लोकसभा सचिवालय
भारताचा 2047 सालापर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचा मार्ग शेती, शेतकरी आणि गावांमधूनच जातो: लोकसभा अध्यक्ष
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2026 7:15PM by PIB Mumbai
भारताचा 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचा प्रवास शेती, शेतकरी आणि गावांमधूनच जातो, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज नमूद केले. शाश्वत शेती, नवोन्मेष आणि संशोधन हे 'विकसित भारत@2047' चे मुख्य आधारस्तंभ आहेत, यावर त्यांनी भर दिला; तसेच पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक तंत्रज्ञानाशी मेळ घातल्यास जागतिक स्तरावर कृषी क्षेत्रातील अग्रणी देश म्हणून उदयाला येण्याची भारताकडे क्षमता आहे असेही त्यांनी नमूद केले.
'विकसित भारत @2047 साठी शाश्वत शेती: परंपरा, तंत्रज्ञान आणि ठोस परिणाम' या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला बिर्ला यांनी संबोधित केले. 'अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ' द्वारे 'भारतीय कृषी संशोधन परिषद' आणि 'कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय' यांच्या सहकार्याने नवी दिल्ली येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना बिर्ला म्हणाले की भारतातील शेती केवळ एका आर्थिक क्षेत्रापुरती मर्यादित नसून देशाची संस्कृती, सभ्यता आणि जीवनशैली यांचा अविभाज्य भाग आहे. अन्नसुरक्षा, ग्रामीण समृद्धी, सामाजिक सलोखा आणि सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करत 'विकसित भारता'च्या संकल्पनेत शेती ही केंद्रस्थानी राहील, असे त्यांनी सांगितले. "भारताची गावे हीच देशाची खरी ताकद आहेत आणि आपले शेतकरी हेच आपल्या अर्थव्यवस्थेचा तसेच सामाजिक रचनेचा कणा आहेत," असे त्यांनी अधोरेखित केले.
उपस्थित प्रतिनिधींना शुभेच्छा देताना, बिर्ला यांनी ही परिषद देशाच्या सामूहिक बौद्धिक सामर्थ्याचे प्रतिबिंब असल्याचे नमूद केले. नागरिक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था आणि धोरणकर्ते यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच 'विकसित भारत@2047' चे लक्ष्य साध्य होऊ शकते, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
या कार्यक्रमाच्या यशाबाबत ठाम विश्वास व्यक्त करत बिर्ला यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. पुढच्या दोन दिवसात होणारी चर्चा कृषी शिक्षण आणि शाश्वत शेती पद्धतींना अधिक बळकट करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल आणि शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आत्मनिर्भरतेच्या दिशेने भारताच्या प्रवासाला नवी गती देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
***
माधुरी पांगे/सुषमा काणे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2272580)
आगंतुक पटल : 9