संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्र्यांनी डुंडीगल स्थित हवाई दल अकादमी येथे 217 व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाचे केले निरीक्षण
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2026 11:08AM by PIB Mumbai
नॅशनल डिफेन्स अकादमीमधील महिलांच्या पहिल्या तुकडीसह हैदराबादमधील डुंडीगल येथील हवाई दल अकादमीमधून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या एकूण 231 फ्लाईट कॅडेट्सना (194 पुरुष आणि 37 महिला) 13 जून 2026 रोजी भारतीय हवाई दलात अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 217 व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचलनाचे यावेळी निरीक्षण केले आणि उत्तीर्ण झालेल्या कॅडेट्सना 'प्रेसिडेंट्स कमिशन' प्रदान केले. याचबरोबर भारतीय हवाई दलाच्या 'फ्लाइंग' आणि 'ग्राउंड ड्युटी' शाखांसाठीच्या कॅडेट्सच्या नियुक्ती-पूर्व प्रशिक्षणाची सांगता झाली.





या प्रसंगी भारतीय नौदलाच्या नऊ (9), भारतीय तटरक्षक दलाच्या तीन (3) आणि व्हिएतनामच्या दोन (2) अधिकाऱ्यांना 'विंग्स' ने सन्मानित करण्यात आले. तसेच नेव्हिगेशन प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल तीन (3) अधिकाऱ्यांना 'ब्रेव्हेट्स' (Brevets) प्रदान करण्यात आले.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कॅडेट्सचे अभिनंदन करताना संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की ते अशा सेवेत सामील होत आहेत जी देशासाठी सातत्याने ढाल आणि तलवार या दोन्ही भूमिका बजावत आली आहे. ते म्हणाले, "भारतीय हवाई दलाने श्रीनगर एअरलिफ्टद्वारे काश्मीरमधील 1947-48 च्या युद्धाची दिशा बदलली आणि 1971 च्या युद्धात निर्णायक हवाई हल्ले करून अवघ्या 13 दिवसांमध्ये इतिहास घडवला. 2025 मधील 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान त्यांनी अतिशय अचूकतेने दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करून आपली अदम्य जिद्द आणि अतुलनीय शौर्याचे दर्शन घडवले. ही मोहीम केवळ आपल्या स्वदेशी प्लॅटफॉर्म्सच्या मदतीनेच नाही, तर भारतीय हवाई दलाच्या प्रशिक्षित, धाडसी आणि शिस्तप्रिय अधिकाऱ्यांमुळेही यशस्वीरित्या पार पडली. मला विश्वास आहे की भविष्यातील मोहिमांमध्येही हे दल अशीच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राहील."

महिला अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करताना संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले की, 'नारी शक्ती'चा वाढता सहभाग भारतीय हवाई दलाला अधिक सक्षम आणि संतुलित बनवेल. "यातून आपल्या सर्वसमावेशक दलाची ताकद दिसून येते," असे ते म्हणाले. त्यांनी उत्तीर्ण झालेल्या व्हिएतनामी कॅडेट्सना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे प्रशिक्षण दोन्ही देशांमधील मैत्री अधिक दृढ करेल, असा विश्वास व्यक्त केला.

परेडद्वारे 'रिव्ह्यूइंग ऑफिसर' यांना 'जनरल सॅल्यूट' देण्यात आला आणि त्यानंतर दिमाखदार 'मार्च पास्ट' पार पडला. या संचलनादरम्यान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत समन्वयित आणि लयबद्ध असा 'फ्लायपास्ट' देखील पार पडला. या फ्लायपास्टमध्ये पिलाटस PC-7 Mk II, हॉक, किरण आणि चेतक अशा चार प्रकारच्या प्रशिक्षण विमानांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

सैनिकी संचलनाच्या प्रभावी सुरावटीच्या तालावर नवनियुक्त अधिकाऱ्यांच्या दोन रांगांमधील मार्च सह मध्ये संचलनाची सांगता झाली, यावेळी त्यांच्या खालील रँकमधील कनिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सर्वप्रथम मानवंदना दिली.
प्रशिक्षणाच्या विविध क्षेत्रांमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते या अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 'पायलट कोर्स'मध्ये गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल फ्लाईंग ऑफिसर आशिष कुमार यादव यांना प्रतिष्ठित 'प्रेसिडेंट्स प्लॅक' आणि 'नवानगर स्वॉर्ड ऑफ ऑनर' देऊन सन्मानित करण्यात आले. 'नेव्हिगेशन' शाखेतील गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल फ्लाईंग ऑफिसर एकता गुप्ता यांना 'प्रेसिडेंट्स प्लॅक' प्रदान करण्यात आला. तसेच, 'ग्राउंड ड्युटी' शाखांमधील गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल फ्लाईंग ऑफिसर दिव्यांशी सिंग यांना 'प्रेसिडेंट्स प्लॅक' देऊन गौरवण्यात आले.




या कार्यक्रमात 'आकाश गंगा' आणि महिला हवाई योद्ध्यांचे ड्रिल पथक 'शक्ती' यांच्या सादरीकरणाचाही समावेश होता, ज्याचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. संचलनाच्या भव्य सांगता सोहळ्यात Su-30 MKI, 'सारंग' हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम आणि 'सूर्यकिरण' एरोबॅटिक टीम यांनी चित्तवेधक हवाई कसरतींचे प्रात्यक्षिक दाखवले. याप्रसंगी ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल एस. श्रीनिवास, एएफए चे कमांडंट एअर मार्शल राहुल भसीन आणि भारतीय हवाई दलाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


***
माधुरी पांगे/मंजिरी गानू/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2272488)
आगंतुक पटल : 15