सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
शिष्यवृत्ती प्राप्त करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाद्वारे महत्त्वपूर्ण सुधारणा आणि डिजिटल उपक्रम
1.2 कोटी विद्यार्थ्यांचा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा भार कमी करण्याच्या उद्देशाने 'अधिवास प्रमाणपत्रा'ची आवश्यकता रद्द
डिजिटल शिष्यवृत्तीसाठी उमंग मंचावर 'सेतू' पोर्टलची सुरूवात
प्रविष्टि तिथि:
19 JUN 2026 2:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जून 2026
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने (डी ओ एस जे ई) अनुसूचित जाती (एस सी) आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मिळवणे अधिक सुलभ करण्यासाठी आणि शिष्यवृत्तीशी संबंधित प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण सुधारणा आणि डिजिटल उपक्रम हाती घेतले आहेत.
एका महत्त्वपूर्ण सुधारणेनुसार, शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करताना 'अधिवास प्रमाणपत्र' सादर करण्याची अट रद्द करण्यात आली आहे. या पावलामुळे विद्यार्थ्यांवरील कागदपत्रांची पूर्तता करण्याचा भार कमी होईल आणि अर्ज प्रक्रिया सुलभ होऊन त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणे सोपे होईल अशी अपेक्षा आहे. आपल्या मूळ राज्याबाहेरील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या देशभरातील हजारो पात्र अर्जदारांनाही याचा लाभ मिळेल.
अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या मॅट्रिक-पूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांतर्गत दरवर्षी सुमारे 1.2 कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो. आतापर्यंत, या योजनांसाठी अधिवास प्रमाणपत्र ही एक अनिवार्य अट होती. ही अट रद्द केल्यामुळे कागदपत्रांची आवश्यकता आणि पूर्ततेचा खर्च कमी होईल, तसेच शिष्यवृत्तीचा लाभ मिळवणे सोपे होऊन अर्ज प्रक्रिया अधिक विद्यार्थी-स्नेही बनेल अशी अपेक्षा आहे.
डिजिटल प्रशासन अधिक बळकट करण्यासाठी, विभागाने शिष्यवृत्ती-संबंधित सेवांसाठी एक सर्वसमावेशक उपाय म्हणून उमंग मंचावर 'सेतू' (शैक्षणिक परिवर्तन आणि उन्नतीसाठी शिष्यवृत्ती) हे पोर्टल सुरू केले आहे. हा मंच पात्र अर्जदार, संस्थात्मक विभागीय अधिकारी, जिल्हा विभागीय अधिकारी आणि राज्य अधिकारी यांना अर्ज नोंदणी, अर्जाची स्थिती तपासणे आणि इतर सेवांची पडताळणी करण्यासाठी एकच सामायिक व्यासपीठ उपलब्ध करून देते, ज्यामुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत वाढ होते.
समावेशकता वाढवणे, प्रक्रियेतील अडथळे दूर करणे आणि कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे या सरकारच्या व्यापक उद्दिष्टांशी हे उपक्रम सुसंगत आहेत. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची व्याप्ती वाढवण्यासाठी आणि त्यांना वेळेवर मदत देण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित सुधारणांचा वापर करण्याबाबत विभाग वचनबद्ध राहिला आहे.
* * *
नाना मेश्राम/संदेश नाईक/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2275107)
आगंतुक पटल : 18