आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताने अवयवदानासाठीच्या 5 लाख प्रतिज्ञांची नोंद करत ओलांडला महत्त्वपूर्ण टप्पा
देशात अवयव आणि उती दानासाठीचा वाढता लोकसहभाग समाजातील जागरूकता आणि सामूहिक कटिबद्धता दर्शवणारा
प्रविष्टि तिथि:
22 JUN 2026 9:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जून 2026
देशातील अवयवदान चळवळीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. भारतामध्ये पाच लाखांहून अधिक अवयवदान प्रतिज्ञांची नोंदणी झाली आहे. यावरून नागरिकांची वाढती जागरूकता, संवेदनशीलता आणि अवयव तसेच उती दानाच्या जीवनरक्षक कार्याविषयी असलेली सामूहिक कटिबद्धता दिसून येते.
प्रस्तुत कामगिरी अवयवदानाला मानवतेचे एक उदात्त कार्य म्हणून मिळणारी वाढती सार्वजनिक मान्यता अधोरेखित करणारी आहे. हे कार्य अवयवांचे प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा करणाऱ्या रुग्णांच्या आशा पल्लवित करणारे आणि जीवनामध्ये दुसरी संधी देणारे आहे. अवयव आणि उती दानाला स्वयंस्फूर्तीने प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच लोक या कार्यामध्ये जाणीवपूर्वक सहभागी होत आहेत, त्यामुळे सामाजिक जबाबदारीची संस्कृती रुजवण्याच्या केंद्र सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमध्येही उल्लेखनीय प्रगती दिसून येत आहे.
या निमित्ताने, एनओटीटीओ म्हणजेच 'नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन' अर्थात राष्ट्रीय अवयव आणि उती प्रत्यारोपण संघटनेचे संचालक डॉ. अनिल कुमार यांनी अवयवदानाच्या कार्याला दिलेल्या प्रचंड पाठिंब्याबद्दल देशभरातील नागरिकांचे आभार मानले आहेत. अवयव दानाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि लोकांचा सहभाग वाढविण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत असलेल्या सरकारी आणि बिगर-सरकारी संस्था, आरोग्यसेवा व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, प्रसारमाध्यमे आणि इतर भागीदार यांनी दिलेल्या मौल्यवान योगदानाची दखल घेतली आहे. हा टप्पा गाठण्यासाठी सातत्यपूर्ण कटिबद्धता आणि सहकार्य दर्शवणाऱ्या सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.
या समाज कार्यासाठी सातत्याने जागरूकता निर्माण करणे, संस्थात्मक क्षमता वाढवणे आणि प्रत्यारोपण प्रणाली बळकट करणे याद्वारे अवयव आणि उतींची मागणी तसेच उपलब्धता यांमधील तफावत दूर करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. देशभरातील अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया नैतिक, न्याय्य, पारदर्शक आणि रुग्ण-केंद्रित राहतील याची खात्री करण्याचे प्रयत्न जारी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमातून केलेल्या प्रेरणादायी आवाहनांमुळे अलीकडच्या काळात देशातील अवयवदान चळवळीला नवी गती मिळाली आहे. अनेक प्रसंगी, पंतप्रधानांनी अवयवदानाचे परिवर्तनकारी महत्त्व अधोरेखित केले आहे आणि नागरिकांना या उदात्त कार्याला सक्रिय पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे; ज्यामुळे जीवन वाचवण्याच्या आणि सुधारण्याच्या व्यापक राष्ट्रीय चळवळीत योगदान मिळत आहे.

उपक्रम सुलभ करण्यासाठी, ‘आधार’-आधारित अवयवदान प्रतिज्ञा नोंदणी पोर्टल (notto.abdm.gov.in) ने नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक बनवून ती अधिक कार्यक्षम केली आहे. या मंचामुळे देशभरातील नागरिकांना आपली प्रतिज्ञा सोयीस्करपणे नोंदवणे शक्य झाले आहे. तसेच त्यामुळे लोकसहभाग बळकट झाला आहे आणि अवयवदान परिसंस्थेवरील विश्वास दृढ झाला आहे. ही महत्त्वपूर्ण कामगिरी प्रत्यारोपणासाठी अवयव आणि उतींची वाढती गरज भागवण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असून सरकारने केलेल्या सहयोगात्मक प्रयत्नांचे यश यातून दिसून येत आहे.
* * *
निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2276863)
आगंतुक पटल : 10