MIFF banner

मिफ्फ महोत्सवात दाखवलेल्या स्विस माहितीपटाच्या माध्यमातून मैत्री आणि मानवी नातेसंबंधांच्या शाश्वत ताकदीचा गौरव

मुंबई, 20 जून 2026

 

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्विस माहितीपट आय लव्ह यू, आय लीव्ह यू (I Love You, I Leave You) निमीत्त झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान मैत्री, मानसिक आरोग्य आणि मानवी संघर्षासंबंधी विचार करायला लावणारी चर्चा झाली. आय लव्ह यू, आय लीव्ह यू या बहुभाषिक चित्रपटाचे दिग्दर्शन मॉरिस फ्रायबर्गहॉस यांनी केले असून, लिओन श्विट्टर आणि फॅबियाना सीट्झ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या माहितीपटाला झ्युरिच चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठीचा गोल्डन आय पुरस्कार आणि प्रेक्षक पसंतीचा पुरस्कार देखील मिळाला आहे. मिफ्फच्या विशेष मिड-फेस्ट या उपक्रमाचा एक भाग या माहितीपटाचा खेळ दाखवला गेला. या आंतरराष्ट्रीय प्रीमियरला प्रेक्षक आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.

हा माहितीपट दिनो या संगीतकाराच्या प्रवासावर आधारित आहे. दिनो स्वतःची ओळख आणि अस्तित्वाच्या शोधात आपल्या वडिलांची मातृभूमी असलेल्या अंगोला या देशात जातो. मात्र या प्रवासात त्याला मानसिक आरोग्याच्या तीव्र समस्येचा सामना करावा लागतो आणि कथेला अनपेक्षित वळण मिळते, आणि त्यातून मैत्री, परस्परांची काळजी आणि आव्हानात्मक परिस्थितीतून बाहेर पडण्याचा पट उलगडला जातो.

आय लव्ह यू, आय लीव्ह यू या शिर्षकाचा अर्थ प्रेमाचा शेवट असा नाही. तर काही वेळा लोकांना वेगळी वाट निवडावी लागते, मात्र तरीही एकमेकांची काळजी घेण्याची आणि मैत्रीची भावना कायम राहते, हा विचार यातून मांडला असल्याचे  दिग्दर्शक मॉरिस यांनी सांगितले. या चित्रपटाची सुरुवात खुद्द दिनो यानेच केली होती, त्याला आपली कथा जगासमोर आणायची होती आणि मानसिक आरोग्याच्या आव्हानांबद्दल समाजात एक जाणिव निर्माण करायची होती अशी माहितीही त्यांनी दिली.

मॉरिस फ्रायबर्गहॉस यांनीही या पत्रकार परिषदेत उपस्थितांशी संवाद साधला. दिनोसोबतच्या आपल्या प्रदीर्घ मैत्रीतून हा माहितीपट आकाराला आल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही ठराविक संहितेऐवजी वास्तविक जीवनातील अनुभवांमधून हा चित्रपट नैसर्गिकरीत्या विकसित होत गेल्याचे त्यांनी सांगितले. माहितीपट हे कठोर भावना व्यक्त करण्याचे आणि कलेच्या माध्यमातून आपापसातील नाते अधिक घट्ट करण्याचे एक माध्यम आहे असे ते म्हणाले. मानसिक आरोग्याबद्दलही त्यांनी आपली मते व्यक्त केली. बऱ्याचदा लोकांच्या वैयक्तिक संघर्षांची माहिती आआपल्याला नसते, मात्र आपण त्याबद्दल मते तयार करतो, पण अशावेळी परस्परांबद्दल सहानुभूती आणि एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे असते असे त्यांनी सांगितले. हा चित्रपट प्रेक्षकांना इतरांशी संवाद साधताना अधिक मोकळे राहण्याबद्दल, दयाभाव बाळगण्याबद्दल आणि संवेदनशीलता बाळगण्यासाठी प्रोत्साहन देतो असे त्यांनी सांगितले.

अर्थपूर्ण संवाद घडवून आणण्यात चित्रपटांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही दोन्ही दिग्दर्शकांनी अधोरेखित केले. हा माहितीपट मानसिक आरोग्याविषयी अधिक जागरूकता निर्माण करेल तसेच संकटाच्या काळात मैत्री आणि मानवी नातेसंबंधांच्या ताकदीचे स्मरण करून देईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 

* * *

पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2275686   |   Visitor Counter: 16