MIFF banner

एमआयएफएफ 2026 मध्ये ‘गुदगुदी’ या लघुपटातून आशा, आत्मस्वीकृती आणि भावनिक आरोग्याचा संदेश

मुंबई, 20 जून 2026

 

हिंदी लघुपट ‘गुदगुदी’ चा आशियाई प्रीमियर 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (एमआयएफएफ 2026) शुक्रवारी (19 June 2026) पार पडला. दिग्दर्शिका मनीषा मकवाना यांचा हा 21 मिनिट  हिंदी काल्पनिक लघुपट असून, दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाच्या भव्य प्रीमियरप्रसंगी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी)तर्फे दिग्दर्शिका, निर्माते हर्ष पटेल, प्रमुख कलाकार अहास चन्ना, हृदांश पारेख आणि चित्रपटाच्या तांत्रिक चमूचा सत्कार करण्यात आला.

चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनापूर्वी दिग्दर्शिका मनीषा मकवाना आणि निर्माते हर्ष पटेल यांनी महोत्सवस्थळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेविषयी, त्यातील आशय आणि विविध चित्रपट महोत्सवांमधील प्रवासाविषयी माहिती दिली.

‘गुदगुदी’ या शीर्षकाचे महत्त्व स्पष्ट करताना मनीषा मकवाना म्हणाल्या की, हा शब्द आनंद आणि आशेच्या भावनेचे प्रतीक आहे. त्या म्हणाल्या, “चित्रपटाच्या शेवटी आरव हे बालपात्र सांगते की त्याच्या हृदयात ‘गुदगुदी’ होत आहे. ही भावना या कथेमागील मूळ आशय व्यक्त करते.” रेड कार्पेटवर बोलताना त्या म्हणाल्या, “हा चित्रपट माझ्या हृदयाचा एक भाग आहे आणि प्रेक्षकांनीही हा चित्रपट पाहताना ‘गुदगुदी’ अनुभवावी, अशी माझी अपेक्षा आहे.” त्यानंतर या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

या चित्रपटाची कथा रितू या तरुणीभोवती फिरते. ती एका मनोरंजन उद्यानात मॅस्कॉट म्हणून काम करते. आपल्या व्यवसायाबद्दल तिला लाज वाटत असते आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली ती स्वतःच्या मूल्यांविषयी साशंक असते. मात्र, आरव या लहान मुलाशी झालेल्या संवादातून तिच्या आयुष्याकडे आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो. दिग्दर्शिकेच्या मते, चित्रपटातील मॅस्कॉटचा पोशाख हा एक रूपकात्मक पडदा असून, तो रितूच्या खऱ्या भावना आणि तिच्या अंतर्गत संघर्षांना जगापासून लपवून ठेवतो.

गुदगुदी'मधील प्रमुख पात्र, 'रितू' ही केवळ एका व्यक्तीची कथा नाही, तर ती मध्यमवर्गीय घरातील प्रत्येक मुलाची कथा आहे. आरव नावाचा एक लहान मुलगा, जो तिच्या वेशभूषेच्या पलीकडे तिला खऱ्या रूपात पाहू शकतो, त्याच्याशी असलेले तिचे मूक नाते या चित्रपटाचा भावनिक गाभा ठरते आणि हळुवारपणे तिला पुनः मोकळेपणी बोलायला प्रवृत्त करते. रितूचं ओसरत चाललेलं आत्मभान प्रतिबिंबित करण्यासाठी वापरलेल्या हाय-अँगल शॉट्समध्ये, तसेच तिच्या आंतरिक गोंधळाचा प्रतिध्वनि उमटवण्यासाठी परस्परांवर आदळणाऱ्या गोंधळाच्या दृश्यांमधून दिग्दर्शकीय बारकावे दिसून येतात. एका शांत विद्रोहात, सहसा न बोलणारा शुभंकर केवळ व्हॉईसओव्हरमध्ये बोलतो, त्यामुळे तिचा सार्वजनिक मुखवटा आणि खासगी असुरक्षितता यांमधील विरोधाभास अधिक गडद होतो. आरवसमोर, ज्याने तिला खऱ्या अर्थाने, म्हणजेच प्रत्यक्ष आणि लाक्षणिक अशा दोन्ही प्रकारे पाहिले आहे, ऋतू अखेरीस तिच्या 'मॅस्कॉट'चा मुखवटा उतरवते. हा चित्रपट एका खुल्या वळणावर संपतो आणि प्रेक्षकांना त्यांची स्वतःची 'गुदगुदी’, जी आशा आणि आनंदाचे प्रतीक आहे,  शोधण्याचे आवाहन करतो. तसेच, नव्याने गवसलेल्या आनंदाचा आपापल्या परीने अर्थ लावण्याची संधीही देतो. अगदी शेवटी, हा चित्रपट प्रत्यक्ष जीवनातील 'मॅस्कॉट्स'च्या (शुभंकर) कठोर परिश्रमांची दखल घेत त्यांचे विशेष आभार मानतो.

'गुदगुदी’च्या पटकथेचे वर्णन 'धाडसी' असे करत दिग्दर्शिकेने सांगितले की, ही कथा तिच्या स्वतःच्या अत्यंत वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहे. “ऋतू आणि आरव यांचा प्रवास हे दर्शवतो की, कधीकधी मनावरचे भावनिक ओझे उतरवणे योग्य असते. हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये आशा निर्माण करतो आणि त्यांना आपल्या प्रियजनांशी मनमोकळेपणाने संवाद साधण्याचे प्रोत्साहन देतो,” त्या म्हणाल्या. या चित्रपटाच्या संवादांना गुजराती भाषेचा आणि संस्कृतीचा बाज आहे, त्यामुळे चित्रपटाला दिग्दर्शिकेचा वैयक्तिक स्पर्श लाभला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट त्यांच्या अत्यंत वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण अहमदाबादमधील 'बाल वाटिका पार्क' येथे करण्यात आले असून, यात चित्रीकरणादरम्यान सहजपणे घडलेले अनेक अनौपचारिक क्षण आणि उत्स्फूर्त कृतींचा समावेश आहे. दिग्दर्शकाने चित्रपटातील सर्वात प्रभावी क्षण म्हणून ज्या दृश्याचे वर्णन केले आहे, ते म्हणजे, रितू शेवटी तिचे आयुष्य जसे आहे तसे स्वीकारते आणि मुक्तीची भावना अनुभवते.

चित्रपटाच्या मुख्य संदेशावर भाष्य करताना, निर्माते हर्ष पटेल यांनी प्रेक्षकांना त्यांच्या अंतर्मनाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. “लोकांनी विश्वासू मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधायला हवा. भावनिक स्वास्थ्य हे प्रामाणिक संभाषणातूनच सुरू होते,” ते म्हणाले.

अभिनेत्री अहसास चन्नाची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्याबाबत बोलताना, दिग्दर्शिका मनीषा मकवाना यांनी सांगितले की, पटकथा ही तिलाच डोळ्यांसमोर ठेवून लिहिली गेली होती. "‘एहसास’ ही अशा कलाकारांपैकी नाही, जे आपला प्रभाव गाजवण्याचा किंवा प्रसिद्धीचा हव्यास धरतात. सामान्यतः कलाकारांना आपला चेहरा पडद्यावर दाखवणे आवडते, मात्र या चित्रपटात तिचा चेहरा बहुतांश वेळ एका ‘मस्कॉट’च्या मुखवट्याआड झाकलेला असतो आणि तो केवळ काही मिनिटांसाठीच दिसतो. कदाचित आपल्या अभिनयकौशल्यावर असलेल्या आत्मविश्वासापोटीच तिने ही भूमिका स्वीकारली असावी." त्या म्हणाल्या.

बालकलाकार हृदांशच्या निवडीबद्दल बोलताना दिग्दर्शक म्हणाले की, त्याच्या एका आधीच्या प्रोजेक्टमधील अभिनयाने प्रभावित झाल्यामुळे कास्टिंग डायरेक्टरने त्याची निवड केली.

ऑनलाईन आणि ऑफलाईन आयुष्याचा समतोल राखण्याच्या दबावामुळे मानसिक आरोग्याची आव्हाने वाढत असल्याचे चित्रपटाच्या दिग्दर्शक मनीषा मखवाना यांनी नमूद केले. हा चित्रपट आत्मचिंतन, आत्म-स्वीकृती आणि भावनिक मोकळेपणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो, असे त्यांनी नमूद केले.

दिग्दर्शिकेने हे देखील सांगितले की, त्यांनी यापूर्वी 'स्त्री' आणि 'द फॅमिली मॅन', यासारख्या प्रेक्षकांच्या प्रशंसेला पात्र ठरलेल्या कलाकृतींवर काम केले आहे. चित्रपट निर्माते राज निदिमोरू आणि कृष्णा डी.के. (राज आणि डीके) हे या क्षेत्रातील आपले मार्गदर्शक आहेत.

'गुदगुदी' या लघुपटाचे पोस्टर

'गुदगुदी'ला आंतरराष्ट्रीय महोत्सवांच्या वर्तुळात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मिफ्फ 2026 मधील प्रदर्शनाव्यतिरिक्त, हा चित्रपट कान चित्रपट महोत्सवातील 'शॉर्ट फिल्म कॉर्नर'मध्येही प्रदर्शित करण्यात आला होता. अस्सल कथाकथनाचे महत्त्व सांगताना मखवाना म्हणाल्या, "प्रामाणिक कथांना नेहमीच त्यांचे स्थान मिळते."

निर्माते थिएटरमध्ये प्रदर्शनाच्या शक्यतांचा शोध घेत आहेत आणि सिनेमागृहात प्रदर्शनासाठी तीन ते चार लघुपटांचे एकत्र पॅकेजिंग करण्याचा विचार करत आहेत अशी माहिती निर्माते हर्ष पटेल यांनी दिली. हा चित्रपट काही काळ विविध महोत्सवांमध्ये सहभागी होईल, अशी माहिती निर्माता आणि दिग्दर्शकाने दिली.

 

* * *

पीआयबी मुंबई | नेहा कुलकर्णी/हेमांगी कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2275681   |   Visitor Counter: 17