माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेकरिता भविष्याभिमुख मनुष्यबळ निर्मिती' या विषयावर पीआयबी तर्फे 'वार्ता' या एकदिवसीय माध्यम कार्यशाळेचे आयोजन


सर्जनशील अर्थव्यवस्थेमध्‍ये जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यासाठी भारत आपल्या समृद्ध कथाकथन परंपरेचा लाभ घेईल: आयआयसीटी मुंबई संचालक मंडळ सदस्य डॉ. आशिष कुलकर्णी यांचे प्रतिपादन

प्रविष्टि तिथि: 14 JUL 2026 6:21PM by PIB Mumbai

नागपूर, 14 जुलै 2026

 

"चित्रपट निर्माते, डिजिटल आशय निर्माते आणि इतर सर्जनशील व्यावसायिक अत्यंत प्रगत दर्जाचा आशय (कंटेट) तयार करत आहेत आणि जागतिक 'ऑरेंज इकॉनॉमी'मध्ये भारताचे स्थान उंचावण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. सध्या, जागतिक 'ऑरेंज इकॉनॉमी'मध्ये भारताचा वाटा सुमारे 3 टक्के आहे आणि पुढील दशकात हा वाटा 12 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे देशाचे उद्दिष्ट आहे. आयआयसीटी म्हणजेच 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी'  हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यरत आहे," असे प्रतिपादन ‘आयआयसीटी’च्या संचालक मंडळाचे सदस्य डॉ. आशिष कुलकर्णी यांनी आज नागपूर येथे केले.

याप्रसंगी, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक (पश्चिम विभाग) स्मिता वत्स शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या 'प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो' (पीआयबी- पत्र सूचना कार्यालय) द्वारे नागपूर येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित 'भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी भविष्याभिमुख मनुष्यबळ निर्मिती' या विषयावरील 'वार्ता' या एकदिवसीय माध्यम कार्यशाळेत डॉ. कुलकर्णी बोलत होते. स्मिता वत्स शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेला विविध माध्यम संस्थांचे वरिष्ठ संपादक आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

डॉ. कुलकर्णी यांनी माहिती दिली की राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एन सी ई आर टी) सहकार्याने आयआयसीटी विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच सर्जनशीलता जोपासण्यासाठी आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी 'कौशल बोध' हा अभ्यासक्रम सुरू करणार आहे. त्यांनी असेही सांगितले की, देशभरातील 500 महाविद्यालये आणि 15,000 शाळांमध्ये एव्हीजीसी कंटेंट क्रिएटर प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.

त्यांनी पुढे सांगितले की आयआयसीटी जुलै 2025 पासून मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एन एफ डी सी) संकुलातून एव्हीजीसी-एक्सआर (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी) क्षेत्रासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र म्हणून कार्यरत आहे. ही संस्था हब-अँड-स्पोक मॉडेलद्वारे ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटीमध्ये कौशल्य-आधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे. हे कार्यक्रम केवळ मुंबई मुख्यालयातच नव्हे तर प्रादेशिक आणि निमशहरी केंद्रांमार्फतही उपलब्ध होतील.

भारताची कथाकथनाची समृद्ध परंपरा आणि स्वदेशी ज्ञानप्रणाली अधोरेखित करताना डॉ. कुलकर्णी म्हणाले की हे ज्ञान आता विविध माध्यमांवरील डिजिटल सामग्रीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर सादर केले जात आहे. भारत सरकारची विविध मंत्रालये सृजनशील क्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी चित्रपट आणि सृजनशील संस्थांसोबत मिळून विशेष अभ्यासक्रम विकसित करत आहेत, जेणेकरून कौशल्य विकास आणि क्षमतावृद्धीसाठी नवीन संधी निर्माण होतील. 

स्वागतपर भाषण मुंबई पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी स्वामी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम आणि दूरसंवाद अधिकारी सौरभ खेकडे यांनी केले तर पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम आणि दूरसंवाद अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) धनंजय वानखेडे यांनी आभार प्रदर्शन केले.

 

* * *

पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2284582) आगंतुक पटल : 51
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , Telugu , English , Urdu , हिन्दी , Punjabi