रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

हरियाणा आणि राजस्थानमधील प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने पातुवास मेहराना, हांसी आणि बिजैनगर येथे अतिरिक्त रेल्वे थांब्यांना दिली मंजुरी


दिल्ली-सत्रोड पॅसेंजर, आगरतळा-फिरोजपूर एक्सप्रेस, बिकानेर-हरिद्वार एक्सप्रेस आणि जयपूर-आसरवा एक्सप्रेस गाड्यांच्या नवीन थांब्यांमुळे हजारो प्रवाशांना होणार फायदा

प्रविष्टि तिथि: 22 JUN 2026 2:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 जून 2026

 

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसुविधा लक्षात घेत तसेच रेल्वेची उपलब्धता आणि संपर्क सुविधा सुधारण्याच्या उद्देशाने हरियाणा आणि राजस्थानमधील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थानकांवर चार गाड्यांसाठी अतिरिक्त थांब्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे स्थानिक प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि इतर रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे.

मंजूर करण्यात आलेले नवीन थांबे पुढीलप्रमाणे आहेत :

  • गाडी क्रमांक 54085/54086 दिल्ली-सत्रोड पॅसेंजर – हरियाणातील पातुवास मेहराना स्थानक
  • गाडी क्रमांक 14619/14620 अगरतळा-फिरोजपूर एक्सप्रेस – हरियाणातील हांसी स्थानक
  • गाडी क्रमांक 14717/14718 बिकानेर-हरिद्वार एक्सप्रेस – हरियाणातील हांसी स्थानक
  • गाडी क्रमांक 12981/12982 जयपूर-आसरवा एक्सप्रेस – राजस्थानातील बिजैनगर स्थानक

सविस्तर परिचालन मूल्यांकन आणि प्रवाशांच्या मागणीच्या सविस्तर अभ्यासात हे नवीन थांबे परिचालनदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

पातुवास मेहरानासाठी सुधारित रेल्वे सुविधा

रेवाडी-भिवानी मार्गावर असलेल्या पातुवास मेहराना स्थानकावर सध्या 3 जोड्या मेल/एक्सप्रेस गाड्या आणि 2 जोड्या पॅसेंजर गाड्या धावतात. 54085/54086 दिल्ली-सत्रोड पॅसेंजर गाडीच्या थांब्याला मंजुरी मिळाल्याने आसपासच्या परिसरातील रहिवाशांसाठी रेल्वे संपर्क सुविधा अधिक मजबूत होईल आणि दैनंदिन रेल्वे वाहतूक अधिक सुलभ होईल.

यापूर्वी या गाडीचे सर्वात जवळचे थांबे झारिली आणि चरखी दादरी येथे होते, जे अनुक्रमे सुमारे 6 किमी आणि 7 किमी अंतरावर आहेत. नवीन थांब्यामुळे शेजारच्या स्थानकांवरील अवलंबित्व कमी होईल, फर्स्ट-माईल आणि लास्ट-माईल संपर्क सुविधा सुधारेल तसेच स्थानिक प्रवासी, विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवाशांची अधिक सोय होईल.

हांसीसाठी वाढीव संपर्क सुविधा

भिवानी-हिसार विभागातील एक महत्त्वाचे स्थानक असलेल्या हांसी स्थानकात आधीपासूनच 8 जोड्या मेल/एक्स्प्रेस गाड्या, 7 जोड्या पॅसेंजर गाड्या आणि 2 जोड्या विशेष रेल्वे गाड्या थांबतात. त्यामुळे हे स्थानक या प्रदेशातील एक महत्त्वाचे प्रवासी केंद्र बनले आहे.

आता गाडी क्रमांक 14619/14620 आगरतळा-फिरोजपूर एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 14717/14718 बिकानेर-हरिद्वार एक्स्प्रेससाठी थांब्यांना मंजुरी मिळाल्याने, हांसी आणि आसपासच्या भागांतील प्रवाशांना अतिरिक्त लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांचा थेट लाभ मिळेल. पूर्वी, या गाड्या अनुक्रमे सुमारे 37 किमी आणि 25 किमी अंतरावर असलेल्या भिवानी शहर आणि हिसार येथे थांबत असत. नवीन थांब्यांमुळे प्रवासाची सोय सुधारेल, देशाच्या उत्तर, पूर्व आणि पश्चिम भागांशी संपर्क वाढेल आणि प्रवाशांना त्यांच्या जवळच्या स्थानकावरून प्रवासाचे अधिक पर्याय उपलब्ध होतील.

बिजैनगरसाठी अतिरिक्त रेल्वे सोय

राजस्थानमधील बिजैनगर स्थानकावर सध्या 19 मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या जोड्या आणि 8 विशेष गाड्यांच्या जोड्या थांबतात. यातून अजमेर-चंदेरिया विभागातील बिजैनगर स्थानकाचा महत्त्व स्पष्ट होते.

बिजाईनगरला ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आता 12981/12982 जयपूर-आसरवा एक्स्प्रेसवा नव्याने मंजूर केलेल्या थांब्याचा फायदा होईल. यापूर्वी, ही गाडी अनुक्रमे सुमारे 42 किमी आणि 67 किमी अंतरावर असलेल्या नसीराबाद आणि भिलवाडा येथे थांबत असे. या नवीन थांब्यामुळे या महत्त्वाची आंतरराज्यीय सेवा उपलब्ध झाल्याने राजस्थान आणि गुजरात दरम्यानची संपर्क सुविधा सुधारेल आणि या भागातील प्रवासी, व्यापारी, विद्यार्थी तसेच व्यावसायिक प्रवाशांना अधिक सोई उपलब्ध होतील.

प्रवाशांच्या हिताचा निर्णय

भारतीय रेल्वेचा हा निर्णय प्रवाशांच्या सोयी सुविधा वाढवणे, रेल्वे सेवा अधिक सुलभ करणे आणि प्रवाशांच्या मागणीनुसार सेवानियोजन करणे या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. ज्या स्थानकांवर प्रवाशांची मागणी आहे आणि संचलनाची व्यवहार्यता सिद्ध झाली आहे, अशा ठिकाणी थांबे सुरू करून, भारतीय रेल्वे देशभरातील लोकांसाठी रेल्वे प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे दिसून येते.

 

* * *

नितीन फुल्‍लुके/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2276546) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada