युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक लाख तरुण नेते घडवण्याचे स्वप्न 'माय भारत'च्या माध्यमातून साकार होत आहे: डॉ. मनसुख मांडविया
'संवादाशिवाय समाधान नाही': चिंतन शिबिरात राज्यमंत्री संरक्षण खडसे यांचे वक्तव्य
प्रविष्टि तिथि:
18 JUL 2026 5:28PM by PIB Mumbai
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा व्यवहार विभागाने, 'मेरा युवा भारत' (माय भारत) च्या माध्यमातून, लखनौ येथील इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये "विकसित युवा बनवेल विकसित भारत (विकसित युवा फॉर विकसित भारत)" या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय चिंतन शिबिराचा प्रारंभ केला. अशा प्रकारचे हे चौथे चिंतन शिबिर आहे. राष्ट्रीय विकासाच्या प्रवासाला गती देणारी एक सक्षम आणि भविष्यासाठी सज्ज युवा परिसंस्था निर्माण करण्याच्या धोरणांवर विचारविनिमय करण्यासाठी युवा व्यवहार विभाग, माय भारत, माय भारत राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच जिल्हा युवा अधिकारी, प्रादेशिक संचालक आणि मध्य विभागातील क्षेत्रीय कार्यकर्ते या शिबिरात एकत्र जमले आहेत.

शिबिराच्या उद्घाटन सत्रात केंद्रीय युवक व्यवहार, क्रीडा आणि कामगार, रोजगार मंत्री मनसुख मांडविया, युवक व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे तसेच माय भारत आणि एनएसएसचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विविध विभागांमध्ये चिंतन शिबिर आयोजित करण्यामागील उद्देश म्हणजे तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये संवाद, सहकार्य आणि सामायिक शिक्षणाची संस्कृती निर्माण करणे असल्याचे शिबिरात प्रमुख भाषण देताना मनसुख मांडविया यांनी सांगितले. "चिंतन म्हणजे विचारांचा संग्रह. संवादाला चालना देण्यासाठी आम्ही हे शिबिर आयोजित केले आहे, कारण संवादाशिवाय स्पष्टता येऊ शकत नाही आणि स्पष्टतेशिवाय प्रभावी अंमलबजावणी होऊ शकत नाही," असेही ते म्हणाले.

माय भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असल्याचे मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले. विकसित भारत @2047 या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी देशाचे नेतृत्व करू शकणाऱ्या सक्षम युवा नेतृत्वाची पिढी घडवण्यासाठी हे व्यासपीठ स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. समाजाच्या प्रत्येक घटकातून एक लाख युवा नेतृत्व घडवण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेचा उल्लेख करताना, माय भारत हे युवकांना नेतृत्व, चारित्र्य-घडण आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात गुंतवत असल्याचेही डॉ. मांडविया यांनी सांगितले.
जिल्हा युवा अधिकारी आणि राष्ट्रीय सेवा योजना पदाधिकाऱ्यांनी कर्तव्यभाव आणि सेवा या भावनेने, पंचप्राण या संकल्पनेशी सुसंगतपणे काम करावे आणि स्वतःची भूमिका युवकांच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शकाची असल्याचे समजावे, असे आवाहन डॉ. मनसुख मांडविया यांनी केले. आपल्या कामाकडे केवळ नोकरी म्हणून पाहू नका, या देशातील युवकांना योग्य दिशा देणे आणि त्यांचे सक्षमी
करण करणे ही तुमची जबाबदारी आहे. अधिकारी म्हणून नव्हे, तर सेवाभावाने काम केल्यास त्याचे परिणाम नेहमीच अधिक चांगले मिळतात, असे ते म्हणाले.
तळागाळापर्यंत अधिक व्यापक संपर्क करतांनाच, जिल्हा युवा अधिकाऱ्यांनी 15 ऑगस्टपर्यंत सुरू असलेली माय भारत नोंदणी मोहीम अधिक वेगाने राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. यासाठी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि स्थानिक समुदायांपर्यंत पोहोचावे असे त्यांनी सांगितले. पात्र असलेल्या प्रत्येक युवकांपर्यंत माय भारतचा विस्तार करा, त्यांना या व्यासपीठाशी जोडा आणि आपल्या बांधिलकीच्या भावनेतून तसेच तळागाळातील सक्रिय सहभागाच्या माध्यमातून या नोंदणी मोहिमेचे देशव्यापी लोकचळवळीत रूपांतर करा, असे ते म्हणाले.

दोन कोटींहून अधिक नोंदणीसह माय भारत हे देशातील सर्वांत मोठे युवा व्यासपीठ बनले असून, राष्ट्रनिर्मितीप्रति युवकांची वाढती बांधिलकी त्यातून दिसून येते, असे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या. वेगवेगळ्या राज्यांतील अधिकाऱ्यांना तळागाळातील कामाचे अनुभव एकमेकांशी सामायिक करण्यासाठी, अंमलबजावणीतील अडचणींवर चर्चा करण्यासाठी आणि त्यावर एकत्रितपणे व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत, चिंतन शिबिर या उपक्रमाने संवादाच्या माध्यमातून प्रशासन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्या म्हणाल्या. संवादाशिवाय समाधान होऊ शकत नाही. तळागाळात काम करणाऱ्या आपल्या अधिकाऱ्यांच्या अनुभवांतूनच सर्वोत्तम उपाय मिळतात, असे खडसे यांनी सांगितले.
केंद्र आणि राज्यांच्या समन्वयातून तळागाळातील युवकांचा सहभाग अधिक बळकट करण्यासाठी मंत्रालय कटिबद्ध असल्याचा खडसे यांनी पुनरुच्चार केला. विकसित व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाचा उल्लेख करत त्या म्हणाल्या की, या कार्यक्रमामुळे युवा स्वयंसेवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सेवेची भावना अधिक दृढ झाली आहे. आपण सर्वांनी एकाच ध्येयाने एकत्र काम केले, तर विकसित भारताचा संकल्प निश्चितपणे पूर्ण करू. युवकांशी संबंधित उपक्रम तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी मंत्रालय प्रत्येक अधिकाऱ्याला सातत्याने सहकार्य करत राहील, असेही त्या म्हणाल्या.
***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2286161)
आगंतुक पटल : 16