पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री व वितरणावरील तात्पुरते निर्बंध हटवले
प्रविष्टि तिथि:
29 JUN 2026 9:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जून 2026
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने, 1 जुलै 2026 पासून सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांच्या किरकोळ विक्री केंद्रांमार्फत केल्या जाणाऱ्या 'मोटर स्पिरिट' (एमएस) आणि 'हाय स्पीड डिझेल' (HSD) यांच्या विक्री व वितरणाशी संबंधित तात्पुरते नियामक उपाय हटवले आहेत.
पश्चिम आशियातील संकटामुळे निर्माण झालेल्या व्यत्ययाच्या काळात, सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर स्थिर ठेवून आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमतीत झालेल्या मोठ्या वाढीची झळ ग्राहकांपर्यंत पोहोचू दिली नाही आणि त्यांना त्यापासून संरक्षण दिले. यामुळे किरकोळ इंधनाचे दर आणि मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी लागू असलेले दर यांच्यात मोठी तफावत निर्माण झाली. परिणामी, काही औद्योगिक, व्यावसायिक आणि संस्थात्मक ग्राहकांनी किरकोळ विक्री केंद्रांमधून इंधन खरेदी करण्यास सुरुवात केली; यामुळे इंधन दुसरीकडे वळवणे, साठेबाजी आणि काळाबाजार यांसारखे प्रकार घडले, ज्याचा फटका इंधनाच्या समान वितरणाला बसला.
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी,12 जून 2026 रोजी लागू करण्यात आलेल्या तात्पुरत्या नियामक उपाययोजनांनुसार, किरकोळ विक्री केंद्रांवर प्रति ग्राहक/वाहन दररोज 200 लिटर 'हाय स्पीड डिझेल'ची मर्यादा निश्चित करण्यात आली; तसेच औद्योगिक, संस्थात्मक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी किरकोळ विक्री केंद्रांऐवजी अधिकृत 'ग्राहक पंपां'द्वारे इंधन खरेदी करणे अनिवार्य करण्यात आले. किरकोळ ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलचा अखंड पुरवठा सुनिश्चित करण्यासोबतच, डिझेलचा काळा बाजार, साठेबाजी आणि अन्यत्र वळवण्यापासून रोखणे हा या उपाययोजनांचा उद्देश होता.
देशातील पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठा स्थितीचा आढावा घेतल्यानंतर, सरकारने असा निष्कर्ष काढला आहे की जनहितार्थ आता तात्पुरत्या नियामक उपाययोजनांची आवश्यकता नाही. त्यामुळे 12 जून 2026 रोजीचा आदेश 1जुलै 2026 पासून मागे घेण्यात आला आहे.
या तात्पुरत्या उपाययोजनांमुळे किरकोळ ग्राहकांचे हित जपतानाच देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यास मदत झाली. या उपाययोजना मागे घेणे ही पुरवठा स्थितीतील सुधारणा आणि सामान्य पुरवठा व्यवस्था पूर्ववत झाल्याचे द्योतक आहे.
* * *
शैलेश पाटील/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2279215)
आगंतुक पटल : 73
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam