आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आयुषमान आरोग्य मंदिरांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या सर्व पाच संवर्गांतील प्रशिक्षणार्थींसाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणाचे केले यशस्वी आयोजन
प्राथमिक आरोग्यसेवा कार्यबळ अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने 110 हून अधिक राष्ट्रीय आणि मास्टर प्रशिक्षणार्थी
प्रविष्टि तिथि:
08 JUL 2026 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2026
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्रात दोन दिवसीय कार्यक्रमांतर्गत, आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या सर्व पाच संवर्गांसाठी राष्ट्रीय प्रशिक्षक प्रशिक्षण यशस्वीरित्या आयोजित केले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अतिरिक्त सचिव आणि मिशन संचालक आराधना पटनाईक होत्या.
यावेळी उपस्थित सहभागींना आराधना पटनाईक यांनी संबोधित केले. सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये कुशल आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य कर्मचाऱ्यांची उपलब्धता अतिशय महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य सेवांमध्ये समुदायाचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी गुणवत्तेचे प्रमाणन आवश्यक असून त्यासाठी विकेंद्रित अंमलबजाणी मॉडेलच्या माध्यमातून संवर्गनिहाय प्रशिक्षण अभियान राबवण्याच्या महत्त्वावर त्यांनी विशेष भर दिला. हा प्रशिक्षण कार्यक्रम आता ऑगस्ट 2026 पासून देशभरात निश्चित केलेल्या 100 हून अधिक प्रादेशिक प्रशिक्षण संस्थांमार्फत टप्प्याटप्प्याने राबवला जाईल, असे त्या म्हणाल्या.

याशिवाय सेवा वितरण सुधारण्यासाठी आरोग्य विषयक उपक्रमांमध्ये अधिक एकात्मता आणि विविध संस्थांमधील मजबूत समन्वयाच्या महत्त्वावर त्यांनी पुढे भर दिला. केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नाही तर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणामध्ये वर्तनात्मक कौशल्ये, सहसंवेदनशीलता आणि प्रभावी संवादकौशल्ये यांचा समावेश करण्याची वाढती आवश्यकता आहे, असे त्या म्हणाल्या. लोककेंद्रित, संवेदनशील आणि करुणामय आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चंदीगड इथे 30 एप्रिल 2026 रोजी आयोजित सर्वोत्तम कार्यपद्धतींवरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते एकात्मिक प्रशिक्षण धोरण तसेच विशिष्ट उमेदवारांना अनुसरून असलेल्या प्रशिक्षण मॉड्युल्सचा प्रारंभ करण्यात आला होता. हे एकात्मिक प्रशिक्षण धोरण म्हणजे विशिष्ट कार्यक्रमांना अनुसरून तसेच केवळ ज्ञान केंद्रित क्षमतांमध्ये वृद्धी घडवून आणण्याची पारंपरिक पद्धत बदलून, त्याऐवजी थेट रुग्ण केंद्रित आणि कौशल्य क्षमतेवर आधारित प्रशिक्षणाच्या दृष्टिकोनाच्या दिशेने केलेले एक महत्त्वाचे परिवर्तन होते. आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून व्यापक प्राथमिक आरोग्य सेवा पुरवणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, समुदाय आरोग्य अधिकारी (सीएचओ), साहाय्यक सुईण परिचारिका (एएनएम) आणि आशा अर्थात मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या यांच्यातील तंत्रज्ञान विषयक क्षमता आणि वर्तणुकीशी संबंधित आवश्यक कौशल्ये वृद्धींगत करणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.
प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणासाठीच्या या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी देशभरातून 110 पेक्षा जास्त राष्ट्रीय प्रशिक्षक आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षक एकत्र आले होते. त्यांच्या या व्यापक सहभागातून प्रमाणीत आणि कौशल्य क्षमतांवर आधारित क्षमता बांधणीच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी असलेली परस्पर सामायिक राष्ट्रीय वचनबद्धताही अधोरेखित झाली.
प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणासाठीच्या या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या आखणीअंतर्गत वर्गखोलीतील सत्रे, प्रत्यक्ष उदाहरणांवर आधारीत चर्चासत्रे तसेच राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेच्या कौशल्य प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण असे विविधांगी उपक्रम एकत्रितपणे आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षणार्थींना परिपूर्ण अध्ययनाचा अनुभव घेता यावा या उद्देशानेच ही आखणी केली गेली आहे. या कार्यक्रमाअंतर्गत अत्यावश्यक वैद्यकीय क्षेत्रांमधील तंत्रज्ञान विषयक क्षमता तसेच संवादासह रुग्णसेवेशी इतर आवश्यक कौशल्ये वृद्धींगत करण्यावर विशेष भर दिला जात आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रातील आघाडीवर राहून आरोग्य सेवा पुरवणाऱ्यांचे, रुग्णांना उच्च दर्जाच्या आणि रुग्ण केंद्रित सेवा देण्याच्यादृष्टीने सक्षमीकरण होऊ शकणार आहे.
या एकात्मिक प्रशिक्षण धोरणाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा होईल, देशभरातील क्षमता वृद्धीसाठीच्या प्रयत्नांचे प्रमाणीकरण घडून येईल तसेच नागरिकांच्या बदलत्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी आघाडीवर राहून सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोनाने सुसज्ज करता येईल, आणि या सगळ्यातून आरोग्य व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल अशी अपेक्षा आहे.
* * *
सुवर्णा बेडेकर/भक्ती सोनटक्के/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2282600)
आगंतुक पटल : 11