कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने नवाचार मंत्र साठी नोंदणीची अंतिम मुदत येत्या 15 जुलैपर्यंत वाढवली


देशभरातील इच्छुक उद्योजक आणि नवोन्मेषकांना अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुदतवाढ

प्रविष्टि तिथि: 05 JUL 2026 6:56PM by PIB Mumbai

 

देशभरातील नवोन्मेषकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल घेत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने आपल्या प्रमुख राष्ट्रीय नवोन्मेष व्यासपीठ 'नवाचार मंत्र'साठी नोंदणीची अंतिम मुदत 15 जुलै 2026 पर्यंत वाढवली आहे. यामुळे अधिक इच्छुक उद्योजकांना आपल्या आशादायी कल्पनांचे यशस्वी उद्योगांमध्ये रूपांतर करण्याची संधी मिळणार आहे.

नवाचार मंत्रच्या अधिकृत नोंदणी पोर्टलद्वारे आतापर्यंत हजारो इच्छुक उद्योजक आणि नवोन्मेषकांनी नोंदणी केली आहे. नोंदणीसाठी दिलेल्या या मुदतवाढीमुळे आणखी मोठ्या संख्येने नोंदणी होण्याची तसेच भारतभरातून अधिक नाविन्यपूर्ण कल्पना समोर येण्याची अपेक्षा आहे.

मंत्रालयाच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या नवाचार मंत्रची अंमलबजावणी राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था  करत आहे. तर आयआयटी दिल्लीची नवोन्मेष आणि तंत्रज्ञान हस्तांतरण प्रतिष्ठान ही या उपक्रमाची ज्ञान भागीदार आहे. संरचित मार्गदर्शन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्योगक्षेत्राशी संपर्क आणि बाजारपेठेतील प्रवेश यांच्या माध्यमातून उच्च क्षमता असलेल्या उद्योजकीय कल्पना ओळखणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा वेगाने विकास घडवून आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

नवोन्मेषाधारित उद्योजकतेसाठी सर्वसमावेशक व्यासपीठ म्हणून तयार करण्यात आलेल्या नवाचार मंत्रामध्ये सहभागींसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, उद्यम संवर्धन सहाय्य, उद्योग भागीदारी, गुंतवणूकदारांशी संपर्क आणि संस्थात्मक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. या उपक्रमाचा उद्देश नवोन्मेषकांना त्यांच्या कल्पना अधिक परिष्कृत करणे, त्यांची उपयुक्तता सिद्ध करणे आणि त्यांचे वास्तविक बाजारपेठेच्या दृष्टीने क्षमता असलेल्या शाश्वत उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत करणे हा आहे. तसेच देशभरात उद्योजकतेसाठी पोषक परिसंस्था निर्माण करण्याचाही या उपक्रमाचा हेतू आहे.

मंत्रालयाने देशभरातील विद्यार्थी, स्टार्टअप, व्यावसायिक, जमसामान्यामधील नवोन्मेषक आणि इच्छुक उद्योजकांना या मुदतवाढीचा लाभ घेण्याचे आणि आपल्या कल्पनांचे प्रभावी उद्योगांमध्ये रूपांतर करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलण्याचे आवाहन केले आहे.

अधिक माहितीसाठी: https://nm.fitt-iitd.in/

अर्ज करण्यासाठी: https://accubate.fitt-iitd.in/ext/form/23520/1/apply?source=Print&medium=post

***

शैलेश पाटील/नितीन गायकवाड/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2281381) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil