राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय वन सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

प्रविष्टि तिथि: 17 JUL 2026 4:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,17 जुलै 2026

भारतीय वन सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज (17 जुलै, 2026) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्र येथे भेट घेतली.

हे अधिकारी केवळ वनांचे प्रशासक नाहीत तर भारताच्या नैसर्गिक वारशाचे रक्षक आहेत, असे राष्ट्रपतींनी या अधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितले. आजच्या काळात त्यांच्या भूमिकेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. जग सध्या हवामान बदल आणि जैव विविधतेचा होणारा ऱ्हास यांसारख्या आव्हानांना सामोरे जात आहे. या आव्हानांना तोंड देण्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये वने ही केंद्रस्थानी आहेत. त्यामुळेच भारतीय वन सेवेच्या अधिकाऱ्यांचे कार्य केवळ भारताच्या पर्यावरण सुरक्षेलाच नव्हे तर शाश्वत विकासासाठी सुरु असलेल्या जागतिक प्रयत्नांमध्ये देखील योगदान देते, असे त्या म्हणाल्या. वने ही पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा पाया असून युवा अधिकाऱ्यांनी वनक्षेत्र वाढवण्यावर अधिकाधिक भर द्यावा असे आवाहन त्यांनी केले.

पर्यावरणीय संरक्षणाचा समतोल जंगलात आणि जंगलाच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांच्या न्याय्य आकांक्षा आणि गरजांशी साधला गेला पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. विकास आणि जतन या गोष्टींकडे परस्परविरोधी उद्दिष्टे म्हणून बघता कामा नये. निसर्ग आणि समाज एकत्रितपणे समृद्ध होऊ  शकतील अशा प्रकारचे उपाय युवा अधिकाऱ्यांनी शोधावेत असे आवाहन त्यांनी केले. वनसंवर्धन, पुनर्वसन आणि शाश्वत उपजीविका यांसारख्या उपक्रमांमध्ये लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी त्यांना प्रेरित करण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. आदिवासी जमाती, महिला, शेतकरी आणि स्थानिक संस्था यांची मते आणि प्रश्न समजून घेतल्यास त्यांना मौल्यवान मार्गदर्शन मिळेल, वनसंरक्षणामध्ये स्थानिक समुदायांना भागीधार   म्हणून सहभागी करून घेतल्यास संवर्धनाचे प्रयत्न अधिक परिणामकारक आणि दीर्घकालीन ठरतील, असेही त्यांनी सांगितले.  

लोकसेवा  ही लोकांचे जीवनमान उंचावणारी आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी असते, असे राष्ट्रपती म्हणाल्या. पर्यावरणीय सुरक्षा ही 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाचा एक अविभाज्य भाग आहे.भारताची प्रगती ही हरित, सर्वसमावेशक आणि शाश्वत असेल याची सुनिश्चीती करण्यात भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांची आणि युवा अधिकाऱ्यांची भूमिका निर्णायक असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

भारतीय वन सेवेच्या दोन तुकड्यांमधील प्रशिक्षणार्थी सध्या डेहराडून येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमीमध्ये त्यांचे व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहेत. 2024 च्या तुकडीत 111 अधिकारी प्रशिक्षणार्थी आहेत, तर 2025 च्या तुकडीत 131 अधिकारी प्रशिक्षणार्थी असून, प्रत्येक तुकडीत भूतानमधील दोन अधिकारी प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.


निलीमा चितळे/भक्‍ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

   सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2285764) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Malayalam