पर्यटन मंत्रालय
भारताला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक पर्यटन स्थळ बनवण्याकरिता सुधारणा करण्यासाठी सरकार कटिबद्ध - गजेंद्र सिंह शेखावत
पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात व्यवसाय सुलभतेसंदर्भात पर्यटन मंत्रालयाचा उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींशी उच्च स्तरीय संवाद
प्रविष्टि तिथि:
22 JUN 2026 9:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जून 2026
केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली, आज नवी दिल्लीत पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत व्यवसाय सुलभते बाबत एका संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या पर्यटन परिसंस्थेची परिपूर्ण वाढीची क्षमता साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या बदलांबाबत चर्चा करण्यासाठी या बैठकीने प्रमुख उद्योग संघटनांना एकत्र आणले.
पर्यटन मंत्रालयाने आपल्या सुधारणा कार्यक्रमाबाबतचे सादरीकरण केले आणि याआधी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना गजेंद्र सिंह शेखावत यांनी, या सुधारणांबरोबरच भारताला जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक पर्यटन स्थळ बनवण्यासाठी सरकारच्या कटिबद्धतेवर भर दिला. नियामक त्रुटी ओळखून आणि अधिक व्यवसाय सुलभतेद्वारे या क्षेत्राच्या शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी उद्योगातील भागधारकांशी सतत संवाद साधण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
पर्यटन उद्योगांसाठी जागतिक स्तरावरील स्पर्धेचे व्यावसायिक वातावरण राखण्याच्या महत्त्वावर सहभागींनी भर दिला. व्हिसा प्रक्रिया आणि कररचना सुलभ करण्याबरोबरच, सहज सोप्या मंजुरी प्रक्रियेद्वारे गुंतवणुकीला चालना देणे आणि या क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी पर्यटन आधारीत पायाभूत सुविधांचा विकास करणे या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
पर्यटन व्यवसाय सुरू करणे आणि चालवणे अधिक सुलभ करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यावेळी मंजुरी प्रक्रिया सुव्यवस्थित करणे, अनुपालनाचे ओझे कमी करणे, डिजिटल प्रशासन उपायांना चालना देणे आणि नियामक चौकटींमध्ये अधिक समन्वय साधणे यांवर केंद्रित सूचना मांडण्यात आल्या. भागधारकांनी सुलभीकरणासाठी सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी व कार्यक्षमता सुधारण्यासाठी पुढील उपाययोजनांची शिफारस केली.

प्रशासनातील तंत्रज्ञानाची विशेष परिवर्तनकारी भूमिका लक्षात घेऊन, सहभागींनी नाविन्यपूर्ण डिजिटल उपायांवर चर्चा केली.
पर्यटन नियोजन आणि गुंतवणुकीमध्ये डेटा, माहिती -आधारित निर्णय घेण्याच्या वाढत्या महत्त्वावरही या चर्चेदरम्यान सविस्तर विचार करण्यात आला.
लाइव्ह इव्हेंट्स, प्रत्यक्ष कार्यक्रम, अनुभव दायक पर्यटन, अम्युझमेंट पार्क्स यासारख्या नव्याने उदयाला येणाऱ्या क्षेत्रांकडे आणि होमस्टे ला उप-क्षेत्र म्हणून कायदेशीर मान्यता देणे याकडे विशेष लक्ष देण्यात आले.

चर्चेदरम्यान प्राप्त झालेल्या विविध सूचनांचे पर्यटन मंत्रालयाने स्वागत केले. तसेच, व्यवसाय सुलभता वाढवणाऱ्या आणि पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासाला आधार देणाऱ्या सुधारणांना पुढे नेण्यासाठी उद्योग संघटना, राज्य सरकारे आणि इतर भागधारकांसोबत मिळून काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा मंत्रालयाने पुनरुच्चार केला.
* * *
निलिमा चितळे/राजेश शिरभाते/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2276872)
आगंतुक पटल : 6