विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारताच्या स्टार्टअप व्यवस्थेने सुमारे 25 लाख रोजगार निर्माण केले ; स्टार्टअप्सची संख्या 350 वरून वाढून 2.3 लाखांवर गेली: डॉ. जितेंद्र सिंह
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2026 8:08PM by PIB Mumbai
भारताची स्टार्टअप मोहीम, रोजगार निर्मितीचे एक प्रमुख माध्यम म्हणून उदयास आली असून, त्यातून गेल्या दशकात सुमारे 24-25 लाख रोजगारांची निर्मिती झाली आहे, अशी माहिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच भू -विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. बंगळुरू इथे आज 'विकसित भारत 2047 साठी नवोन्मेष आणि उद्योजकता द्वारे प्रेरित विकास' या संकल्पनेवर आयोजित 'राईज कॉन्क्लेव्ह 2026 ला त्यांनी संबोधित केले. देशाच्या स्टार्टअप व्यवस्थेत, ज्यामध्ये सुमारे दहा वर्षांपूर्वी केवळ 350 – 400 स्टार्टअप्स होते , ती आज विस्तारून सुमारे 2.3 लाख उपक्रमांपर्यंत पोहोचली आहे; यामुळे भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप व्यवस्था (ईको सिस्टिम) बनला असून, पूर्णपणे 'नवोन्मेष -आधारित अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने देशाची होत असलेली वाटचाल यातून दिसून येते.
भारताच्या नवोन्मेष व्यवस्थेला आकार देण्यात दूरदर्शी नेतृत्वाची भूमिका अधोरेखित करत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान व्यवस्थेत झालेल्या अनेक परिवर्तनकारी बदलाचे श्रेय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या धोरणात्मक दिशेला जाते. 2015 मधील पंतप्रधानांच्या 'स्टार्टअप इंडिया'च्या आवाहनाने उद्योजकतेच्या गतिमान संस्कृतीचा पाया रचला, तर त्यानंतर करण्यात आलेल्या सुधारणांमुळे धोरणात्मक क्षेत्रांमध्ये खाजगी सहभागासाठी नवीन मार्ग खुले केले आणि तरुण भारतीयांना नवोन्मेष -आधारित करिअर निवडण्यासाठी प्रोत्साहित केले असे त्यांनी नमूद केले. या उपक्रमांमुळे एक सहाय्यक व्यवस्था निर्माण होण्यास मदत झाली आहे, जी देशाला आपल्या 'लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा' पुरेपूर वापर करून जागतिक नवोन्मेष केंद्र म्हणून उदयास येण्यास सक्षम बनवत आहे.
संशोधन, उद्योग, स्टार्टअप्स आणि उद्योजकता या चार स्तंभांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणणे हा 'राइज परिषदेचा ' उद्देश होता, असेही जितेंद्र सिंह यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, हा उपक्रम आत्मनिर्भर आणि नवोन्मेष-आधारित भारत घडवण्यासाठी शास्त्रज्ञ, उद्योग, गुंतवणूकदार, शिक्षण जगत आणि धोरणकर्ते यांच्यात सहकार्याला चालना देण्याप्रति सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
'राइज कॉन्क्लेव्ह 2026' मध्ये विकासासाठी एरोस्पेस तंत्रज्ञान, सामाजिक परिवर्तनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी-अन्न नवोन्मेष या विषयांवर चर्चा झाली. तसेच यासोबतच प्रदर्शने, उद्योगांबरोबर संवाद आणि स्टार्टअप्स, एमएसएमई, गुंतवणूकदार, शास्त्रज्ञ व शैक्षणिक संस्थांचा सहभाग होता. या कार्यक्रमात तंत्रज्ञान हस्तांतरण करारांची देवघेव आणि नवोन्मेषक व उद्योजक यांच्यात संवादही झाला.




***
राधिका अघोर/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2272596)
आगंतुक पटल : 7