लोकसभा सचिवालय
लोकसभा अध्यक्ष 2ऱ्या राष्ट्रकुल संसदीय संघटना भारत क्षेत्र झोन-II परिषदेचे चंदीगड येथे करणार उद्घाटन
परिषदेची संकल्पना : भविष्यातील आव्हाने आणि विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट साध्य करण्यात जागरूक समाज व लोकप्रतिनिधींची भूमिका
हरियाणाचे राज्यपाल, हरियाणाचे मुख्यमंत्री, सभापती, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2026 5:00PM by PIB Mumbai
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला 08 जून 2026 रोजी चंदीगड येथील हरियाणा विधानसभेत आयोजित 2ऱ्या राष्ट्रकुल संसदीय संघटना (सीपीए) भारत क्षेत्र झोन-II उत्तर विभागीय परिषदेचे उद्घाटन करणार आहेत.
या प्रसंगी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण तसेच हरियाणा सरकारचे संसदीय कामकाज मंत्री महिपाल ढांडा हेही उपस्थित मान्यवरांना संबोधित करणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत ‘भविष्यातील आव्हाने आणि विकसित भारत 2047 चे उद्दिष्ट साध्य करण्यात जागरूक समाज व लोकप्रतिनिधींची भूमिका’ या विषयावर मान्यवर सखोल विचारमंथन करणार आहेत.
09 जून 2026 रोजी हरियाणाचे राज्यपाल प्रा. आशिम कुमार घोष यांच्या समारोपपर भाषणाने परिषदेची सांगता होईल. समारोप सत्रात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष हरविंदर कल्याण आणि इतर मान्यवर उपस्थित राहून सभेला संबोधित करतील.
या परिषदेला सीपीए भारत क्षेत्र झोन-II अंतर्गत येणाऱ्या पाच विधानमंडळांतील अध्यक्ष, सभापती, उपसभापती, उपाध्यक्ष, आमदार आणि विधान परिषद सदस्य तसेच केंद्रीय मंत्री, खासदार, हरियाणा विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राजस्थान, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, सिक्कीम, गोवा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या विधानमंडळांतील सभापती आणि अध्यक्षांनाही परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
सीपीए भारत क्षेत्र झोन-II मध्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्ली या विधानमंडळांचा समावेश आहे. 2024 मध्ये सीपीए भारत क्षेत्राची पुनर्रचना करून त्याचे नऊ झोनमध्ये विभाजन करण्यात आल्यानंतर आयोजित करण्यात येणारी ही झोन-II ची दुसरी वार्षिक परिषद आहे. सध्या हरियाणा विधानसभेचे अध्यक्ष सीपीए भारत क्षेत्र झोन-II चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
संसदीय सहकार्य अधिक बळकट करणे, विधायी आणि संसदीय क्षेत्रातील सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण सुलभ करणे तसेच प्रादेशिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर विधायक संवादाला प्रोत्साहन देणे हे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. तसेच 2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी अध्यक्षपदावरील मान्यवर आणि लोकप्रतिनिधींना आपले अनुभव सामायिक करण्यासाठी व धोरणात्मक उपायांवर चर्चा करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचा विचारमंच उपलब्ध करून देणार आहे.
****
नेहा कुलकर्णी/नितीन गायकवाड/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2270124)
आगंतुक पटल : 3