MIFF banner

बुसान: नेक्स्ट वेव्ह या विभागाच्या माध्यमातून 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आशियाई चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख सिने जगताचे दर्शन


निवडक लघुपटांच्या माध्यमातून उलगडली वैविध्यपूर्ण विषय आणि कथात्मक मांडणीची वैशिष्ट्यपूर्ण शैली

मुंबई, 17 जून 2026

 

19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (MIFF) बुसान: नेक्स्ट वेव्ह (Busan: Next Wave) या विशेष विभागाचे आयोजन करण्यात आले आहे. या विभागाअंतर्गत आशियातील सर्वात नामांकित चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (BIFF - Busan International Film Festival) प्रतिनिधिक लघुपटांचे खेळ दाखवले जात आहेत.

बुसान शहरातील समृद्ध चित्रपट संस्कृती आणि देशांतर्गत बहुआयामी चित्रपट उद्योग क्षेत्राच्या बळावर स्वतःची चित्रपटांचे शहर  म्हणून एक भक्कम ओळख निर्माण केली आहे. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि बुसान आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव यांसारख्या प्रसिद्ध उपक्रमांचे केंद्र असलेल्या या शहरात स्क्रिनिंग, कम्युनिटी प्रोग्राम, या उद्योग क्षेत्राअंतर्गत असलेल्या परस्पर संपर्क विस्ताराशी संबंधित उपक्रम आणि कार्यशाळांची एक समृद्ध व्यवस्था उपलब्ध आहे. ही व्यवस्था उदयोन्मुख चित्रपटकर्त्यांना पाठबळ देणारी ठरली आहे. 19 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील बुसान: नेक्स्ट वेव्ह या विभागात पाच चित्रपटांचा समावेश करण्यात आला असून. आपल्या प्रगल्भ आणि वैशिष्ट्यपूर्ण सिनेमॅटिक शैलीच्या माध्यमातून या लघुपटांतून विविध विषयांचा वेध घेतला गेला आहे.

ए मॅन हू टेक्स पिक्चर्स ऑफ फ्लावर्स (A Man Who Takes Pictures of Flowers) हा लघुपट छायाचित्रकार जंग म्युंग किम यांच्या जीवनावर आधारित आहे. जंग म्युंग किम यांनी रानफुलांचे छायाचित्रण करण्यासाठी कोरियामध्ये 40 पेक्षा जास्त वर्षे प्रवास केला. आता  एका गंभीर आजाराचा सामना करत असतानाही, ते आपल्या कामातून आनंद घेत जगण्याचा उद्देश शोधत आहेत. निसर्ग आणि छायाचित्रणाची आवड माणसाच्या आयुष्याला कशी समृद्ध करत राहते, याचे भावस्पर्शी चित्रण या लघुपटात करण्यात आले आहे.

डिले (Delay) या लघुपटातून एका चिनी समलिंगी वडिलांची कथा मांडली आहे. ते आपल्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी पॅरिसला जात असतात. मात्र, प्रवासातील अनपेक्षित विलंब आणि अनपेक्षित घटनांमुळे त्यांच्या प्रवासाची दिशाच बदलते. या अनुभवांच्या माध्यमातून हा चित्रपट कौटुंबिक नातेसंबंध, भावनिक दरी तसेच वडील आणि मुलाच्या नात्यातील गुंतागुंत उलगडण्याचा प्रयत्न करतो.

नॉईज कॅन्सलेशन (Noise Cancellation) हा या विभागातील आणखी एक लघुपट. या लघुपटाची कथा मिजू या तरुणीभोवती फिरते. ती कामाच्या ठिकाणी झालेल्या दुखापतीची भरपाई मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याच वेळी, तिच्या वरच्या खेलीतून सतत येत असलेल्या ओरडण्याच्या आवाजामुळे ती अस्वस्थ होत असते. जसजशी ती या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करते, तसतशी ती एका रहस्यमय आणि अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितीत ओढली जाते, त्याचा तिच्या दैनंदिन जीवनावर परिणामही होऊ लागतो.

इंटरफेस (Interface) आणि इट साउंड्स लाऊडर ऑन रेनी डेज (It sounds Louder on rainy days) हे या विभागातील आणखी दोन लघुपट. या सर्व लघुपटांतून समकालीन आशियाई सिनेमाची समृद्धता आणि विविधता अधोरेखित होते. वैशिष्ट्यपूर्ण कथानक आणि कल्पक सिनेमॅटिक शैलीची अनुभूती देणारा बुसान नेक्स्ट वेव्ह हा उपक्रम आशियातील उदयोन्मुख चित्रपटकर्त्यांची सर्जनशील कल्पकता अधोरेखित करणारा ठरला आहे.

19व्या मिफ विषयी

19 वा मिफ्फ प्रेक्षकांना तल्लीन आणि समृद्ध करणाऱ्या चित्रपटांच्या अनुभूतीची ग्वाही देतो. विचारपूर्वक निवड केलेले आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि चित्रपट क्षेत्रावर केंद्रित अनेक उत्तमोत्तम, उत्कंठावर्धक उपक्रम या महोत्सवात आहेत.

  • या वर्षी महोत्सवाच्या स्पर्धा विभागात भारतासह 46 देशांच्या 1,459 चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या. 
  • महोत्सवात 42 हून अधिक भारतीय भाषांमधले तसेच 30 हून अधिक परदेशी भाषांमधले चित्रपट असून यातून महोत्सवाची जागतिक व्याप्ती आणि सांस्कृतिक विविधता प्रतिबिंबित होते. 
  • जगभरातील प्रसिद्ध चित्रपटनिर्मात्यांच्या कलाकृतींचा समावेश असलेल्या या महोत्सवात उत्कृष्ट माहितीपट, लघुकथा-चित्रपट, ॲनिमेशन, नवोदित दिग्दर्शकांचे चित्रपट आणि विद्यार्थ्यांचे चित्रपट सादर केले जातील.
  • चित्रपटांसोबतच डॉक बझार, ज्ञानवर्धक मास्टरक्लासेस आणि आयडीपीएद्वारे (भारतीय माहितीपट निर्माते संघ) आयोजित ओपन फोरम, यामुळे महोत्सवातील चित्रपटविषयक, सर्जनशील आदानप्रदान अधिक समृद्ध होईल.

प्रभावी चित्रपट, सर्जनशील मने आणि भारून टाकणारे आवाज, यांच्या संगमातून निर्माण होणारा  माहितीपट, ऍनिमेशन आणि लघुपट यांचा अविस्मरणीय सोहळा - मिफ्फ 2026!  कथा सादर करण्याच्या या अद्भुत विश्वात तुमचे स्वागत आहे -मिफ्फ 2026!

 

* * *

पीआयबी मुंबई | शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #MIFF2026. Tag us @pibmumbai on X, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at miff.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


रिलीज़ आईडी: 2274223   |   Visitor Counter: 15