पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला केले संबोधित

प्रविष्टि तिथि: 11 JUL 2026 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 जुलै 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑकलंड येथे 'किया ओरा मोदी' कार्यक्रमात न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाच्या विशाल मेळाव्याला संबोधित केले. मोदी यांचा विशेष सन्मान म्हणून न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा मेळावा 10,000 हून अधिक भारतीय समुदायाच्या सदस्यांच्या स्नेह, ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला होता.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात, पंतप्रधान लक्सन यांच्या उपस्थितीबद्दल आणि भारत – न्यूझीलंड द्विपक्षीय संबंध तसेच न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाच्या कल्याणासाठी केलेले सहकार्य याबाबत लक्सन यांचे आभार मानून केली. समुदायाने केलेल्या विशेष स्वागताबद्दल पंतप्रधान मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय समुदायाने न्यूझीलंडच्या विकासात दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.

न्यूझीलंडमधील भारतीय समुदाय एक गतिमान शक्ती म्हणून उदयास आला असून न्यूझीलंडमधील जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. न्यूझीलंडच्या बहुसांस्कृतिक जडणघडणीला समृद्ध करत आपली संस्कृती, सण आणि परंपरा जतन केल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय समुदायाचे कौतुक केले. पंतप्रधानांनी भारतीय समुदायाच्या सेवावृत्तीची विशेष प्रशंसा केली तसेच स्वयंसेवा, दानधर्म आणि सामुदायिक कल्याणातील त्यांच्या अनुकरणीय कामगिरीची प्रशंसा केली.

हा मेळावा जरी भारतीय वंशाच्या लोकांचा असला तरी, तो प्रत्यक्षात भारत-न्यूझीलंड मैत्री, क्रीडा संबंध आणि त्यांच्या आर्थिक भागीदारीचा उत्सव आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारत-न्यूझीलंड यांच्यातील क्रीडा सहकार्याला 2026 मध्ये 100 वर्षे पूर्ण होत आहेत, हे लक्षात घेऊन, दोन्ही देश आपले क्रीडा संबंध अधिक दृढ करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक माओरी संस्कृतीच्या सर्वसमावेशक आणि शाश्वत दृष्टिकोनाचे त्यांनी कौतुक केले. भारतदेखील वारसा आणि विकास यांचा मेळ घालणाऱ्या विकासाच्या मार्गाचा अवलंब करत आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. 

भारतीय समुदायाने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मैत्री, विश्वास आणि सहकार्याचा दुवा म्हणून काम करत राहावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. दोन्ही राष्ट्रांच्या धोरणात्मक भागीदारीची संपूर्ण क्षमता साकार करण्यात भारतीय समुदायाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी असेही ते म्हणाले.

 

* * *

राधिका अघोर/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2283697) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam