गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली श्री अमरनाथ यात्रा 2026 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली येथे सुरक्षा आढावा बैठकीचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2026 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2026
श्री अमरनाथ यात्रा 2026 च्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे सुरक्षा आढावा बैठक पार पडली. यंदा, 3 जुलै ते 28 ऑगस्ट 2026 या कालावधीत श्री अमरनाथ यात्रा आयोजित केली जाईल.

या बैठकीला जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृह सचिव, लष्करप्रमुख, गुप्तचर विभागाचे संचालक, जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे महासंचालक तसेच गृह मंत्रालय आणि भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सर्व सुरक्षा यंत्रणांच्या समन्वित प्रयत्नांद्वारे यात्रेसाठी एकात्मिक आणि अभेद्य सुरक्षा कवच उभारण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी दिले. ड्रोन, सीसीटीव्ही पाळत ठेवणे, प्रगत देखरेख प्रणाली आणि इतर तांत्रिक साधने यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करून पारंपारिक सुरक्षा चौकट अधिक मजबूत केली पाहिजे, असे ते म्हणाले. जम्मू आणि काश्मीर पोलीस, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी यात्रा मार्गावर बहुस्तरीय सुरक्षा यंत्रणा उभारावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
यात्रेच्या कालखंडात विविध केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांचे वरिष्ठ अधिकारी आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी सातत्याने शिबिरांच्या ठिकाणच्या स्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच सर्व व्यवस्थांवर लक्ष ठेवण्यासाठी उपस्थित असणे आवश्यक असल्याचे अमित शाह म्हणाले. यात्रेकरूंच्या नोंदणी, निवासव्यवस्था, आरोग्यविषयक सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापन यांसह सर्व आवश्यक सेवांच्या पूर्ततेसाठी पुरेशी व्यवस्था सुनिश्चित करणे अनिवार्य आहे, यावर त्यांनी भर दिला. यात्रा नोंदणी आणि यात्रेकरूंना सहाय्यासंबंधी माहिती श्री अमरनाथ जी श्राइन बोर्डाच्या https://jksasb.nic.in या वेबसाइटवर मिळू शकते.

तेथील रोजची हवामानाची स्थिती आणि पूर्वानुमान यानुसार यात्रेकरूंच्या तुकड्यांच्या हालचालींवर कठोरपणे नियंत्रण ठेवले जावे, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच केवळ यात्रेच्या मार्गावरच नव्हे तर प्रमुख पर्यटन स्थळांवर देखील काटेकोर सुरक्षा व्यवस्था तैनात केली जावी ज्यामुळे यात्रेकरुंना कोणत्याही गैरसोईविना पर्यटनाचा आनंद घेता येईल, असे त्यांनी सांगितले. यात्रेशी संबंधित स्थानिक व्यक्ती आणि प्राण्यांच्या नोंदणीची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांना क्यूआर कोड असलेली ओळखपत्रे दिली जातील. याव्यतिरिक्त, यात्रेसंबंधित कामांमध्ये गुंतलेल्या प्राण्यांच्या आरोग्य तपासणी आणि तंदुरुस्ती मूल्यांकनासाठी शिबिरे आयोजित केली जातील, अशी माहिती या बैठकीदरम्यान, गृहमंत्र्यांना देण्यात आली.
सुषमा काणे/राजश्री आगाशे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2272288)
आगंतुक पटल : 11