सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सामुदायिक सहभाग आणि देशव्यापी जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून 'नशा मुक्त भारत अभियान’ पोहोचले देशातील 29.32 कोटींहून अधिक नागरिकांपर्यंत 


11.20 कोटींहून अधिक युवक आणि 7.92 कोटी महिलांचा समावेश; शैक्षणिक संस्थांमध्ये 21 लाखांहून अधिक जनजागृतीपर उपक्रम आयोजित

प्रविष्टि तिथि: 16 JUL 2026 6:54PM by PIB Mumbai

 

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय,  'नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर ड्रग डिमांड रिडक्शन' (एनएपीडीडीआर) या अंमली पदार्थांच्या व्यसनात घट आणण्यासाठीच्या राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत, 15 ऑगस्ट 2020 रोजी सुरू केलेल्या 'नशा मुक्त भारत अभियान' या प्रमुख उपक्रमाद्वारे अंमली पदार्थमुक्त भारत घडवण्याच्या आपल्या वचनबद्धतेची सातत्याने पूर्तता करत आहे. हे अभियान अंमली पदार्थांच्या गैरवापराविरुद्ध देशव्यापी चळवळ उभारून जनजागृती निर्मिती, सामुदायिक सहभाग, उपचार, पुनर्वसन, काळजी आणि सामाजिक पुनर्रचना याद्वारे अंमली पदार्थांच्या सेवनाला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करते.

सुरुवातीला 272 संवेदनशील जिल्ह्यांमध्ये सुरू झालेली ही मोहीम आता संपूर्ण देशभरात विस्तारली आहे. सातत्यपूर्ण जनजागृती आणि सामुदायिक एकत्रिकरणाच्या उपक्रमांमुळे हे अभियान तब्बल 29.32 कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचले आहे. यामध्ये 11.20 कोटींहून अधिक युवक आणि 7.92 कोटी महिलांचा समावेश आहे. या अभियाना अंतर्गत देशातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये 21 लाखांहून अधिक जनजागृती उपक्रम राबवले गेले आहेत. यात, अंमली पदार्थमुक्त जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी, विद्यार्थी, शिक्षक आणि तरुण स्वयंसेवकांना सामावून घेण्यात आले आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले की, 'नशा मुक्त भारत अभियान' हे निरोगी आणि शिस्तबद्ध तरुण पिढी घडवण्यावर लक्ष केंद्रित करणारा, देशातील राष्ट्र उभारणीचा अग्रगण्य उपक्रम आहे.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, ही मोहीम तरुणांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आधुनिक पद्धतींचा वापर करते. तसेच अंमली पदार्थमुक्त भारत घडवण्याच्या समान उद्दिष्टासाठी विविध मंत्रालये, राज्य सरकारे आणि संबंधित घटकांचे प्रयत्न एकत्र आणते.

मंत्रालयाने एनएपीडीडीआर अंतर्गत उपचार आणि पुनर्वसन सेवा मोठ्या प्रमाणात बळकट केल्या असून, त्याचा लाभ 28.29 लाखांहून अधिक लोकांनी घेतला आहे. या सेवांवरील वाढता विश्वास उपचारासाठी येणाऱ्या लोकांच्या संख्येवरून स्पष्ट दिसून येतो. 2020 मध्ये उपचारासाठी आलेल्या 2.08 लाख लोकांची संख्या 2025 मध्ये 8.20 लाखांहून अधिक झाली असून, त्यात 294 टक्क्यांची वाढ झाली आहे.

मंत्रालयाची 'ड्रग डि-अ‍ॅडिक्शन हेल्पलाईन' – 14446 ही अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबियांना समुपदेशन, माहिती आणि संदर्भ सेवा पुरवण्याचे काम सातत्याने करत आहे. या हेल्पलाईनला 4.60 लाखांहून अधिक कॉल्स आले असून, मदत मागणाऱ्यांसाठी हा पहिला आधार बिंदू ठरला आहे.

या प्रयत्नांना बळ देण्यासाठी मंत्रालयाने 'नशा मुक्त भारत अभियान' (एनएमबीए) प्रतिज्ञा आणि 'नशा मुक्ती मित्र' हे उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांद्वारे प्रत्येक नागरिकाला अंमली पदार्थांविरोधातील राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. प्रतिज्ञा घेणारे नागरिक 'नशा मुक्ती मित्र' म्हणून स्वतःची नोंदणी करू शकतात आणि देशभरात जनजागृती आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून योगदान देऊ शकतात.

मंत्रालयाने सर्व नागरिक, शैक्षणिक संस्था, युवक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील विविध घटकांना आवाहन केले आहे की, त्यांनी 'नशा मुक्त भारत प्रतिज्ञा' घ्यावी, 'नशा मुक्ती मित्र' म्हणून नोंदणी करावी, जनजागृती उपक्रम राबवावेत आणि व्यसनाधीन व्यक्तींना 'ड्रग डी-ॲडिक्शन हेल्पलाईन' 14446 द्वारे वेळेवर मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशा प्रकारे या देशव्यापी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.

***

निलिमा चितळे/आशुतोष सावे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2285573) आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam