उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींनी आयसीएआय च्या 78 व्या सनदी लेखापाल दिन समारंभाला केले संबोधित

प्रविष्टि तिथि: 01 JUL 2026 8:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 जुलै 2026

 

सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट्स) हे "विश्वासाचे दूत" आहेत आणि भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या प्रवासात त्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे, असे भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) या भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या 78 व्या सनदी लेखापाल दिन आणि स्थापना दिन समारंभाला संबोधित करताना ते म्हणाले की, हा व्यवसाय पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नैतिक सुशासन सुनिश्चित करून भारताच्या आर्थिक आणि संस्थात्मक विकासाच्या केंद्रस्थानी  आहे.

भारताच्या आर्थिक वाढीतील, सनदी लेखापाल व्यवसायाच्या योगदानाचे, उपराष्ट्रपतींनी कौतुक केले आणि परीक्षेची कठोर गुणवत्ता कायम ठेवल्याबद्दल आयसीएआयचा गौरव केला. संस्थेने हा दर्जा कधीही घसरू देऊ नये असे आवाहन करताना, ही संस्था व्यवस्थेची विश्वासार्हता जपण्याचे काम करत आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.

देशातील महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांमध्ये सनदी लेखापालांच्या योगदानाची दखल घेत सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, वस्तू-सेवा कर (जीएसटी), दिवाळखोरी आणि नादारी संहिता (IBC), थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) आणि करप्रणालीतील सुधारणांच्या प्रभावी अंमलबजावणीत सनदी लेखापालांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते पुढे म्हणाले की, सनदी लेखापालांच्या कौशल्यामुळे पारदर्शकता वाढली आहे. नियमांचे पालन अधिक प्रभावी झाले आहे. तसेच, गुंतवणूकदारांचा विश्वासही अधिक दृढ झाला आहे.

व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, त्यांनी केलेले प्रत्येक लेखापरीक्षण, त्यांनी प्रमाणित केलेला प्रत्येक ताळेबंद आणि त्यांनी दिलेला प्रत्येक व्यावसायिक सल्ला याचा व्यवसाय, शासन व्यवस्था आणि समाजावर दीर्घकालीन परिणाम होत असतो. त्यांनी  आपल्या संपूर्ण व्यावसायिक जीवनात सचोटीचा सर्वोच्च दर्जा राखण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.

स्थानिक उद्योगांना पाठबळ देण्यासाठी सनदी लेखापालांनी  मोठी भूमिका बजावावी अशी सूचना करत, उपराष्ट्रपतींनी आयसीएआय च्या जिल्हास्तरीय संघटनांना, 'एक जिल्हा, एक उत्पादन' (ओडीओपी) उपक्रमांतर्गत निवडलेल्या उत्पादनांविषयी प्रत्यक्ष व्यावहारिक ज्ञान मिळवण्यास प्रोत्साहन दिले. ते म्हणाले की, या कौशल्याच्या आधारे ते उत्पादकांना गुणवत्ता कायम राखत खर्च कमी करण्यासाठी मार्गदर्शन करू शकतील. त्यामुळे स्पर्धात्मकता वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळ मिळेल.

 

* * *

सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2280114) आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , English , हिन्दी , Gujarati