महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

6 आणि 7 जुलै 2026 रोजी कोची येथे भारत ब्रिक्स महिला कार्यगटाच्या बैठकीचे आयोजन करणार


भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाअंतर्गत महत्त्वाच्या दस्तऐवजांवर चर्चा करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांचे अधिकारी एकत्र येणार

प्रविष्टि तिथि: 05 JUL 2026 10:11AM by PIB Mumbai


यंदाच्या भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाअंतर्गत, 6 व 7 जुलै 2026 रोजी केरळमधील कोची येथे ब्रिक्स महिला कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सर्व क्षेत्रांतील महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच समान प्राधान्याच्या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याला चालना देण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांतील वरिष्ठ सरकारी अधिकारी या बैठकीत एकत्र येणार आहेत.
लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी  या लोककेंद्रित आणि मानवतावादी दृष्टिकोन प्रतिबिंबित करणाऱ्या भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या संकल्पनेच्या मार्गदर्शनाखाली, ब्रिक्स महिला कार्यगटाने चार प्राधान्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये शासन आणि नेतृत्वातील महिलांचा सहभाग, महिलांचा डिजिटल आणि आर्थिक समावेश, महिला उद्योजकता आणि कौशल्य विकास तसेच हवामान कृती, अन्नसुरक्षा आणि पोषण यामधील महिलांची भूमिका या क्षेत्रांचा समावेश आहे.
महिला कार्यगटाच्या बैठकीमुळे सदस्य देशांना महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला चालना देणाऱ्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्याची आणि त्याबाबत एकमत निर्माण करण्याची संधी मिळणार आहे. ब्रिक्समध्ये ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती या 11 देशांचा समावेश असून, या देशांचा जागतिक सकल देशांतर्गत उत्पन्नात सुमारे 40 टक्के वाटा आहे.
ब्रिक्स देशांमध्ये जगाच्या सुमारे 49.5 टक्के लोकसंख्येचा समावेश आहे. या लोकसंख्येमध्ये महिलांचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विकास हा सर्व क्षेत्रांतील परिणामांवर प्रभाव टाकणारा असल्याने, ब्रिक्स 2026 मध्ये महिला उपक्रम हा एक धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे.
महिला कार्यगटाची ही बैठक 30 एप्रिल 2026, 22 मे 2026 आणि 29 जून 2026 रोजी आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या तीन पूर्वतयारी बैठकींमधील व्यापक चर्चेवर आधारित आहे. या चर्चांमुळे कोची येथे होणाऱ्या बैठकीपूर्वी सदस्य देशांना विविध विषयांवरील चर्चा अधिक पुढे नेण्यास मदत झाली आहे.
ब्रिक्स महिला कार्यगटाच्या बैठकीमुळे, 8 आणि 9 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ब्रिक्स महिला मंत्रिस्तरीय बैठकीसाठी भक्कम पाया तयार होण्याची अपेक्षा आहे. या बैठकीमुळे व्यावहारिक सहकार्य आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाबाबत ब्रिक्स सदस्य देशांची सामायिक बांधिलकी पुन्हा अधोरेखित होण्याची अपेक्षा आहे.

***

शिल्पा पोफळे/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2281207) आगंतुक पटल : 37
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam