MIFF banner

तंत्रज्ञान बदलले तरी चित्रपट महोत्सवांचा गाभा कायम राहील – ‘मिफ्फ’ खुल्या मंचावर तज्ज्ञांनी व्यक्त केले मत


बनावट चित्रपट महोत्सवांना पायबंद घालण्यासाठी सरकारने कृती करावी- तज्ज्ञ समितीचे आवाहन

मुंबई, 20 जून 2026

 

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स, डिजिटल तंत्रज्ञान आणि  चित्रपट पाहण्याच्या बदलत्या सवयींमुळे  रुपेरी पडद्याचे स्वरुप बदलले असले तरी शोध, ज्ञान आणि सामुहिक अनुभूतीचे स्थान म्हणून चित्रपट महोत्सवांचे महत्त्व कायम राहील,  असा विश्वास मिफ्फ म्हणजेच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पाचव्या आणि अंतिम चर्चासत्रात आज वक्त्यांनी व्यक्त केला.  

भारतीय माहितीपट निर्माता संघटनेने (आयडीपीए) चित्रपट महोत्सवादरम्यान हे चर्चासत्र आयोजित केले होते. “बदलते तंत्रज्ञान, बदलते प्रेक्षक यामुळे चित्रपट महोत्सवांचे स्थित्यंतर होत आहे का?” असा चर्चासत्राचा विषय होता. या चर्चासत्रात ज्येष्ठ, जाणत्या निर्मात्यांना तंत्रज्ञानामुळे प्रेक्षकांची चित्रपटांची आवड कशी बदलत आहे हे जाणून घेता आले तसेच चित्रपट महोत्सवांचे कालातीत महत्त्व तपासून पाहता आले.  

चर्चासत्रात तज्ज्ञ म्हणून बेंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संस्थापक सदस्य आणि माजी कला दिग्दर्शक एन. विद्याशंकर, इंडिया हॅबिटॅट सेंटरचे संचालक प्रो. (डॉ.) के. जी. सुरेश, चित्रपट समीक्षक आणि महोत्सवाचे सल्लागार प्रेमेंद्र मजुमदार आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (पिफ्फ) सर्वेसर्वा आदिती अक्कलकोटकर सहभागी झाले होते. चित्रपट निर्माते आणि आयडीपीएचे अध्यक्ष संस्कार देसाई यांनी या चर्चासत्राचे संचालन केले.

चर्चासत्राच्या प्रारंभी एन. विद्याशंकर यांनी एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील डिजिटल क्रांतीमुळे चित्रपट महोत्सवांचे स्वरुप कसे बदलत गेले याविषयी माहिती दिली. तंत्रज्ञानामुळे चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग कमालीचा वाढला असला तरी चित्रपट महोत्सवांचा मूळ हेतू कायम राहिला आहे असे मत त्यांनी मांडले. “चित्रपट महोत्सव म्हणजे चित्रपटांचा अनुभव घेणे आहे. ते केवळ माहिती मिळवणे नाही,” असे ते म्हणाले. संग्रहालयांचा संदर्भ देऊन ते म्हणाले की ऑनलाइन माध्यमांवर मुबलक माहिती उपलब्ध असूनही प्रेक्षक सांस्कृतिक अनुभवांच्या शोधात आजही आहेत. “चित्रपटांचे महत्त्व अबाधित आहे आणि ते जपणाऱ्या काही ठिकाणांमध्ये चित्रपट महोत्सवांचा समावेश होतो,” असे ते म्हणाले.

विद्याशंकर म्हणाले की, तरुण पिढी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि चित्रपटांचा कल जाणून घेण्यासाठी चित्रपट महोत्सवाला हजेरी लावते; तर ज्येष्ठ प्रेक्षक भूतकाळातील आठवणींच्या शोधात इथे येतात. यामुळे दोन पिढ्यांच्या संगमाची अनोखी सांस्कृतिक सृष्टी इथे निर्माण होते.

प्रो. (डॉ.) के जी. सुरेश यांनी चर्चेचा सूर अस्तित्वाकडून समर्पकतेकडे नेला. भारतातील चित्रपट महोत्सवांच्या वाढत्या संख्येकडे लक्ष वेधून त्यांनी सुजाण प्रेक्षक घडवण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत असा सवाल उपस्थित केला.

"चित्रपट महोत्सव हे चित्रपटसृष्टीचे उत्सव असतात, परंतु त्यातून शिकण्याचा अनुभवही मिळाला पाहिजे," असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, दर्जेदार आशय केंद्रस्थानी असेल, तरच तंत्रज्ञान चित्रपटसृष्टीला अधिक सक्षम बनवू शकते. चित्रपट हे शिक्षण आणि वर्तनपरिवर्तनासाठी सर्वाधिक प्रभावी साधनांपैकी एक असल्याचे सांगत सुरेश यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये चित्रपट आस्वादाचा समावेश करण्याचे आणि तरुणांना लहान वयातच चित्रपटांशी परिचित करून देण्याचे समर्थन केले.

स्वतःचा अनुभव सांगताना आदिती अक्कलकोटकर यांनी नमूद केले की, पीआयएफएफमध्ये काम केल्यामुळे मुख्य प्रवाहातील मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन त्यांना चित्रपटसृष्टीचे अधिक व्यापक आकलन करता आले. "चित्रपट महोत्सव प्रेक्षकांसाठी अशा जगांची दारे उघडतात,  असा  अनुभव त्यांना अन्यथा कदाचित कधीच मिळाला नसता," असे त्या म्हणाल्या. पीआयएफएफच्या आयोजनात विद्यार्थ्यांची भूमिका अधोरेखित करत अक्कलकोटकर यांनी चित्रपट प्रदर्शनांव्यतिरिक्त घडणाऱ्या परस्परसंवादांचे महत्त्व स्पष्ट केले. यामध्ये चित्रपट प्रेमींमधील संपर्क  निर्मिती, चित्रपट निर्माते आणि प्रेक्षक यांच्यातील विचारांची देवाणघेवाण तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीचा परिचय यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

समालोचनात्मक दृष्टिकोन मांडताना प्रेमेंद्र मजुमदार यांनी डिजिटल युगात तथाकथित चित्रपट महोत्सवांच्या अनियंत्रित वाढीबाबत चिंता व्यक्त केली. तंत्रज्ञानामुळे कार्यक्रमांचे आयोजन अधिक सुलभ झाले असल्याचे मान्य करताना त्यांनी इशारा दिला की अनेक बनावट महोत्सव उदयास आले आहेत, जे खऱ्या सांस्कृतिक मंचांऐवजी प्रामुख्याने व्यावसायिक उपक्रम म्हणून कार्य करतात.

"अशा महोत्सवांमध्ये अनेकदा पैसे देऊन पुरस्कार मिळविण्याच्या पद्धतीद्वारे चित्रपट निर्मात्यांचे शोषण केले जाते आणि ते कायदेशीर तसेच नियामक आवश्यकतांचे पालन न करता कार्यरत असतात," असे ते म्हणाले. चित्रपट निर्मात्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि महोत्सव परिसंस्थेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी अधिक मजबूत शासकीय देखरेखीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या चर्चेत चित्रपट संस्कृतीच्या संवर्धनात चित्रपट संस्थांची सुरू असलेली भूमिका देखील अधोरेखित करण्यात आली. मजुमदार आणि सुरेश या दोघांनीही शैक्षणिक उपक्रम, महाविद्यालयीन चित्रपट संस्था आणि विस्तारित चित्रपट अध्ययन कार्यक्रमांच्या माध्यमातून जाणकार प्रेक्षकवर्ग निर्माण करण्याच्या गरजेवर भर दिला.

या सत्राचा समारोप या एकमताने झाला की स्वरूप, मंच आणि प्रेक्षकांच्या सवयी सतत बदलत राहतील, तरीही सांस्कृतिक देवाणघेवाण, चित्रपटांचा शोध आणि चलतचित्रांच्या सामूहिक उत्सवासाठी चित्रपट महोत्सवांचे महत्त्व अपरिहार्य राहील.

या मुक्त चर्चासत्राने एमआयएफएफ 2026 दरम्यान आयडीपीएतर्फे आयोजित पाच भागांच्या चर्चामालिकेचा समारोप केला. या मालिकेत चित्रपट निर्माते, अभ्यासक आणि उद्योग क्षेत्रातील संबंधित घटक एकत्र आले होते. त्यांनी वेगाने बदलणाऱ्या तांत्रिक युगात चित्रपटसृष्टी आणि माहितीपट संस्कृतीच्या भविष्यावर सखोल चर्चा केली.

 

* * *

पीआयबी मुंबई | सुषमा काणे/सुरेखा जोशी/नितीन गायकवाड/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2275816   |   Visitor Counter: 15