MIFF banner

मिफ्फ-26 मध्ये प्रदर्शित, जर्मनीच्या विद्यार्थ्यांच्या दहा पुरस्कार प्राप्त चित्रपटातून प्रेक्षकांना जागतिक सिनेमाच्या भवितव्याकडे बघण्याची दृष्टी मिळते


“इमर्जिंग वॉइसेस : फिल्स स्कूल एडिशन” विभागातून नव्या पिढीच्या जागतिक विचारांचे प्रतिबिंब

मुंबई, 19 जून 2026

 

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव- मिफ्फ 2026 मध्ये, जर्मनीतील अत्यंत प्रतिष्ठित अशा, ‘फिल्मअॅकेडमी बादेन – वृटनबर्ग जीएमबीहा (FABW), ही जगातील सर्वाधिक नामवंत फिल्म स्कूलपैकी एक असलेल्या या स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या दहा चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या “इमर्जिंग वॉइसेस : फिल्स स्कूल एडिशन” या विशेष विभागात समाविष्ट झालेल्या या चित्रपटातून, वैविध्यपूर्ण विषयांना स्पर्श करणाऱ्या कथानकांचा समावेश करण्यात आला आहे. यात ऍनिमेशन, लघुपट आणि माहितीपट या सगळ्यांचा समावेश असून, त्यातून नव्या पिढीच्या चित्रपट निर्मात्यांची त्यांची सर्जक ऊर्जा आणि कलात्मकता प्रतिबिंबित होते.

दुःख, आपलेपणा आणि ओळखीच्या भावनिक कथांपासून ते स्मृती, वार्धक्य आणि पर्यावरणीय बदल यांसारख्या विषयांचा कलात्मक व नेत्रदीपक अॅनिमेशनद्वारे केलेला वेध घेणाऱ्या चित्रपटांपर्यंत, या चित्रपटांनी समकालीन चित्रपटसृष्टीतील काही सर्वाधिक आशादायी आणि सर्जनशील प्रतिभांना घडविणारे स्कूल, अशी ‘फिल्मअॅकेडमी बादेन – वृटनबर्ग जीएमबीहा’ ची ओळख का आहे, ते यातून प्रभावीपणे दाखवून दिले आहे.

प्रदर्शित करण्यात आलेल्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये ए स्पेरो’ सौंग (A Sparrow's Song) या अॅनिमेटेड ऐतिहासिक लघुपटाचा विशेष उल्लेख करता येईल. टोबायस एकरेलिन (Tobias Eckerlin) दिग्दर्शित हा चित्रपट द्वितीय महायुद्धातील सत्य घटनांपासून प्रेरित आहे. पुरस्कारविजेत्या या चित्रपटात युद्धाच्या विध्वंसक परिस्थितीत एक जखमी चिमणीची काळजी घेणाऱ्या एका वृद्ध विधवेची कथा मांडण्यात आली आहे. त्या चिमणीची सेवा करत असताना तिला जीवनात पुन्हा आशा, आधार आणि मानसिक शांतता मिळते. युद्धाच्या भयावहतेच्या पार्श्वभूमीवर मानवी संवेदना, करुणा आणि आशावाद यांचे अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. आपल्या नाजूक आणि प्रभावी कथनशैलीमुळे तसेच भावनिक खोलीमुळे A Sparrow's Song या अकादमी पुरस्कार विजेत्या लघुपटाने प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप पाडली.

प्रेक्षकांची विशेष पसंती मिळालेल्या अन्य चित्रपटांमध्ये फ्लाइंग अॅनिमल्स (Flying Animals) या माहितीपटाचाही समावेश होता. अॅना निबर्ट (Anna Niebert) दिग्दर्शित या चित्रपटात माहितीपट आणि अॅनिमेशन या दोन्ही माध्यमांचा प्रभावी संगम साधण्यात आला आहे. गंभीर वैद्यकीय समस्यांशी सामना करणाऱ्या तीन मुलांच्या कल्पनाविश्वात हा चित्रपट प्रेक्षकांना घेऊन जातो. त्यांच्या अनुभवांमधून जिद्द, सर्जनशीलता आणि बालमनातील अमर्याद कल्पनाशक्तीचे अत्यंत हृदयस्पर्शी चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात माजिनी या लघुपटाचाही समावेश होता. जोशुआ न्यूबर्ट (Joshua Neubert) आणि व्हिक्टर मुहाघाची (Victor Muhagachi) नी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट टांझानियाच्या किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर उलगडतो. या चित्रपटात दोन भावांची कथा मांडण्यात आली आहे. अनपेक्षित परिस्थितींमुळे त्यांना धोकादायक पाण्यात उतरावे लागते आणि त्यातून त्यांना भीती, जबाबदारी आणि पुरुषत्वाशी संबंधित प्रश्नांचा सामना करावा लागतो. आपल्या सामर्थ्यशाली कथनशैलीमुळे आणि भावनिक वास्तवतेमुळे माजिनी  या चित्रपटाला आधीच अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मान्यता आणि प्रशंसा मिळाली आहे.

यातील, सर्वाधिक दृश्यात्मकदृष्ट्या प्रभावी चित्रपटांपैकी पीयर गार्डन  या अॅनिमेशन पटाचा विशेष उल्लेख करता येईल. शादाब शायेगन दिग्दर्शित या चित्रपटात सहा वर्षांच्या लिली या मुलीची कथा मांडण्यात आली आहे. आपल्या आजीवर झालेल्या मॅस्टेक्टॉमी या वैद्यकीय प्रक्रियेचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना लिली एका स्वप्नवत आणि कल्पनारम्य प्रवासाला निघते. काव्यमय दृश्यरचना आणि अत्यंत संवेदनशील कथनशैलीच्या माध्यमातून पीयर गार्डन हा चित्रपट आजारपण, हानी, दुःख आणि उपचार या विषयांचा एका बालमनाच्या नजरेतून हृदयस्पर्शी वेध घेतो.

तितकाच हृदयस्पर्शी ठरलेला आणखी एक चित्रपट म्हणजे सिल्वर स्ट्रिंग्स हा अॅनिमेटेड बालचित्रपट. पॉल क्ले दिग्दर्शित या चित्रपटात एका वृद्ध व्यक्तीची आणि एका छोट्याशा कोळ्याची अनपेक्षित मैत्री केंद्रस्थानी आहे. ही विलक्षण मैत्री त्या वृद्धाच्या दैनंदिन जीवनात नवा उत्साह आणि अर्थ निर्माण करते. त्याचवेळी, त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्याच्या मुलीसमोरही नवी आव्हाने उभी करते. या नातेसंबंधांमधून स्वातंत्र्य, जिव्हाळा, काळजी आणि वृद्धत्वाशी निगडित भावनिक पैलू अत्यंत संवेदनशीलतेने उलगडले जातात.

इतर चित्रपटांनीही या जर्मन संस्थेतून उदयास येणाऱ्या प्रतिभेची व्याप्ती आणि वैविध्य अधोरेखित केले. चेझिंग काइट्स हा ली झितेनबॅचर  दिग्दर्शित लघुपट नादोन भावांच्या कथेद्वारे दुःख, विरह आणि भावंडांतील नातेसंबंधांचा वेध घेतो. आईच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक पोकळीशी सामना करताना त्यांच्या नात्यात घडणारे बदल आणि त्यांचा अंतर्मनातील संघर्ष या चित्रपटात संवेदनशीलतेने मांडला आहे.

लिनी 12 हा ख्रिस्तोफर शिमीर आणि सारा शूलझ दिग्दर्शित अॅनिमेटेड नाट्य-साहसपट आहे. संगीत, यंत्रसामग्री आणि मैत्री यांचा सुरेख संगम साधत हा चित्रपट नाविन्यपूर्ण दृश्यरचना आणि कल्पक कथनशैलीद्वारे एक वेगळीच अनुभवयात्रा घडवतो.

तसेच स्पार्क (Chispa) हा व्हेरा काय दिग्दर्शित बालनाट्यपट एका लहान मुलीची भावनिक कथा सांगतो. आपल्या कामात सतत व्यस्त असलेल्या वडिलांशी भावनिक जवळीक आणि संवाद शोधण्याचा तिचा प्रयत्न या चित्रपटात अत्यंत हळुवार आणि संवेदनशील पद्धतीने साकारण्यात आला आहे.

या सर्व चित्रपटांमधून मानवी भावना, नातेसंबंध, कल्पनाशक्ती आणि जीवनातील विविध अनुभव यांचे प्रभावी चित्रण घडते.

राईज एज हा टाजना थोउर  दिग्दर्शित प्रायोगिक अॅनिमेटेड संगीतपट असून, त्यामध्ये हवामान बदल आणि त्याविषयी समाजात आढळणाऱ्या सामूहिक नकारात्मकतेचा विषय रंगतदार दृश्यरचना, विनोद आणि संगीताच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. प्रभावी दृश्यभाषा आणि उपरोधिक शैलीच्या साहाय्याने हा चित्रपट पर्यावरणीय संकटांविषयी विचार करायला भाग पाडतो. तर, धिस ईज नॉट ए कॅरेक्टर, धिस ईज बितरेयल This Is Not a Character, This Is Betrayal हा रोमिना कूपर दिग्दर्शित लघुकथात्मक नाट्य-विनोदी चित्रपट वर्गभेद, ओळख आणि कौटुंबिक तणाव यांचा वेध घेतो.

एकूणच, या दहा चित्रपटांनी मिफ्फ मधील चित्रपटप्रेमींना आंतरराष्ट्रीय चित्रपटनिर्मितीच्या भविष्यातील दिशेची झलक दाखवली. धाडसी विषय, भावनिक परिणामकारकता आणि मानवी अनुभवांचे सखोल चित्रण यांमुळे हे चित्रपट विशेष ठरले आहेत.

 

* * *

पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/राधिका अघोर/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2275450   |   Visitor Counter: 10