वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तंत्रज्ञानाधारित द्विभाषिक व्यवस्थापन अभ्‍यासक्रम ग्रामीण - शहरी दरी कमी करून, दर्जेदार शिक्षणाची व्याप्ती वाढवू शकतो - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन

प्रविष्टि तिथि: 06 JUL 2026 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,6 जुलै 2026

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष  गोयल यांनी आज सांगितले की, तंत्रज्ञानावर आधारित आणि द्विभाषिक व्यवस्थापन अभ्‍यासक्रमामुळे ग्रामीण-शहरी दरी सांधण्यास मदत होऊ शकते. तसेच,कोणत्याही  परिस्थितीमध्ये  होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवता येऊ शकते. नवी दिल्ली येथून 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट' (आयआयएम) उदयपूर येथील एका नवीन अभ्यासक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आभासी माध्यमाव्दारे  बोलताना मंत्र्यांनी सांगितले की, हा ऑनलाइन द्विभाषिक 'बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन' (बीबीए) कार्यक्रम वेगळा  उपक्रम आहे. सोप्या आणि सहज समजण्यासारख्‍या  भाषेत व्यवस्थापन शिक्षण देऊन हा कार्यक्रम व्यापक प्रभाव पाडू शकतो.

‘आयआयएम’ चे वर्ग आता स्क्रीनवर दिसतील," असे सांगत मंत्र्यांनी नमूद केले की, हा कार्यक्रम भिलवाडा येथील एखाद्या छोट्या दुकानातील व्यक्तीपासून ते बस्तरमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. ते म्हणाले की, हा कार्यक्रम स्क्रीन, लॅपटॉप किंवा अगदी स्मार्टफोनवरही पाहता येईल आणि त्यामुळे तो अत्यंत महत्त्वाचा ठरेल. त्यांनी पुढे सांगितले की, हा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने राबविला जाणार असला तरी, परीक्षा मात्र ऑफलाइन घेतल्या जातील, त्यामुळे विद्यार्थ्‍यांविषयी असलेल्या  दायित्वाचे  पालन करताना   कोणतीही कमतरता राहणार नाही.

यावेळी गोयल यांनी हा कार्यक्रम अधिक बळकट करण्यासाठी चार सूचना मांडल्या. पहिल्या सूचनेमध्ये त्यांनी सांगितले की, शक्य असेल तिथे 'हायब्रिड' (मिश्र) पद्धतीचा अवलंब करून प्राध्यापकांनी दरमहा भेटी द्याव्यात आणि विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी भेटण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. व्यवस्थापन शिक्षण हे केवळ शाळा, महाविद्यालय किंवा वर्गातील अभ्यासापुरते मर्यादित नसून त्यात विद्यार्थ्यांमधील परस्पर संवाद आणि आंतरक्रियेचाही समावेश असतो, असे ते म्हणाले.

दुसऱ्या सूचनेमध्ये,  मंत्री  गोयल यांनी 'सॉफ्ट-स्किल' (कौशल्य) विकासाच्या महत्त्वावर भर दिला; यामध्ये तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान, संवाद कौशल्य, सांघिक कार्य, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि मानवी परस्परसंवाद यांचा समावेश आहे. या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केल्यास विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असे ते म्हणाले.

तिसऱ्या सूचनेमध्ये, मंत्र्यांनी 'अनुभवाधिष्ठित शिक्षणा'चा  आग्रह धरला. यामध्ये कारखाने, बंदरे आणि औद्योगिक समूहांना प्रत्यक्ष भेटी देणे समाविष्ट आहे.

चौथ्या सूचनेमध्ये,पीयूष गोयल यांनी संस्थेला जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले. यामध्ये दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) आणि डिजिटल साधनांचा वापर तसेच 'नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत 'क्रेडिट ट्रान्सफर' (श्रेयांक  हस्तांतरण) यांसारख्या बाबींचा समावेश असावा.

मंत्र्यांनी सांगितले की, 'विकसित भारता'साठी विद्यार्थ्यांसमोर जगाची दारे खुली आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन मुक्त व्यापार करारांतर्गत निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.  कारण हे करार उत्पादन क्षेत्राला नवी चालना देत आहेत आणि नाविन्यपूर्णतेला प्राधान्य देत आहेत. मंत्री म्हणाले की, जग झपाट्याने बदलत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे व्यवस्थापनाच्या गरजांमध्ये परिवर्तन होत आहे. गतिमान शिक्षण अधिकाधिक महत्त्वाचे ठरत आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास केंद्रे आणि नोकरीच्या  भर्तीमधील गरजादेखील पारंपरिक नोकऱ्यांपासून ते वैशिष्ट्यपूर्ण आवश्यकतांपर्यंत सातत्याने बदलत आहेत.

‘इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट’ च्या जागतिक स्थानाचा उल्लेख करताना मंत्री गोयल म्हणाले की, व्यवस्थापन क्षेत्रातील ‘आयआयएम’ हा ब्रँड जगभरात ओळखला जातो.


निलीमा चितळे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2281796) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu