श्रम आणि रोजगार मंत्रालय
ईपीएफओ ने नुकसानभरपाई/दंड-विषयक वादांच्या सामंजस्यपूर्ण निपटाऱ्यासाठी "विश्वास, 2026"उपक्रम सुरू केला
Posted On:
17 JUL 2026 1:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,17 जुलै 2026
केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयांतर्गत असलेल्या 'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने'ने (ईपीएफओ) "विश्वास 2026" हा सामंजस्याने वाद निवारणाचा एक वन टाईम उपक्रम सुरू केला आहे. 'कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायदा, 1952 च्या कलम 14B आणि 'सामाजिक सुरक्षा संहिता, 2020' च्या कलम 128 अंतर्गत नुकसानभरपाई किंवा दंडाशी संबंधित वाद सामंजस्यपूर्णरीत्या मिटवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
ही योजना 'ईपीएफ (EPF) योजना, 2026' चा एक भाग म्हणून 29 जून 2026 रोजीच्या जी.एस.आर. (G.S.R.) 525(E)) द्वारे अधिसूचित करण्यात आली असून, ती 29 जून 2026 पासून अंमलात आली आहे. अधिसूचनेच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी ही योजना लागू राहील.
कर्मचाऱ्यांचे हित जपतानाच स्वेच्छेने नियमांचे पालन करण्यास प्रोत्साहन देणे, कायदेशीर वाद कमी करणे आणि दंड/भरपाईशी संबंधित दीर्घकाळ प्रलंबित वादांचे जलद गतीने निराकरण करणे या उद्देशांनी 'विश्वास, 2026' ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना नियोक्त्यांना पारदर्शक, पूर्णपणे डिजिटल आणि कालमर्यादित प्रक्रियेद्वारे पात्र प्रकरणे निकाली काढण्याची संधी देते.
या योजनेमध्ये प्रकरणांच्या चार मुख्य श्रेणी समाविष्ट आहेत:
- दंड/भरपाईचे आदेश ज्यांच्या विरोधात न्यायालयीन मंचासमोर आव्हान देण्यात आले आहे;
- दंड/भरपाईचे अंतिम आदेश ज्यांची वसुली प्रलंबित आहे किंवा अंशतःच झाली आहे (यात 'रिकव्हरी सर्टिफिकेट' प्रकरणांचाही समावेश आहे);
- अशी प्रकरणे ज्यात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत परंतु दंड/भरपाईचे अंतिम आदेश अद्याप जारी झालेले नाहीत; आणि
- अशी प्रकरणे ज्यात दंड/भरपाईसाठी नोटिसा अद्याप बजावल्या गेल्या नाहीत.
'विश्वास' 2026 अंतर्गत, 14 जून 2024 पूर्वीच्या कालावधीतील चूक किंवा त्रुटींसाठी आकारले जाणारे दंड किंवा नुकसानभरपाईची रक्कम लक्षणीयरीत्या कमी दराने पुन्हा निश्चित केली जाईल. हे दर खालीलप्रमाणे असतील: दोन महिन्यांपर्यंतच्या कालावधीतील चुकीसाठी दरमहा 0.25 %, दोन ते चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी दरमहा 0.50 %, आणि चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी दरमहा 1.00 %. या सवलतीच्या दरांचा उद्देश नियोक्त्यांना प्रलंबित वाद त्वरित निकाली काढण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्ज सादर करण्यापूर्वी नियोक्त्यांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, 'ईपीएफ अँड एमपी ॲक्ट,1952 ' (EPF & MP Act, 1952) च्या कलम 7Q किंवा 'कोड ऑन सोशल सिक्युरिटी, 2020 च्या कलम 127 यापैकी जे लागू असेल त्यानुसार - देय असलेले संपूर्ण व्याज जमा करण्यात आले आहे. तसेच, या योजनेअंतर्गत निकाली काढलेल्या वादाबाबत यापुढे कोणतेही अपील केले जाणार नाही, असे हमीपत्र सादर करणे अर्जदारांसाठी अनिवार्य आहे.
या योजनेत नुकसानभरपाई किंवा दंडापोटी आधीच भरलेल्या रकमेचे समायोजन, अपील दाखल करण्यासाठी अनिवार्य असलेली पूर्व-ठेव रक्कम यांचे नियमन आणि प्रलंबित प्रकरणांचा न्याय्य व पारदर्शक पद्धतीने निपटारा यांबाबतच्या तपशीलवार तरतुदींचा समावेश आहे. मात्र , ज्या आस्थापनांकडून दंड किंवा नुकसानभरपाईची रक्कम आधीच पूर्णपणे वसूल करण्यात आली आहे, तसेच फसवणूक, अपहार किंवा जाणीवपूर्वक नोंदींमध्ये फेरफार केल्याची प्रकरणे आणि लागू असलेले कायदेशीर व्याज पूर्णपणे जमा न झालेली प्रकरणे या योजनेच्या कक्षेतून वगळण्यात आली आहेत.
'विश्वास 2026' अंतर्गत अर्ज 'ईपीएफओ एम्प्लॉयर पोर्टल'वर 'डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट' किंवा 'ई-साइन' वापरून ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया अर्ज सादर करण्यास सुलभता, ऑनलाइन पडताळणी, डिजिटल प्रक्रिया आणि निश्चित कालमर्यादेत निपटारा आदेश जारी करणे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे.
योजनेची सुरळीत अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी, ईपीएफओने आपल्या सर्व विभागीय, प्रादेशिक आणि जिल्हा कार्यालयांना सविस्तर कार्यान्वयन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नियोक्त्यांना सहाय्य करण्यासाठी, अर्जांवर जलदगतीने प्रक्रिया करण्यासाठी आणि वेळेवर निपटारा सुनिश्चित करण्यासाठी, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये समर्पित 'विश्वास कक्ष' स्थापन केले जात आहेत. योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विभागीय आणि मुख्य कार्यालय स्तरावर नियमित देखरेख ठेवली जाईल.
प्रलंबित नुकसान भरपाई किंवा दंडाशी संबंधित विवादांचे निराकरण करण्यासाठी, अनुपालन नियमित करण्यासाठी आणि अधिक कार्यक्षम व वादमुक्त सामाजिक सुरक्षा प्रशासनासाठी योगदान देण्यासाठी, सर्व पात्र नियोक्त्यांनी या एक-वेळच्या संधीचा पुरेपूर उपयोग करावा, असे आवाहन ईपीएफओ ने केले आहे.
आशिष सांगळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2285768)
अभ्यागत कक्ष : 10