युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद इथे पहिली जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे उद्घाटन
"या अजिंक्यपद स्पर्धेच्या माध्यमातून योगासनाला एक स्पर्धात्मक खेळ म्हणून नवीन ओळख मिळेल": पंतप्रधान मोदी
"भारत 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि 2036 मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करेल, तेव्हा योगासन या जागतिक क्रीडा स्पर्धांचा भाग व्हावे, ही आमची महत्त्वाकांक्षा आहे": डॉ. मनसुख मांडवीय
प्रविष्टि तिथि:
04 JUN 2026 10:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अहमदाबाद इथे पहिल्या जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे उद्घाटन केले.
या स्पर्धेच्या भूमिकेवर प्रकाश टाकताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आधी, जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा आरोग्य आणि कल्याणाचा दुहेरी डोस घेऊन आली आहे."

प्रत्येक जिवंत परंपरा काळासोबत एका नवीन टप्प्यात प्रवेश करते, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांनी या अजिंक्यपद स्पर्धेचे वर्णन योगाच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात असे केले.
"प्रत्येक जिवंत परंपरा काळासोबत नवीन टप्प्यात प्रवेश करते. योगासन खेळाची ही जागतिक अजिंक्यपद स्पर्धा अशाच एका नवीन टप्प्याची सुरुवात आहे."
प्रत्येक मोठा खेळ आपल्याभोवती एक संपूर्ण परिसंस्था तयार करतो, असे पंतप्रधान खेळांच्या व्यापक प्रभावावर प्रकाश टाकताना म्हणाले.

"योगासन खेळाचा विस्तार होईल, त्याबरोबर त्याच्याशी संबंधित नवीन शक्यताही वाढतील. यामुळे खेळाडूंसाठी करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि प्रशिक्षक, क्रीडा शास्त्रज्ञ, संशोधक आणि इव्हेंट मॅनेजर्ससाठी संधी निर्माण होतील," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
स्पर्धकांचे अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले की, जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे महत्त्व केवळ स्पर्धेपुरते मर्यादित नाही.
"या स्पर्धेत कोणीही जिंकले तरी, इतिहासाच्या या महत्त्वाच्या अध्यायाचा भाग बनून तुम्ही सर्वजण आधीच विजेते ठरला आहात," असे त्यांनी यावेळी सांगितले.
या अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना आयुष मंत्रालयाच्या 'योग तीनशे पासष्ट’ मोहिमेचे सदिच्छा दूत बनण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले, तसेच खेळाडूंना योगाचा संदेश आपल्या देशांमध्ये घेऊन जाण्यासाठी आणि या प्राचीन विद्येमध्ये वर्षभर सक्रिय सहभाग घेण्यासाठी इतरांना प्रेरणा द्यावी, असेही सांगितले.
अंतिमतः योगासनांना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये स्थान मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी या योगासन अजिंक्यपद स्पर्धेचे वर्णन भारत आणि जागतिक योग समुदायासाठी एक ऐतिहासिक क्षण असे केले.

"जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात भारतात होत आहे; याच्या अगदी पहिल्याच वर्षात 78 देशांतील 500 हून अधिक खेळाडू एकत्र आले आहेत. देशासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे," असे ते म्हणाले.
योगासने आता एक स्पर्धात्मक खेळ म्हणून उदयास येत आहेत आणि या परिवर्तनाचे नेतृत्व भारत करत आहे, यावर क्रीडा मंत्र्यांनी पुढे भर दिला.
"ज्यावेळी भारत 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आणि 2036 मध्ये ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवेल, त्यावेळी योगासने या जागतिक क्रीडा स्पर्धांचा भाग बनलेली पाहणे, ही आमची महत्वाकांक्षा आहे," असे ते म्हणाले.

या उद्घाटन समारंभाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल; गुजरात सरकारचे गृह, क्रीडा, युवा आणि सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री हर्ष संघवी; आणि 'वैश्विक योगासन'चे अध्यक्ष स्वामी रामदेव यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते.
जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेने युगांडा, झांबिया, श्रीलंका, नेपाळ, केनिया, जपान, ओमान, मॉरिशस आणि नेदरलँड्स यांसह 60 हून अधिक देशांमधील उत्कृष्ट योगासन खेळाडू आणि प्रतिनिधी मंडळांना एकत्र आणले आहे. योगासनांना जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त क्रीडा प्रकार म्हणून ओळख मिळवून देणे, हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
* * *
सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/संदेश नाईक/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2269136)
आगंतुक पटल : 9