कोळसा मंत्रालय
भूपृष्ठीय कोळशाच्या / लिग्नाईटच्या वायूभवन प्रक्रियेला चालना देण्यासाठीच्या 37,500 कोटी रुपयांच्या योजनेअंतर्गत कोळसा मंत्रालयाने मागवले अर्ज
प्रविष्टि तिथि:
08 JUL 2026 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2026
कोळसा मंत्रालयाने भूपृष्ठीय कोळशाच्या / लिग्नाईटच्या वायूभवन प्रक्रियेला (कोळसा/लिग्नाईट वायूभवन) चालना देण्याच्या प्रकल्पांसाठी अर्ज मागवले आहेत. या संदर्भातल्या योजनेला केंद्र सरकारने 13 मे 2026 रोजी मंजुरी दिली असून, यासाठी एकूण 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूदही केली आहे.
ही योजना भूपृष्ठीय कोळशाच्या / लिग्नाईटच्या वायूभवन प्रक्रियेला चालना देण्याच्या उद्देशाने हाती घेतलेला एक महत्त्वाचा उपक्रम आहे. मूल्यवर्धनात वृद्धी घडवून आणणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे तसेच ऊर्जा आणि रासायने या क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरता साध्य करण्याच्या राष्ट्रीय संकल्पाला पाठबळ देण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे.
या योजनेला मंजुरी दिल्यानंतर 25 जून 2026 रोजी या योजनेसाठीची मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली होती. यानंतर पात्र अर्जदारांना प्रस्ताव सादर करण्यासाठी आमंत्रित करण्याच्या हेतूने 7 जुलै 2026 रोजी प्रस्तावांसाठीचे विनंतीपत्र (RFP) जारी करण्यात आले होते.
या प्रक्रियेत अधिकाधिक भागधारकांना सुलभतेने भाग घ्यावा तसेच या योजनेतील तरतुदी आणि अर्ज प्रक्रियेविषयी अधिक स्पष्टता असावी यासाठी मंत्रालयाच्या वतीने 20 जुलै 2026 रोजी एक अर्जपूर्व परिषदेचे आयोजनही केले जाणार आहे. या परिषदेत संभाव्य अर्जदार आणि इतर भागधारकांनी सहभागी व्हावे आणि आपापल्या शंका मांडून त्यांचे निरसन करून घ्यावे असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.
या योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर 2026 असणार आहे.
या योजनेची मार्गदर्शक तत्त्वे, प्रस्ताव विनंतीपत्र आणि अर्जाची सविस्तर कालमर्यादा याबाबतची माहिती कोळसा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमात स्वारस्य असलेल्या संस्थांनी हे सर्व दस्तऐवज व्यवस्थित पाहून घ्यावेत असा सल्लाही मंत्रालयाने दिला आहे.
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2282660)
आगंतुक पटल : 8