रेल्वे मंत्रालय
भारताची रेल्वे मालवाहतूक अधिक मजबूत करण्यासाठी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रिफॉर्म एक्सप्रेस मिशन अंतर्गत, आठ आणखी संरचनात्मक सुधारणांचा केला शुभारंभ
लॉजिस्टिक खर्च कमी करणे, पुरवठा साखळी सुधारणे, खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन आणि स्वच्छ मालवाहतूकीला चालना देण्यासाठी नव्या धोरणांची सुरुवात
प्रविष्टि तिथि:
14 JUL 2026 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2026
रेल्वेच्या रिफॉर्म एक्सप्रेसची गती कायम ठेवत, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी, भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठीच्या आणखी आठ संरचनात्मक सुधारणांची घोषणा केली. या घोषणेसोबतच, या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत केलेल्या सुधारणांची संख्या आता 17 पर्यंत पोहोचली आहे. या नव्या सुधारणा, मालवाहतूक, लॉजिस्टिक्स, बांधकाम पद्धत, प्रकल्पाची अंमलबजावणी, वॅगन रचना, कौशल्य विकास आणि व्यवसाय सुलभता या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडून येतील.

देशात भविष्यासाठी सज्ज अशी रेल्वे यंत्रणा उभी करण्यासाठी, भारतीय रेल्वे, अनेक सुधारणा हाती घेत आहे, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत रेल भवन इथे माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. रेल्वेची कार्यक्षमता वाढविणे, नवोन्मेषाला चालना देणे आणि रेल्वे व्यवस्था अधिक बळकट करणे या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने 52 आठवड्यांत 52 सुधारणा राबवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, या सुधारणा त्याचाच भाग आहेत. रिफॉर्म एक्सप्रेस उपक्रमांतर्गत यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या सुधारणांचे उत्साहवर्धक परिणाम दिसू लागल्याचेही वैष्णव यांनी यावेळी सांगितले.

सुधारणा 10 – फ्लाय अॅश (राख) वाहतूक
अश्विनी वैष्णव म्हणाले,औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या फ्लाय ॲशची वाहतूक पारंपरिकरित्या खुल्या मालवाहू डब्यांमधून केली जात असल्याने ती डब्यात भरताना , वाहतूक आणि उतरवतांना धुळीमुळे वायू प्रदूषणाची समस्या निर्माण होत होती. या समस्येवर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने फ्लाय ॲशच्या वाहतुकीसाठी नवीन कंटेनरयुक्त वाहतूक प्रणाली सुरू केली आहे.
सुधारणा 11- कंटेनर क्षेत्रात सुधारणा
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेने कंटेनर ट्रेन ऑपरेटर परवाना पद्धतीत महत्वाची संरचनात्मक सुधारणा केली आहे.
सध्याच्या व्यवस्थेनुसार कंटेनर ट्रेन ऑपरेटर (CTO) परवाने चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये दिले जात होते. आता त्याऐवजी संपूर्ण देशासाठी लागू होणारा एकसंध देशव्यापी कंटेनर ट्रेन ऑपरेटर परवाना लागू करण्यात आला आहे.
सुधारणा 12 : खते वाहतूक
कृषी क्षेत्रासाठी खतांच्या वाहतुकीचे महत्त्व अधोरेखित करत, वैष्णव यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेद्वारे सध्या, एकूण वाहतुकीपैकी 85 टक्के खतांची वाहतूक देशभरात केली जाते.
सध्याच्या मालवाहतूक शुल्क व्यवस्थेत, 50 विविध श्रेणी आहेत, त्यामुळे कार्यान्वयन प्रक्रिया अत्यंत किचकट झाली आहे. नव्या सुधारणेनुसार मालवाहतूक शुल्क प्रति टन प्रति किलोमीटर या आधारावर निश्चित करण्यात आले असून, दररचनेचे तर्कसंगत सुलभीकरण करून ती केवळ तीन श्रेणींमध्ये मर्यादित करण्यात आली आहे.
या सुधारणेद्वारे, कंटेनरद्वारे खतांची वाहतूक करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. कंटेनरयुक्त वाहतुकीमुळे मालवाहू वॅगनचा वापर अधिक कार्यक्षम होईल, रेक्स थांबून राहण्याचे प्रमाण कमी होईल, खतांचे वितरण लवचिक पद्धतीने करणे शक्य होईल, पाऊस आणि इतर हवामानामुळे होणाऱ्या नुकसानापासून खतांचे संरक्षण होईल आणि एकूणच लॉजिस्टिक्स व्यवस्थेची कार्यक्षमता वाढेल, असेही वैष्णव यांनी सांगितले.
सुधारणा 13 : रेल्वे प्रकल्प व कामांमध्ये कारागिरांच्या कौशल्य विकासासाठीचे धोरण
सुधारणा 14 : बांधकाम क्षेत्रातील सुधारणा
सुधारणा 15 : मालवाहू वॅगन रचना मंजुरीसाठीचे धोरण
सुधारणा 16 : पेट्रोलियम उत्पादनांचे वाहतूक धोरण
यांचाही यामध्ये समावेश आहे.
अश्विनी वैष्णव म्हणाले की सध्याच्या ज्या प्रणाली अंतर्गत भारतीय रेल्वेकडे सर्व टँक वॅगन्सची मालकी होती, त्या प्रणालीमुळे तेल कंपन्यांना आपल्या परिचालन गरजांशी अनुकूल असणाऱ्या विशेष वॅगन्स चालवण्याच्या लवचिकतेवर मर्यादा येत होत्या.
यावर उपाय म्हणून भारतीय रेल्वेने पेट्रोलियम टँक वॅगनचे आरेखन आणि समावेश यावर नियंत्रण ठेवणारे संरचनात्मक अडथळे दूर केले आहेत.
सुधारणा 17: अन्नधान्य, पीठ आणि कडधान्यांची वाहतूक
वैष्णव म्हणाले की भारतीय रेल्वेने मालवाहतूक शुल्करचना सुलभ करून आणि कंटेनरयुक्त वाहतुकीला प्रोत्साहन देऊन अन्नधान्य, पीठ आणि कडधान्यांच्या वाहतुकीमध्ये मोठी सुधारणा देखील आणली आहे.
पूर्वीची मालवाहतुकीची स्लॅब-आधारित गुंतागुंतीची दररचना बदलून नवीन धोरणांतर्गत प्रति टन प्रति किलोमीटर अशी सुलभ दररचना लागू करण्यात आली आहे. या सुधारणेमुळे अन्नधान्य, पीठ आणि कडधान्ये यांची कंटेनरद्वारे वाहतूक करण्यास परवानगी मिळते, ज्यामुळे सुलभ हाताळणी, लवचिक साठवण आणि परिचालन गरजेनुसार टप्प्याटप्प्याने वितरण शक्य होते.
वैष्णव म्हणाले की नवीन सुधारणांमुळे मालवाहतुकीचा मोठा हिस्सा रस्तेमार्गाकडून रेल्वेकडे वळण्यास मदत होईल, ज्यामुळे लॉजिस्टिक्सचा खर्च कमी होईल आणि महत्त्वपूर्ण पर्यावरणीय फायदेही मिळतील.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/राधिका अघोर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2284660)
आगंतुक पटल : 27