अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

अणुऊर्जा विभागाने  'फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर'मधील आण्विक उष्णतेचा वापर करून 'कॉपर-क्लोरीन थर्मोकेमिकल सायकल'वर आधारित जगातील पहिल्या हायड्रोजन उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले

प्रविष्टि तिथि: 26 JUN 2026 9:14PM by PIB Mumbai

 

 

भारताच्या स्वच्छ ऊर्जा आणि प्रगत अणु-तंत्रज्ञान कार्यक्रमातील एक महत्त्वपूर्ण कामगिरी नोंदवत, अणुऊर्जा विभागाने  आज, फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर'मधील आण्विक उष्णतेचा वापर करून 'कॉपर-क्लोरीन  (Cu–Cl)  थर्मोकेमिकल सायकल'वर आधारित जगातील पहिल्या हायड्रोजन उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले.  

यात कल्पक्कम येथील इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च' (IGCAR)च्या  'फास्ट ब्रीडर टेस्ट रिॲक्टर' (FBTR) मधून निर्माण होणाऱ्या आण्विक  उष्णतेचा  वापर केला जातो. अणुऊर्जा विभागाचे  सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे (AEC) अध्यक्ष डॉ. अजित कुमार मोहंती यांच्या हस्ते आणि IGCAR चे संचालक श्रीकुमार जी. पिल्लई यांच्या उपस्थितीत या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.

ही सुविधा 'तंत्रज्ञान प्रात्यक्षिक केंद्र'  म्हणून उभारण्यात आली आहे, जेणेकरून मुंबईतील 'भाभा अणुसंशोधन केंद्रा'द्वारे  स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित 'Cu–Cl थर्मोकेमिकल प्रक्रिये'चा वापर करून, अणुऊर्जेद्वारे हायड्रोजन निर्मितीची  पडताळणी करता येईल.  हायड्रोजन निर्मिती प्रक्रिला   अणुऊर्जेपासून मिळणाऱ्या उष्णतेशी यशस्वीरीत्या जोडणे  ही एक महत्त्वपूर्ण तांत्रिक प्रगती असून, यामुळे प्रगत अणुभट्ट्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर आणि कार्बन-मुक्त हायड्रोजन उत्पादनाचा एक आश्वासक मार्ग खुला झाला आहे.

उपस्थितांना संबोधित करताना डॉ. अजित कुमार मोहंती म्हणाले, "हायड्रोजन उत्पादनासारख्या उदयोन्मुख स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाबरोबर अणुऊर्जेचा मेळ घालणे, हा शाश्वत ऊर्जा भविष्याच्या दिशेने एक धोरणात्मक मार्ग आहे. आपण बीएआरसी  आणि आयजीसीएआर  मधील  या सर्व  शास्त्रज्ञ, अभियंते आणि तांत्रिक पथकांतील सदस्यांचे अभिनंदन करतो.  त्यांनी सातत्यपूर्ण  समर्पण, नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आणि तांत्रिक उत्कृष्टतेमुळे एका प्रगत वैज्ञानिक संकल्पनेचे प्रत्यक्ष कार्यक्षम वास्तवात रूपांतर झाले आहे. ही कामगिरी प्रगत अणुऊर्जा तंत्रज्ञान आणि स्वच्छ ऊर्जा प्रणालींमधील भारताच्या वाढत्या क्षमतेचा पुरावा आहे."

या सुविधेचे उद्घाटन हे अणुऊर्जा आणि स्वच्छ हायड्रोजन तंत्रज्ञानाच्या समन्वयातून 'आत्मनिर्भर भारत'चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

***
सोनाली काकडे/सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2278330) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English