच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम अधिक सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रतिष्ठेचा व्यवसाय बनविण्याबरोबरच स्वच्छता कामादरम्यान होणारे मृत्यू पूर्णपणे शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने सरकार वाटचाल करत आहे, असे वीरेंद्र कुमार यांनी सांगितले.
या योजनेअंतर्गत झालेल्या अलीकडील प्रगतीनुसार, 89,915 गटार आणि सेप्टिक टाकी स्वच्छता कर्मचाऱ्यांची तसेच 2,81,117 कचरा वेचकांची पडताळणी करण्यात आली आहे. तसेच, गटार आणि सेप्टिक टाकी स्वच्छता कर्मचाऱ्यांना 87,037 पीपीई किट्स आणि कचरा वेचकांना 1,84,118 पीपीई किट्स वितरित करण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत 76,845 गटार आणि सेप्टिक टाकी स्वच्छता कर्मचाऱ्यांना तसेच 1,04,729 कचरा वेचकांना आरोग्य कार्डांचे वितरण करण्यात आले आहे. याशिवाय, देशभरातील आपत्कालीन स्वच्छता सेवांची क्षमता अधिक बळकट करण्यासाठी 753 आपत्कालीन प्रतिसाद स्वच्छता युनिट्स आधुनिक सुरक्षा उपकरणांनी सुसज्ज करण्यात आली आहेत.
***
शैलेश पाटील/वैभवी जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2286397)
आगंतुक पटल : 23