आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाची (पीएमएसएमए)10 वर्षे – देखभालीचे दशक” पूर्ण झाल्यानिमित्त केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते देशव्यापी सोहोळ्याची सुरुवात


पीएमएसएमएला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी 75 रुपये मूल्याचे विशेष नाणे आणि 5 रुपये मूल्याचे टपाल तिकीट जारी केले

जागतिक सरासरीला मागे टाकत भारताने माता मृत्यूदरात 86% घट साध्य केली

प्रविष्टि तिथि: 09 JUN 2026 9:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 जून 2026

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेल्या पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाने (पीएमएसएमए)आज संपूर्ण भारतात सुरक्षित मातृत्वाची सुनिश्चिती करत समर्पित सेवेची 10 वर्षे अधिकृतरित्या पूर्ण केली.

हा महत्त्वाचा टप्पा साजरा करण्यासाठी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते “पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाची (पीएमएसएमए)10 वर्षे – देखभालीचे  दशक” या संकल्पनेअंतर्गत देशभर साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली. सुरक्षित गर्भावस्था आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने भारताने हाती घेतलेल्या पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाच्या (पीएमएसएमए) यशस्वी अंमलबजावणीचे दशक पूर्ण झाल्यानिमित्त हे कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा म्हणाले की हा महत्त्वाचा टप्पा म्हणजे संपूर्ण देशासाठी अत्यंत अभिमानाचा आणि समाधानाचा क्षण आहे. गेल्या दशकभरात झालेल्या पीएमएसएमएच्या यशस्वी अंमलबजावणीतून देशातील प्रत्येक कुटुंबासाठी सुरक्षित मातृत्व आणि निरोगी नवजात अर्भके यांची सुनिश्चिती करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेची पूर्तता करण्याच्या दिशेने सरकारने स्वीकारलेल्या अढळ कटिबद्धतेचे दर्शन घडते.

गेल्या 10 वर्षांमध्ये  पीएमएसएमएने केवळ देशातील माता आणि बाल आरोग्य सेवा बळकट केली नाही तर त्याचबरोबर अधिक तंदुरुस्त आणि अधिक लवचिक भारताच्या उभारणीसाठी मजबूत पाया देखील घातला आहे. मातांचे आरोग्य आणि कल्याण  सुनिश्चित करणे म्हणजे एक निरोगी देश घडवण्यासाठी आणि तंदुरुस्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी अत्यंत मुलभूत बाब आहे यावर केंद्रीय मंत्र्यांनी अधिक भर दिला.

सुरक्षित गर्भधारणा सुनिश्चित करण्यात प्रसूतिपूर्व आरोग्य काळजी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारच्या मातृ आरोग्य सेवा आराखड्याअंतर्गत, गर्भवती महिलांच्या नियमित प्रसूतिपूर्व तपासण्या केल्या जातात. पीएमएसएमए अंतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील तपासणी देखील केली जाते, असे त्यांनी सांगितले. गर्भवती महिलांची नोंद करणे तसेच संपूर्ण गर्भधारणेच्या काळात त्यांना आवश्यक साहाय्य देण्यामध्ये आशा कार्यकर्त्यांनी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेवरही नड्डा यांनी  प्रकाश टाकला.

मातृ आणि बाल आरोग्य क्षेत्रात झालेल्या कामगिरीवर प्रकाश टाकताना नड्डा यांनी सांगितले की भारताच्या प्रगतीला जागतिक मान्यता मिळाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या माता मृत्यूदर आकलन आंतर-संस्था  गटाच्या (UN-MMEIG) नवीनतम अहवालाचा हवाला त्यांनी दिला आणि  भारताने 1990 पासून माता मृत्यूदरात 86 % प्रभावी घट साधली असून  जागतिक सरासरी 48% च्या घटीपेक्षा ती खूपच जास्त आहे.

नवीनतम राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या निष्कर्षांमध्ये दिसून आलेल्या सुधारणांवरही नड्डा यांनी भर दिला. संस्थात्मक प्रसूतींचे प्रमाण 90.6 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, तर प्रसूतिपूर्व आरोग्य सेवा घेणाऱ्या मातांचे प्रमाण 95.5 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, असे त्यांनी सांगितले. ही उपलब्धी बळकट झालेल्या आरोग्यसेवा प्रणाली, सुधारित सेवा वितरण आणि मातांच्या आरोग्याविषयी कुटुंबांमध्ये वाढलेल्या जागरूकतेचे प्रतिबिंब आहे, असेही ते म्हणाले. “ही केवळ आकडेवारी नाही तर वेळेवर उपचार, लवकर केलेल्या उपाययोजना आणि आपल्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे वाचलेल्या माता आणि नवजात बालकांच्या जीवनाचे प्रतीक आहेत.” असे त्यांनी नमूद केले.

यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव  पुण्या सलीला श्रीवास्तव उपस्थित होत्या. गेल्या दशकात, पीएमएसएमए हा केंद्र  सरकारच्या सर्वात प्रभावी सार्वजनिक आरोग्य उपक्रमांपैकी एक म्हणून उदयास आला असून या उपक्रमाने देशभरातील कोट्यवधी महिला आणि कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे, असे त्यांनी सांगितले. 

आज, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीएमएसएमए अंतर्गत 9,000 हून अधिक खाजगी आरोग्यसेवा प्रदाते नोंदणीकृत आहेत. यामुळे  विशेष करून दुर्लक्षित, दुर्गम आणि आकांक्षी जिल्ह्यांमध्ये विशेषज्ञ प्रसूतिपूर्व आरोग्य सेवेची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

या कार्यक्रमात, नड्डा यांनी पीएमएसएमएच्या दहा वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा उत्सव साजरा करण्यासाठी तसेच देशातील मातृ आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 75 रुपयांचे एक विशेष नाणे आणि 5 रुपयांचे विशेष टपाल तिकीट, यांचे अनावरण केले.

निलीमा चितळे/सोनाली काकडे/संजना चिटणीस/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2270929) आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Telugu