अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डीआरआयने फटाक्यांच्या तस्करीची टोळी केली उद्ध्वस्त, चेन्नई आणि मुंबईतील कारवाईत 35 कोटी रुपयांचे चिनी बनावटीचे फटाके जप्त; १२ जणांना अटक

प्रविष्टि तिथि: 27 JUN 2026 9:14PM by PIB Mumbai

 

धोकादायक मालाच्या अवैध आयातीविरोधात सुरू असलेल्या कारवाईत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) चिनी बनावटीचे फटाके आणि आतषबाजीचे सामान यांची चेन्नई बंदरातून भारतात तस्करी करण्याचे दोन प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडले आहेत.

 

  

या कारवाईत डीआरआय अधिकाऱ्यांनी चीनमधून आलेले दोन 40-फुटी कंटेनर जप्त केले. यामध्ये “ट्रॉली बॅग्ज” आणि “स्प्रेयर्स” असल्याची चुकीची माहिती  घोषित करण्यात आली होती. सखोल तपासणीअंती या कंटेनरमध्ये दर्शनी भागातील मालाच्या मागे मोठ्या चलाखीने लपवलेली फटाक्यांची आणि आतषबाजीच्या सामग्रीची सुमारे 46,000 पाकिटे आढळली

डीआरआयने मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे नोंदवलेल्या आणखी एका प्रकरणात, चेन्नई कस्टम्सने 18.7 मेट्रिक टन चिनी बनावटीच्या फटाक्यांची गुप्तपणे तस्करी करणाऱ्या एका सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. तपासात असे उघड झाले की प्रतिबंधित माल असलेला कंटेनर सीमाशुल्क विभागाच्या परवानगीशिवाय कंटेनर फ्रेट स्टेशनमधून (सीएफएस) बेकायदेशीरपणे बाहेर काढण्यात आला, त्यातील फटाके उतरवण्यात आले आणि नंतर त्या कंटेनरमध्ये दुसरा माल भरून तो परत त्या ठिकाणी ठेवण्यात आला. ही गुप्त कारवाई सीएफएसच्या एका कर्मचाऱ्याच्या सक्रिय संगनमताने पार पडली. या प्रकरणात संबंधित सीएफएस कर्मचाऱ्यासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

विदेशी व्यापार धोरणाच्या आयटीसी (एचएस) वर्गीकरणानुसार, फटाक्यांच्या आयातीवर ‘निर्बंध’ आहेत आणि स्फोटक नियम, 2008 नुसार विदेशी व्यापार महासंचालनालय (डीजीएफटी) व पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना (पीईएसओ) या दोन्हींकडून वैध परवाने घेणे आवश्यक असते.

यापूर्वी मे 2026 पासून डीआरआयने मुंबईत अनेक मोहिमा राबवून 100 मेट्रिक टनांहून अधिक चिनी फटाके जप्त केले आहेत.

एकूणच, या ताज्या जप्तीसह, या मोहिमांमध्ये सुमारे 35 कोटी रुपये किमतीच्या चिनी फटाक्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून 12 जणांना अटकही करण्यात आली आहे.

***

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2278520) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Gujarati