वैयक्तिक प्रवासापासून ते सामाजिक वास्तवापर्यंत: मिफमध्ये तरुण चित्रपटकर्ते माहितीपटांचा कॅनव्हास विस्तारत आहेत
मुंबई, 18 जून 2026
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात "तरुण चित्रपटकर्ते माहितीपटांची नव्याने व्याख्या करत आहेत का?" या विषयावरच्या पॅनेल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे: माहितीपट निर्मितीचे भविष्य सुरक्षित आहे.
प्रख्यात चित्रपटकर्ते प्रबळ खाउंड, लेखिका आणि चित्रपटकर्त्या प्रीती शर्मा, नवोदित चित्रपटकर्त्या समाप्ती दास आणि ज्येष्ठ चित्रपटकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. हिमांशू शेखर खाटुआ यांना एकत्र आणणाऱ्या या चर्चेत, कथाकारांची नवीन पिढी ताज्या दृष्टिकोनातून, तांत्रिक नावीन्यपूर्णतेने आणि सामाजिक वास्तवाशी असलेल्या सखोल बांधिलकीतून माहितीपटांचे विश्व कसे बदलत आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला. या सत्राचे सूत्रसंचालन एनएफडीसीच्या चित्रपट महोत्सवांचे कलात्मक संचालक पंकज सक्सेना यांनी केले.

आजच्या तरुण चित्रपटकर्त्यांना चित्रपट निर्मितीची साधने आणि मंच कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, असे हिंमाशु शेखर खाटुआ म्हणाले "ते एखादी कल्पना विकसित करतात आणि लगेच निर्मितीला सुरुवात करतात. आधीच्या पिढ्यांप्रमाणे, ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्णपणे चित्रपट महोत्सवांवर अवलंबून नाहीत. डिजिटल मंचाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचे नवीन मार्ग खुले केले आहेत," असेही ते म्हणाले. माहितीपटांच्या कथनावर एआय आणि नवीन तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव चित्रपट निर्मितीमध्ये गुणवत्ता आणि वैविध्य आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ओडिशाच्या बिजू पटनायक फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे प्रमुख असलेल्या या ज्येष्ठ चित्रपटकर्त्याने अर्थपूर्ण कथनासाठी तरुण पिढीच्या बांधिलकीवर विश्वास व्यक्त केला. "तरुण चित्रपटकर्ते स्वतःच्या आयुष्याबद्दल आणि सभोवतालच्या समाजाबद्दल खोल आत्मपरीक्षण करणारे आहेत. ते सामाजिक प्रश्नांशी सखोलपणे जोडलेले आहेत. माहितीपट निर्मितीचे भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे आणि येत्या काही वर्षांत निर्मितीचे प्रमाण खूप वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मिफमध्ये दोन चित्रपट प्रदर्शित झालेल्या तरुण चित्रपटकर्त्या समाप्ती दास यांनी तरुणांमध्ये माहितीपट निर्मितीबाबत अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. अनेक महत्त्वाकांक्षी चित्रपटकर्ते या माध्यमाद्वारे उपलब्ध होणाऱ्या संधींबद्दल अनभिज्ञ आहेत, असे त्यांनी सांगितले. "माहितीपट हे केवळ व्यावसायिक चित्रपटांना पर्याय नाहीत; ते चित्रपट निर्मात्यांना उल्लेखनीय उंचीवर नेऊ शकतात," असे त्या म्हणाल्या. दास यांनी माहितीपट निर्मितीच्या खडतर बाजूकडे लक्ष वेधले आणि निर्मात्यांना नवोदित कलागुणांवर अधिक विश्वास ठेवण्याचे आवाहन केले.
स्वतंत्र चित्रपटकर्ती आणि लेखिका प्रीती शर्मा यांनी अनेकदा आव्हानात्मक परिस्थितीत माहितीपट बनवण्यासाठी लागणाऱ्या समर्पणावर प्रकाश टाकला. "मर्यादित स्रोत, निधीची कमतरता आणि मनुष्यबळाचा अभाव असूनही अनेक चित्रपटकर्ते माहितीपट तयार करण्यात वर्षानुवर्षे घालवतात. हे प्रयत्न प्रचंड असतात. हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील याची खातरजमा करणे, हे सर्वात मोठे आव्हान आहे," असे त्या म्हणाल्या आणि त्यांनी युट्यूब व्यतिरिक्त अधिक औपचारिक प्रदर्शन आणि वितरण मंचांची गरज अधोरेखित केली.
ईशान्य भारतातल्या स्थानिक समुदायांचे दस्तावेजीकरण करण्याच्या आपल्या अनुभवांवरून, राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपटकर्ते प्रबळ खाउंड यांनी माहितीपट निर्मितीसाठी आवश्यक असणारा संयम, सांस्कृतिक संवेदनशीलता आणि चिकाटी यावर भाष्य केले. आदिवासी परंपरा आणि विधींचे चित्रीकरण करताना येणाऱ्या आव्हांनाविषयी बोलताना ते म्हणाले की, माहितीपट निर्मात्यांचे काम सोपे आणि अधिक प्रभावी करण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा स्वीकार केला पाहिजे.

प्रेक्षकांच्या दृष्टिकोनात झालेल्या बदलाकडे लक्ष वेधताना, सूत्रसंचालक पंकज सक्सेना म्हणाले की, एके काळी माहितीपट कंटाळवाणे मानले जात. "आज तरुण चित्रपटकर्ते वैयक्तिक अनुभव, मानवी संघर्ष आणि सामाजिक बदलांशी जोडलेल्या कथा सांगत आहेत. त्यांची उत्कट आवड आणि अस्सलता या माध्यमात परिवर्तन घडवून आणत आहे," असे ते म्हणाले.
या चर्चेत संकीर्ण माहितीपट आणि डॉक्यु-फिक्शन यांसारख्या उदयोन्मुख स्वरूपांचाही शोध घेण्यात आला. समकालीन माहितीपटकर्ते पारंपारिक वृत्तांकनाच्या पलीकडे जाऊन मानवी भावना, वैयक्तिक प्रवास आणि जगलेल्या अनुभवांशी सखोलपणे जोडले जात आहेत, असा एक समान विश्वासाचा सूर या संपूर्ण संभाषणातून उमटला. तांत्रिक नावीन्य आणि सामाजिक बांधिलकी यांच्यासह ही भावनिक सचोटी माहितीपटांना पूर्वीपेक्षा अधिक व्यापक प्रेक्षकांशी जोडायला उपयोगी ठरते आहे.
* * *
पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
रिलीज़ आईडी:
2274904
| Visitor Counter:
16