युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माय भारत अंतर्गत 'विकसित भारतासाठी नशा मुक्त युवा'या संकल्पनेवर देशभरात ‘विकसित भारत युवा कनेक्ट कार्यक्रमा’चे आयोजन

प्रविष्टि तिथि: 15 JUL 2026 7:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,15 जुलै 2026

'विकसित भारत@ 2047' आणि 'नशामुक्त भारत' घडवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून, भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे 'माय भारत' च्या माध्यमातून, 16 जुलै ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ या विशेष संकल्पनेखाली 'विकसित भारत युवा कनेक्ट कार्यक्रम' (व्हीबीवायसीपी) आयोजित केला जाईल.

देशाच्या युवा वर्गाला 'विकसित भारता'च्या संकल्पनेशी जोडणे, आणि त्याचबरोबर अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण करणे, हे या महिनाभर चालणाऱ्या देशव्यापी उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. नागरी सहभाग आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृती, यांची सांगड घालून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा वर्गाला स्वस्थ, जबाबदार आणि अंमली पदार्थमुक्त भारताचे दूत बनण्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न असेल.  

या कार्यक्रमात माय भारत प्लॅटफॉर्मवर परस्परसंवादी सत्र, सादरीकरणे, जागरूकता उपक्रम आणि डिजिटल सहभागाद्वारे विद्यार्थ्यांना सहभागी केले जाईल. 'विकसित भारत @ 2047' चे स्वप्न साकार करण्यासाठी अंमली पदार्थ-मुक्त समाज, ही मूलभूत बाब आहे, हे समजून घेऊन तरुणांना राष्ट्र उभारणीत सक्रियपणे योगदान देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग' (व्हीबीवायएलडी) मधील राज्य-स्तरीय विजेते, 'विकसित भारत युवा संसद'चे विजेते, एनएसएस पुरस्कार विजेते, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते आणि इतर यशस्वी युवा नेते यांच्यासह प्रतिष्ठित 'युवा आयकॉन्स', शैक्षणिक संस्थांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. ते भारताच्या विकासाच्या प्रवासाबाबतचे विचार मांडतील आणि अंमली पदार्थांचा गैरवापर वैयक्तिक आकांक्षा, सामाजिक कल्याण आणि राष्ट्रीय प्रगतीपुढे गंभीर आव्हान कसे निर्माण करते यावर प्रकाश टाकतील. सहभागी युवक अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे प्रभावित झालेल्या व्यक्ती आणि कुटुंबांचे अनुभव दर्शवणारा, विशेष जनजागृतीपर चित्रपट पाहतील, आणि त्यानंतर 'नशा मुक्त भारत' प्रतिज्ञा घेऊन, निरोगी जीवन जगण्याच्या आणि देशाच्या विकासात योगदान देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतील. या मोहिमेचा प्रभाव आणखी वाढवण्यासाठी शक्य तेथे स्वयंसेवी संस्था आणि ध्यात्मिक संस्थांच्या सहयोगाने 'रिकव्हरी वॉरियर्स', म्हणजेच व्यसनावर मात करणाऱ्यांचे वैयक्तिक अनुभवही यात समाविष्ट केले जातील.

युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी, कार्यक्रमाच्या ठिकाणी ' माय भारत (MY Bharat)’ सुविधा कक्ष उभारली जातील, याद्वारे 'माय भारत' पोर्टलवर त्वरित नोंदणी करणे आणि सहभागींना संस्थेच्या विविध युवा विकास उपक्रमांची माहिती देणे शक्य होईल. बॅनर्स, स्टँडीज आणि डिजिटल प्रसिद्धीच्या माध्यमातून व्यापक पोहोच, यामुळे देशभरात या मोहिमेची व्याप्ती आणखी वाढेल.

या कार्यक्रमात प्रामुख्याने ग्रामीण, शहरी आणि आदिवासी समुदायातील 15 ते 25 वयोगटातील युवा वर्गाचा सहभाग असेल. तरुणांचा सातत्यपूर्ण सहभाग सुनिश्चित करण्यासाठी आणि भविष्यातील 'माय भारत' (MY Bharat) उपक्रमांच्या अंमलबजावणीला चालना देण्यासाठी, सहभागी संस्था कालांतराने 'माय भारत'च्या शाखा स्थापन करू शकतात. नोंदणी आणि कार्यक्रमाशी संबंधित सर्व उपक्रम 'माय भारत' पोर्टलच्या माध्यमातूनच पार पाडले जातील.


माधुरी पांगे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2285080) आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam