अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

लिथुआनियातील विल्नियस येथे 12-19 जुलै 2026 दरम्यान झालेल्या 37 व्या आयबीओ 2026 मध्ये भारतीय संघाने 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांची केली कमाई

प्रविष्टि तिथि: 19 JUL 2026 1:42PM by PIB Mumbai

 

लिथुआनियाची राजधानी विल्नियस येथे 12 जुलै ते 19 जुलै 2026 दरम्यान झालेल्या 37 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड (आयबीओ) 2026 मध्ये भारताने उत्कृष्ट कामगिरी केली असून यात सहभागी झालेल्या सर्व 4 विद्यार्थ्यांनी 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकांची कमाई केली आहे.

पदक विजेते :

भव्या गुणवाल (सुवर्ण) - महेंद्रगड, हरियाणा

सौमिल मैती (रौप्य) - हावडा, पश्चिम बंगाल

निशित कलानी (रौप्य) - पाली, राजस्थान

अनमोल कुमार (रौप्य) - मानसा, पंजाब

या संघासोबत दोन मार्गदर्शक होत्या: प्रा. रेखा वर्तक (निवृत्त, एचबीसीएसई-टीआयएफआर, मुंबई) आणि डॉ. अनुपमा रोनाड (एचबीसीएसई-टीआयएफआर), तसेच दोन वैज्ञानिक निरीक्षक देखील होते: डॉ. रणजितसिंह देवकर (एम. एस. विद्यापीठ, बडोदा) आणि डॉ. सिद्धेश घाग (यूएम-डीएई सेंटर ऑफ एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस, मुंबई).

या वर्षीच्या आयबीओ’मध्ये 78 देशांतील 307 विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेत एकूण 31 सुवर्ण, 61 रौप्य आणि 91 कांस्य पदके प्रदान करण्यात आली.

आयबीओ 2026 मधील परीक्षा विल्नियस विद्यापीठाच्या लाइफ सायन्सेस सेंटरने कुशलतेने तयार केल्या होत्या. माध्यमिक स्तरावरील जीवशास्त्राच्या ज्ञानाची आणि प्रयोग कौशल्याची कसोटी पाहणाऱ्या या परीक्षा अत्यंत कठीण स्वरूपाच्या होत्या. एकूण सहा तास चाललेल्या या प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये, विद्यार्थ्यांना चार अत्यंत विशेषीकृत क्षेत्रांमध्ये गुंतागुंतीची, प्रत्यक्ष प्रायोगिक कामे करणे आवश्यक होते. 

मॉलिक्युलर बायोलॉजी अँड बायोकेमिस्ट्री प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांनी बायोकेमिकल एन्झाइम चाचणीसोबतच प्लाझमिड्सचे रिस्ट्रिक्शन डायजेशन आणि ॲगारोज जेल विश्लेषण केले. 

ॲनिमल फिजिओलॉजी प्रयोगशाळेत त्यांना संस्थेमध्येच विकसित केलेल्या ॲप आणि लाइट बॉक्स कलरमीटरचा वापर करून ॲस्पिरिनच्या फार्माकोकायनेटिक्सचे मूल्यांकन करायचे होते आणि कृत्रिम रक्ताच्या नमुन्यांमध्ये उत्पादनाच्या विघटनाचे प्रमाण निश्चित करायचे होते. 

ॲनिमल मॉर्फोलॉजी अँड सिस्टिमॅटिक्स प्रयोगशाळेत, स्पर्धकांना वर्गीकरणासाठी कीटकांच्या नमुन्यांच्या सिस्टिमॅटिक्सचे विश्लेषण करणे आवश्यक होते. यात कीटकाच्या तोंडाच्या भागांचे अचूक विच्छेदन समाविष्ट होते. 

शेवटी, प्लांट कॉम्प्युटेशनल बायोलॉजी प्रयोगशाळेने अत्याधुनिक डिजिटल विश्लेषणाची ओळख करून दिली. यामध्ये विद्यार्थ्यांना इमेज-जे (ImageJ) सॉफ्टवेअरचा वापर करून वनस्पतींच्या मुळांची लांबी मोजणे, विविध वनस्पती इकोटाइप्सचे उच्च-मितीय मॅक्रोफेनोटाइप विश्लेषण करणे आणि गुंतागुंतीचे ट्रान्सक्रिप्टोम विश्लेषण करणे ही कामे दिली होती.

प्रात्यक्षिक विभागाला पूरक म्हणून, तितकीच तीव्र अशी सहा तासांची सैद्धांतिक परीक्षा तीन-तीन तासांच्या दोन स्वतंत्र सत्रांमध्ये घेण्यात आली. सैद्धांतिक भागात 100 अत्यंत आव्हानात्मक प्रश्न विचारलेले होते. हे प्रश्न वास्तविक संशोधन डेटा आणि क्षेत्रीय अभ्यासाच्या विश्लेषणावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होते. सहभागी विद्यार्थ्यांच्या केवळ साध्या स्मरणशक्तीची चाचणी घेण्याऐवजी, या प्रश्नांनी पेशी आणि रेणू जीवशास्त्र, वनस्पती आणि प्राणी विज्ञान, अनुवंशशास्त्र आणि उत्क्रांती, पर्यावरणशास्त्र, वर्तनशास्त्र आणि जैवप्रणालीशास्त्र यांसारख्या प्रमुख जीवशास्त्रीय शाखांमधील प्रगत समस्या-निवारण कौशल्यांचे मूल्यांकन केले.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व भारतीय विद्यार्थ्यांचे आणि उर्वरित भारतीय प्रतिनिधी मंडळाचे अभिनंदन केले जात आहे. एचबीसीएसई येथे आयोजित अभिमुखता आणि प्रस्थानपूर्व शिबिरांदरम्यान विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्याबद्दल देशभरातील शिक्षक आणि मार्गदर्शक तसेच एचबीसीएसईच्या जीवशास्त्र ऑलिम्पियाड कक्षाचे कौतुक केले जात आहे. ऑलिम्पियाड कार्यक्रमाला सतत भक्कम पाठिंबा देणारी राष्ट्रीय सुकाणू समिती, सर्व शिक्षक संघटना आणि भारत सरकारच्या निधीपुरवठा करणाऱ्या संस्थांचे योगदान देखील महत्त्वाचे ठरले.

आयबीओ मध्ये भारताचा हा 26 वा सहभाग होता. आतापर्यंत भारताच्या 104 विद्यार्थ्यांनी या ऑलंपियाड मध्ये भाग घेतला असून त्यापैकी– 17 जणांना सुवर्णपदक, 69 जणांना रौप्यपदक, 17 जणांना कांस्यपदक तर एकाला विशेष उल्लेखनीय पदक मिळाले आहे. 

गेल्या दहा वर्षांत सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवण्याचे प्रमाण अनुक्रमे 25% आणि 68% राहिले आहे.

भारतीय संघातील सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शकांशी सोमवार, दिनांक 20 जुलै 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता एचबीसीएसई येथील व्ही. जी. कुलकर्णी सभागृहात अनौपचारिक संवाद साधता येणार आहे.

***

नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2286350) आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Telugu