कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयसीएआरने गेल्या वर्षभरात 44 पिकांचे 386 सुधारित वाण केले विकसित, ज्यात 94% हवामान-प्रतिरोधक आणि 29 जैवसंवर्धित वाणांचा समावेश : शिवराज सिंह चौहान

प्रविष्टि तिथि: 16 JUL 2026 4:38PM by PIB Mumbai


भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) आज नवी दिल्ली येथे आपला 98 वा स्थापना दिवस साजरा केला आणि 'विकसित भारत 2047' चे स्वप्न साकार करण्यासाठी विज्ञान-आधारित, हवामान-अनुकूल तसेच शेतकरी-केंद्रित कृषी विकासाला चालना देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

वर्ष 1928 मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेची स्थापना झाली होती. त्याची आठवण म्हणून दरवर्षी 16 जुलै रोजी आयसीएआर स्थापना दिवस साजरा केला जातो. आयसीएआरने गेल्या 98 वर्षांमध्ये भारताची कृषी संशोधन, शिक्षण आणि विस्तार प्रणाली मजबूत करण्यात, तांत्रिक नवकल्पनांना चालना देण्यात, उत्पादकता वाढविण्यात, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यात तसेच राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह, प्रा. एस. पी. सिंह बघेल, भागीरथ चौधरी आणि राम नाथ ठाकूर हे सन्माननीय पाहुणे होते.

उपस्थितांना संबोधित करताना शिवराज सिंह चौहान यांनी आयसीएआरचे वर्णन भारताच्या कृषी परिवर्तनाचा अग्रदूत असे केले.  परिषदेचे वैज्ञानिक संशोधन आणि नवकल्पना यांनी अन्नधान्य, फलोत्पादन, दूध आणि मत्स्य उत्पादन या क्षेत्रांमधील देशाच्या विक्रमी कामगिरीत महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले.   आयसीएआरने गेल्या वर्षभरात 44 पिकांचे 386 सुधारित वाण विकसित केले आहेत, त्यापैकी 94% हवामान-अनुकूल आणि 29 जैवसंवर्धित आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.  "शेतकरी हे कृषी क्षेत्राचा आत्मा आहेत तर शास्त्रज्ञ तिचा मेंदू आहेत," असे सांगत त्यांनी मागणी-आधारित संशोधन, हवामान-अनुकूल शेती, कडधान्ये आणि तेलबियांमध्ये आत्मनिर्भरता, दर्जेदार कृषी शिक्षण, तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण आणि कृषी विज्ञान केंद्रांच्या जाळ्याद्वारे नवनवीन शोधांचा व्यापक प्रसार करण्याची गरज अधोरेखित केली.

तंत्रज्ञानाचे जलद हस्तांतरण प्रयोगशाळांमधून शेतकरी, पशुपालक आणि मच्छिमारांपर्यंत सुनिश्चित व्हावे, यादृष्टीने कृषी विज्ञान केंद्रांच्या जाळ्याच्या माध्यमातून संशोधनाची व्याप्ती वाढवण्याचे आवाहन राजीव रंजन सिंह यांनी केले.

रामनाथ ठाकूर यांनी 'विकसित भारत' संकल्पना साकार करण्यासाठी वैज्ञानिक संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आयसीएआर महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहील, असा विश्वास व्यक्त केला.

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी, जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि कडधान्ये व तेलबियांच्या बाबतीत आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी विज्ञान-आधारित संशोधन, नैसर्गिक शेती तसेच शेतकरी-केंद्रित नवोन्मेषाची आवश्यकता भागीरथ चौधरी यांनी अधोरेखित केली. प्रा. एस. पी. सिंह  बघेल यांनी,  'विकसित भारत@2047' ही संकल्पना केवळ विज्ञान-आधारित शेती, प्रगत तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाद्वारेच साकार होऊ शकते, असे सांगितले. 

या प्रसंगी सुधारित पिकांचे 43 वाण, 17 प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि 14 प्रकाशने यांचे अनावरण  करण्यात आले. तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण आणि शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या वितरणाला गती देण्यासाठी 51 उद्योग भागीदारांसोबत 72 सामंजस्य करार करण्यात आले. यामुळे आयसीएआरने विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत अधिक वेगाने हस्तांतरित होण्यास मदत होईल.

***

सोनाली काकडे/राधिका अघोर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2285455) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Kannada , Malayalam