रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लवचिक पुरवठा साखळी: भारतीय कृषी साठ्याला पाठबळ देण्यासाठी खतांच्या चार जहाजांची 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' यशस्वीरित्या ओलांडून आगेकूच


हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे अतिशय महत्त्वाच्या मालाच्या सागरी वाहतुकीमुळे खरीप 2026 साठी युरिया, डीएपी आणि गंधकाची (सल्फर) अत्यावश्यक खेपांची शाश्वती

प्रविष्टि तिथि: 22 JUN 2026 9:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जून 2026

 

भारताच्या खत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या युरिया, डाय-अमोनियम फॉस्फेट (DAP) आणि गंधकाचा (सल्फर) अत्यावश्यक साठा वाहून नेणाऱ्या चार मालवाहू जहाजांनी गेल्या आठवड्यात हॉर्मुझची सामुद्रधुनी यशस्वीपणे ओलांडून पुढची वाटचाल सुरू केली. जागतिक व्यापारातील सध्याच्या आव्हानांमधून मार्ग काढत, ही जहाजे सध्या देशातील त्यांच्या निश्चित केलेल्या नियोजित बंदरांच्या—म्हणजेच कृष्णपट्टणम, काकिनाडा, पारादीप आणि मुंद्रा यांच्या दिशेने पुढे सरकत आहेत. बंदरांवर पोहोचल्यानंतर, देशातील खतांचा सध्याचा राखीव साठा वाढवण्यासाठी आणि चालू असलेल्या शेतीच्या गरजा सुरक्षित करण्यासाठी या नवीन आयातीचा माल त्वरित उतरवून घेतला जाईल.

पुरेशा प्रमाणात राखीव साठा

22 जून 2026 पर्यंत भारताच्या खतांच्या संचित साठ्याची स्थिती 196.08 लाख टन इतकी भक्कम आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीत नोंदवलेल्या 168.67 लाख टनांच्या तुलनेत ही वाढ अतिशय उत्तम स्थितीकडे निर्देश करत आहे.  या भक्कम राखीव साठ्यामध्ये खालील खतांचा समावेश आहे:

  • युरिया: 81.44 लाख टन (मागील वर्षीच्या 69.21 लाख टनांच्या तुलनेत जास्त)
  • डीएपी: 20.92 लाख टन (मागील वर्षीच्या 16.0 लाख टनांच्या तुलनेत जास्त)
  • एनपीके: 55.91 लाख टन (मागील वर्षीच्या 46.13 लाख टनांच्या तुलनेत जास्त)
  • एमओपी: 12.68 लाख टन (मागील वर्षीच्या 10.68 लाख टनांच्या तुलनेत जास्त)
  • एसएसपी: 25.13 लाख टन (मागील वर्षी 26.65 लाख टन होते)

शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या कृषी घडामोडींना प्रतिबिंबित करत पुरवठा साखळी क्षेत्रातल्या युद्धसंकटानंतरच्या काळातील एकूण खत विक्री (1 मार्च 2026 ते 21 जून 2026 दरम्यान) 153.4 लाख टनांवर पोहोचली आहे. मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या 140.2 लाख टनांच्या विक्रीच्या तुलनेत ही 13.2 लाख टनाची वाढ दर्शवते.

देशार्गत उत्पादन पाठबळ

जागतिक बाजारपेठेतील अनपेक्षित धक्क्यांपासून भारतीय शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी, सरकारने लक्ष्यित आयात मालाच्या आगमनासोबतच स्वदेशी उत्पादन क्षमतेचा जास्तीत जास्त विस्तार केला. संकटानंतरच्या काळातील देशांतर्गत उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून ते तब्बल 133.12 लाख मेट्रिक टनांवर पोहोचले आहे. या भक्कम देशांतर्गत पायाला या काळात भारतीय बंदरांवर पोहोचलेल्या एकूण 43.69 लाख मेट्रिक टन आयातीचेही उत्तम पाठबळ मिळाले. यामुळे स्थानिक उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय स्रोत यामध्ये एक आदर्श समतोल साधला गेला.

जागतिक निविदेचा महत्त्वाचा टप्पा

भारताने आपल्या ताज्या जागतिक निविदा मूल्यमापनात 17.70 लाख मेट्रिक टन युरियाचा यशस्वी करार केला आहे. या नवीन जोडणीसह, भारताने चालू असलेल्या खरीप हंगामासाठी विशेषत्वाने तयार केलेल्या जागतिक बाजारपेठेतून 90 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त युरिया आणि पी अँड के खतांचा पुरवठा सुरक्षितपणे निश्चित केला आहे.

व्यापक पातळीवरील खरेदीची ही रणनीती परदेशातील 28 भारतीय दूतावासांच्या सक्रिय राजनैतिक समन्वयाद्वारे सुलभ झाली, ज्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कॉरिडॉरमध्ये विविध आयात मार्ग खुले झाले:

  • युरियाचे मार्ग: ओमान, मलेशिया, व्हिएतनाम, जॉर्जिया, नायजेरिया, रशिया, फिनलंड, इजिप्त, अल्जेरिया, तुर्की आणि नेदरलँड्समधून यशस्वीरित्या पुरवठा निश्चित केला.
  • डीएपी/एनपीके मार्ग: रशिया, मोरोक्को, इजिप्त, अमेरिका, जॉर्डन, दक्षिण कोरिया, ट्युनिशिया आणि सौदी अरेबियामधून तांबड्या समुद्राच्या (Red Sea) सागरी मार्गाने पुरवठा सुरक्षित केला.

भारताची खत सुरक्षा मजबूत, स्थिर आणि सुव्यवस्थित राहील याची खातरजमा करण्यासाठी खत विभाग राज्य सरकारे, वितरण संस्था आणि सहकारी जाळ्यांसोबत अतिशय निकटचा समन्वय राखून काम करत आहे.

 

* * *

सुषमा काणे/शैलेश पाटील/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2276867) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Odia , Tamil , Malayalam