वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
कोडेक्स आयोगात मसाल्यांसाठी तीन जागतिक मानकांच्या स्वीकारासह भारताने गाठला महत्त्वाचा टप्पा
मसाल्यांसाठी नवीन कोडेक्स मानकांमुळे बाजारपेठेत प्रवेश होईल सुलभ आणि भारताच्या निर्यातक्षमतेला मिळेल चालना
प्रविष्टि तिथि:
16 JUL 2026 7:00PM by PIB Mumbai
स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे 6 ते 10 जुलै 2026 दरम्यान झालेल्या कोडेक्स अॅलिमेंटेरियस आयोगाच्या (CAC49) एकोणपन्नासाव्या सत्रात मसाला वेलची, धणे आणि व्हॅनिलासाठी तीन कोडेक्स मानके स्वीकारण्यात आल्याने भारताने आंतरराष्ट्रीय अन्न मानक-निर्धारण क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
अन्न आणि कृषी संघटना (एफ ए ओ) आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू एच ओ) यांनी संयुक्तपणे स्थापन केलेला कोडेक्स अॅलिमेंटेरियस आयोग (सी ए सी) म्हणजे ग्राहकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या तसेच अन्न व्यापारात योग्य पद्धती सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने विज्ञान-आधारित अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानके विकसित करण्यासाठी जबाबदार असलेली आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
पाच कोडेक्स वस्तू समित्यांपैकी एक असलेल्या 'कोडेक्स मसाला आणि स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पती समिती'चे (CCSCH) यजमानपद भूषवून भारत कोडेक्स उपक्रमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो, ज्याचे सचिवालय म्हणून 'स्पाइसेस बोर्ड' काम पाहते. ऑक्टोबर 2025 मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या CCSCH च्या आठव्या सत्रादरम्यान मसाला वेलची, धणे आणि व्हॅनिला यांची मानके निश्चित करण्यात आली होती.
नव्याने स्वीकारलेल्या मानकांमुळे या मसाल्यांसाठी सुसंगत आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मापदंड स्थापित झाले आहेत आणि जागतिक बाजारपेठांमध्ये गुणवत्तेच्या आवश्यकतांमध्ये एकरूपता येऊन व्यापार अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. मसाला वेलची आणि धणे यांचा जगातील प्रमुख उत्पादक आणि निर्यातदारांपैकी एक असलेल्या भारतासाठी या मानकांमुळे बाजारपेठेतील प्रवेशात सुधारणा होईल, न्याय्य व्यापार पद्धतींना प्रोत्साहन मिळेल आणि निर्यातीमधील स्पर्धात्मकता वाढेल, अशी अपेक्षा आहे.
मसाला वेलचीसाठी कोडेक्स मानकाचा स्वीकार विशेष महत्त्वाचा आहे कारण हे पीक मूलतः भारताच्या ईशान्य हिमालयीन प्रदेशातील आहे. धणे या मसाल्याचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदारांपैकी एक म्हणून भारताचे स्थान पाहता, धण्यासाठीचे कोडेक्स मानक देखील महत्त्वाचे आहे. सध्या भारत आपल्या व्हॅनिलाच्या गरजेचा मोठा हिस्सा आयात करत असला तरी व्हॅनिलासाठीचे कोडेक्स मानक जागतिक स्तरावर स्वीकारलेली गुणवत्ता चौकट प्रदान करते, जी आंतरराष्ट्रीय व्यापारात सुसंगतता आणेल आणि ग्राहकांचा विश्वास दृढ करेल.
या सत्रादरम्यान, आयोगाने नवीन खाद्यपदार्थांच्या जोखीम विश्लेषणाबाबत धोरणात्मक मार्गदर्शन तयार करण्यासाठी 'इलेक्ट्रॉनिक वर्किंग ग्रुप' (ईडब्ल्यूजी) ची स्थापना केली आणि युरोपियन युनियनकडे याचे अध्यक्षपद सोपवले. या गटाचे सह-अध्यक्ष म्हणून काम करण्याची भारताची विनंती स्वीकारण्यात आली, ज्यामुळे देशाचे वाढते तांत्रिक नैपुण्य आणि आंतरराष्ट्रीय अन्न मानकांच्या विकासातील सक्रिय योगदान दृग्गोचर झाले.
या घडामोडी विज्ञान-आधारित आंतरराष्ट्रीय अन्न मानकांना चालना देणे, न्याय्य व्यापाराला प्रोत्साहन देणे, ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे आणि भारतीय कृषी व अन्न उत्पादनांची जागतिक स्पर्धात्मकता वाढवणे यांप्रति भारताची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित करतात.
***
सोनाली काकडे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2285567)
आगंतुक पटल : 8