आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली आयुष्मान भारत डिजिटल अभियानाच्या मिशन सुकाणू गटाची तिसरी बैठक संपन्न
"विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी आरोग्य क्षेत्राचे बळकटीकरण करणे अविभाज्य आहे आणि त्या प्रवासात आयुष्मान भारत डिजिटल मिशन एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ म्हणून काम करेल" - जे. पी. नड्डा
Posted On:
10 JUL 2026 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2026
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आणि मिशन सुकाणू गटाचे (एम एस जी) अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी आज येथे आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या (एबीडीएम) प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि भारताची डिजिटल आरोग्य परिसंस्था अधिक मजबूत करण्याच्या आराखड्यावर विचारविनिमय करण्यासाठी मिशन सुकाणू गटाच्या तिसऱ्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले.

उपस्थितांना संबोधित करताना नड्डा यांनी दर्जेदार आरोग्यसेवेची उपलब्धता सुधारण्यातील, सेवेतील सातत्य वाढवण्यातील आणि नागरिकांना त्यांच्या आरोग्य नोंदी सुरक्षित व संमती-आधारित पद्धतीने पाहण्यासाठी सक्षम करण्यातील डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या परिवर्तनकारी भूमिकेवर जोर दिला. त्यांनी यावर भर दिला की, प्रत्येक नागरिकासाठी सर्वसमावेशकता, सुलभता आणि वापरसुलभता सुनिश्चित करताना, सार्वत्रिक आरोग्य छत्र साध्य करण्यासाठी तंत्रज्ञानाने एक शक्तिशाली सक्षमकर्ता म्हणून काम करणे सुरूच ठेवले पाहिजे.
बैठकीदरम्यान, मिशन सुकाणू गटाने मागील बैठकीपासून एबीडीएम अंतर्गत झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला आणि देशाच्या डिजिटल आरोग्य परिसंस्थेच्या लक्षणीय विस्ताराची नोंद घेतली.
मिशन सुकाणू गटाने नमूद केले की एबीडीएम ही जगातील सर्वात मोठ्या डिजिटल आरोग्य परिसंस्थांपैकी एक म्हणून उदयास आली आहे, ज्यामध्ये 93.95 कोटींहून अधिक आभा (ABHA) क्रमांक तयार केले गेले आहेत, 105 कोटी आरोग्य नोंदी जोडल्या गेल्या आहेत आणि 5.33 लाख आरोग्य सुविधा व 9.85 लाख आरोग्यसेवा व्यावसायिक राष्ट्रीय डिजिटल आरोग्य नोंदणीवर नोंदणीकृत आहेत. या मिशनने 2.72 लाख आरोग्य सुविधांना एबीडीएम-सक्षम सॉफ्टवेअर स्वीकारण्यास सक्षम केले आहे, जलद ओपीडी नोंदणीसाठी सुमारे 24 कोटी 'स्कॅन अँड रजिस्टर' टोकन तयार केले आहेत आणि आरोग्यसेवेच्या संपूर्ण प्रक्रियेत संमती-आधारित आरोग्य माहितीची अखंड देवाणघेवाण सुलभ केली आहे.

मिशन सुकाणू गटाने आदर्श जिल्हे, आदर्श सुविधा आणि आरोग्य सेतू 2.0 यांसारख्या उपक्रमांद्वारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एबीडीएमच्या जलद विस्ताराचे कौतुक केले, तसेच आयुष्मान भारत पीएम-जेएवाय, सीजीएचएस, ईएसआयसी आणि निक्षय यांसारख्या प्रमुख सरकारी आरोग्य कार्यक्रमांसोबत एकीकरण अधिक मजबूत केल्याचेही कौतुक केले. सदस्यांनी असे निरीक्षण नोंदवले की, हे उपक्रम सुरक्षित डिजिटल आरोग्य नोंदी, जलद सेवा वितरण आणि देशभरात आरोग्य सेवांची अखंड उपलब्धता सक्षम करून आरोग्यसेवा अधिक सुलभ, आंतरकार्यक्षम आणि नागरिक-केंद्रित बनवत आहेत.
बैठकीचा समारोप करताना केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावर जोर दिला की, “एबीडीएम अंतर्गत एक मजबूत डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आली असली तरी पुढील टप्प्यात देशभरात तिचा स्वीकार आणि वापर जास्तीत जास्त करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे”. त्यांनी सांगितले की, 2047 पर्यंत 'विकसित भारत'चे स्वप्न साकार करण्यासाठी आरोग्य क्षेत्राला बळकट करणे अविभाज्य आहे आणि त्या प्रवासात एबीडीएम एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ म्हणून काम करेल.

नड्डा यांनी विश्वास व्यक्त केला की केंद्र, राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि सर्व संबंधित घटकांमधील निरंतर सहकार्याच्या माध्यमातून भारत एक लवचिक, सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सज्ज अशी डिजिटल आरोग्य परिसंस्था उभारेल, जी विकसित भारत @ 2047' च्या संकल्पनेचे खऱ्या अर्थाने प्रतिबिंब असेल.
* * *
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2283326)
अभ्यागत कक्ष : 58