दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशात गावपातळीवरील दूरसंचार जाळ्याच्या कामगिरीचे सर्वात मोठे सर्वेक्षण करण्यासाठी टपाल विभाग आणि 'ट्राय' यांच्यात सामंजस्य करार

प्रविष्टि तिथि: 10 JUL 2026 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जुलै 2026

 

डिजिटल इंडियाला बळकट करण्याच्या आणि ग्रामीण दूरसंचार सेवा सुधारण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून दूरसंचार मंत्रालयाचा टपाल विभाग (डीओपी) आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) यांनी आज नवी दिल्ली येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार भारतातील 5.68 लाखांहून अधिक गावांमध्ये भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल या दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या (टीएसपी) मोबाईल नेटवर्कच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी ॲप-आधारित देशव्यापी सर्वेक्षण केले जाईल.

केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, यातून ‘डिजिटल कनेक्टिव्हिटी’  मजबूत करण्याची तसेच डिजिटल इंडियाच्या संकल्पनेला गती देण्याची सरकारची वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

टपाल विभागाच्या महाव्यवस्थापक (नागरिक-केंद्रित सेवा आणि ग्रामीण व्यवसाय) मनीषा बन्सल बादल आणि ट्रायचे सहसल्लागार (ब्रॉडबँड आणि धोरण विश्लेषण) एस. एम. के. चंद्रा यांनी दोन्ही संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

टपाल कार्यालयाचे देशाच्या कोनाकोप-यात विस्तारलेल्या  जाळ्याचा उपयोग करून टपाल विभागाच्या 1.40 लाखांहून अधिक ग्रामीण शाखा ट्रायने विकसित केलेल्या एका विशेष अँड्रॉइड-आधारित मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून ग्रामीण डाक सेवकांकडून (जीडीएस) त्यांच्या नियमित वितरण कार्यादरम्यान हे सर्वेक्षण करून घेतील. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील गावांचा समावेश असलेल्या या उपक्रमामुळे मोबाईल नेटवर्कच्या कामगिरीबद्दल क्षेत्रीय स्तरावरील माहिती तयार होईल. या माहितीच्या आधारे कनेक्टिव्हिटीमधील त्रुटी ओळखणे, दूरसंचार पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि संपूर्ण ग्रामीण भारतातील डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी पुराव्यावर आधारित धोरणात्मक निर्णयांना पाठिंबा देणे शक्य होईल.

या प्रसंगी बोलताना मनीषा बन्सल बादल म्हणाल्या, "टपाल विभागाने देशभरातील आपली अतुलनीय पोहोच आणि विश्वासार्ह अस्तित्व यांचा उपयोग करून नागरिक-केंद्रित सेवा देण्यासाठी विविध सरकारी संस्थांसोबत सातत्याने भागीदारी केली आहे.”

या प्रसंगी बोलताना अरुण अग्रवाल म्हणाले, “टपाल विभागासोबतच्या या सहकार्यामुळे तळागाळातील दूरसंचार नेटवर्कच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्याची ट्रायची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल.”

या सामंजस्य कराराअंतर्गत टपाल विभाग आपल्या देशव्यापी टपाल जाळ्याद्वारे क्षेत्रीय सर्वेक्षणाचे कार्य राबवेल, तर ट्राय यासाठी सर्वेक्षण ॲप्लिकेशन, तांत्रिक साहाय्य, प्रशिक्षण आणि केंद्रीकृत देखरेख पुरवेल. या एक वर्षाच्या भागीदारीमुळे दूरसंचार सेवेची गुणवत्ता सुधारेल, डिजिटल कनेक्टिव्हिटीमधील दरी कमी होईल आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम व सर्वसमावेशक भारताच्या संकल्पनेला अधिक चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

 

* * *

सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2283457) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Malayalam